Fall Of Bira 91: लोकप्रिय बिअर ब्रँड ‘बिरा 91’ (Bira 91) ची मूळ कंपनी B9 बेव्हरेजेस सध्या मोठ्या अडचणीत सापडली आहे. केवळ कंपनीच्या कायदेशीर नावात केलेल्या एका लहान बदलामुळे समस्या निर्माण झाली आहे.
या गोंधळामुळे कंपनीत निर्माण झालेल्या समस्यांवरून 250 हून अधिक कर्मचाऱ्यांनी कंपनीचे संस्थापक अंकित जैन (Ankur Jain) यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे.
नाव बदल्यामुळे निर्माण झालेला ‘गोंधळ’
या संपूर्ण गोंधळाची सुरुवात डिसेंबर 2022 मध्ये झाली.कंपनीने आपले कायदेशीर नाव ‘B9 Beverages Private Limited’ वरून ‘B9 Beverages Limited’ असे बदलले, म्हणजेच नावातील ‘Private’ (प्रायव्हेट) हा शब्द वगळला.
एका गुंतवणूकदाराने एक्स (X) वर पोस्ट करत सांगितले की, या तांत्रिक बदलामुळे अनेक राज्यांनी बिरा 91 च्या विक्रीवर बंदी घातली. नवीन नाव हे वेगळे युनिट मानले गेले आणि प्रत्येक व्हेरिएंटसाठी नवीन कायदेशीर मंजुरी, लेबल मंजुरी आणि परवाने मागण्यात आले.
या नोकरशाहीच्या अडथळ्यांमुळे बिरा 91 ची विक्री अनेक महिने थांबली. कंपनीला नवीन उत्पादनांचे लेबल नोंदणी करेपर्यंत सुमारे 80 कोटी रुपांचा माल राईट ऑफ (Write Off) करावा लागला.
कंपनीचे मोठे नुकसान
या तांत्रिक समस्या आणि नियमांमधील विलंबामुळे आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये कंपनीला मोठे नुकसान झाले. कंपनीच्या विक्रीत 22% घट झाली, तर तोट्यात 68% वाढ झाली.
कंपनीचे एकूण महसूल 638 कोटी रुपये असताना, निव्वळ तोटा 748 कोटी रुपये इतका झाला. 500 कोटी कर्जाची गुंतवणूक करण्याची चर्चा करणारी संभावित गुंतवणूकदार ब्लॅकरॉक या वाटाघाटीतून नंतर बाहेर पडली.
कर्मचाऱ्यांची मागणी आणि संस्थापकाची कबुली
कर्मचाऱ्यांनी संस्थापक अंकित जैन यांना हटवण्यासाठी याचिका दाखल केली आहे, ज्यात त्यांनी प्रशासकीय समस्या, वेळेवर पगार न मिळणे आणि पुरवठादारांची देणी थकीत असणे यासारख्या कारणांचा उल्लेख केला आहे.
यावर प्रतिक्रिया देताना अंकित जैन यांनी कर्मचाऱ्यांचे पगार थकीत असल्याची कबुली दिली. ते म्हणाले, “कर्मचाऱ्यांचे 3 ते 5 महिने पगार थकीत आहेत, ज्यात कर भरण्यासही विलंब झाला आहे. नाव बदल, दारू धोरणातील बदल आणि निधी उभारणीतील विलंबामुळे गेली 18 महिने अत्यंत आव्हानात्मक होती.” जैन यांनी सध्या कंपनीची पुनर्रचना करत असल्याचे आणि निवडक राज्यांवर लक्ष केंद्रित करत असल्याचे सांगितले.
हे देखील वाचा – ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’चा ट्रेलर लाँच; चित्रपटाविषयी बोलताना राज ठाकरे म्हणाले…