boAt Chrome Iris : आपल्या वेअरेबल डिव्हाइसच्या श्रेणीत वाढ करत लोकप्रिय भारतीय ब्रँड ‘boAt’ ने नवीन boAt Chrome Iris स्मार्टवॉच भारतीय बाजारात उतरवली आहे. दिसायला अतिशय शानदार असलेल्या या वॉचमध्ये अतिशय पातळ मेटल बॉडी वापरण्यात आली आहे. तंत्रज्ञानाची आवड असणाऱ्या आणि फिटनेसकडे लक्ष देणाऱ्या तरुणाईसाठी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
किंमत आणि उपलब्धता
भारतीय ग्राहकांसाठी boAt Chrome Iris ची किंमत 3,499 रुपये ठेवण्यात आली आहे. ही स्मार्टवॉच ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, boAt चे अधिकृत संकेतस्थळ आणि निवडक दुकानांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. ही वॉच मेटल गोल्ड, रोज पिंक, वेलवेट वाइन, सिल्क स्किन आणि फ्रॉस्टेड स्काई अशा पाच वेगवेगळ्या आकर्षक रंगांमध्ये खरेदी करता येईल.
डिस्प्ले आणि खास वैशिष्ट्ये
या स्मार्टवॉचमध्ये 1.32 इंचाचा AMOLED डिस्प्ले दिला आहे. याची ब्राइटनेस 1000 निट्स इतकी जबरदस्त आहे, ज्यामुळे कडक उन्हातही स्क्रीनवरील अक्षरं आणि चित्रं स्पष्ट दिसतात. ही वॉच केवळ 8 मिमी जाडीची असून वजनालाही हलकी आहे.
आरोग्यासाठी विशेष सोयी
तुमच्या तब्येतीवर लक्ष ठेवण्यासाठी यामध्ये अनेक महत्त्वाची फीचर्स दिली आहेत:
- हृदयाचे ठोके आणि रक्तातील ऑक्सिजन: ही वॉच तुमच्या हृदयाच्या गतीवर सतत लक्ष ठेवते आणि रक्तातील ऑक्सिजनची पातळीही मोजते.
- महिलांसाठी विशेष सुविधा: महिलांच्या आरोग्याचा विचार करून यामध्ये मासिक पाळीच्या सायकलचा मागोवा घेण्याची सोय दिली आहे.
- व्यायाम आणि झोप: तुम्ही दिवसातून किती पावले चाललात, कॅलरी, स्लिप मॉनिटरची माहिती वॉच देते.
बॅटरी आणि इतर स्मार्ट टूल्स
boAt Chrome Iris मध्ये ब्लूटूथ कॉलिंगचा सपोर्ट आहे, ज्यामुळे फोन खिशातून न काढताही तुम्ही बोलू शकता. यातील बॅटरी एकदा पूर्ण चार्ज केल्यावर साधारणपणे 5 दिवसांपर्यंत चालते, असा कंपनीचा दावा आहे. पूर्ण चार्ज होण्यासाठी याला फक्त 2 तास लागतात. पाण्यापासून आणि धुळीपासून रक्षण करण्यासाठी याला IP68 रेटिंग मिळाले आहे. याशिवाय यात कॅल्क्युलेटर, गेम्स, हवामानाची माहिती आणि कॅमेरा कंट्रोल यांसारखी अनेक छोटी पण उपयुक्त टूल्स आहेत.










