BSNL eSIM: सरकारी मालकीच्या भारत संचार निगम लिमिटेडने (BSNL) आता अत्याधुनिक eSIM सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. यासाठी BSNL ने टाटा कम्युनिकेशन्स (Tata Communications) सोबत भागीदारी केली आहे. टाटा कम्युनिकेशन्सच्या ‘Move’ नावाच्या प्लॅटफॉर्मच्या मदतीने ही सेवा संपूर्ण भारतात उपलब्ध होणार आहे.
यामुळे ग्राहकांना फिजिकल सिम कार्डची गरज राहणार नाही, कारण ते मोबाईल कनेक्टिव्हिटी दूरस्थपणे ॲक्टिव्हेट करू शकतील.
eSIM म्हणजे काय आणि कोणाला फायदा?
BSNL ची eSIM सेवा QR कोड स्कॅन करून 2G/3G/4G सेवा रिमोट पद्धतीने सक्रिय करण्याची सुविधा देते. यामुळे सिम कार्ड बदलण्याचा किंवा नवीन सिम कार्ड खरेदी करण्याचा त्रास वाचतो.
ज्यांच्याकडे डुअल-सिम (Dual-SIM) असलेले हँडसेट आहेत, ते एका स्लॉटमध्ये फिजिकल सिम कार्ड आणि दुसऱ्या स्लॉटमध्ये BSNL चे eSIM वापरू शकतात. आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या युझर्ससाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त आहे. विदेशात असताना ते स्थानिक ऑपरेटरशी सहज कनेक्ट होऊ शकतील.
टाटा कम्युनिकेशन्सचा GSMA-मान्यताप्राप्त सबस्क्रिप्शन मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म ‘Move’ BSNL ला त्यांच्या देशभरातील युझर्ससाठी eSIM चे व्यवस्थापन करण्यास मदत करणार आहे.
BSNL चे ‘डिजिटल आत्मनिर्भरते’कडे मोठे पाऊल
BSNL चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ए. रॉबर्ट रवी यांनी सांगितले की, “पॅन-इंडिया eSIM सेवा सुरू करणे हे आपल्या राष्ट्रीय दूरसंचार क्षमतेतील एक धोरणात्मक प्रगती आहे. टाटा कम्युनिकेशन्सच्या मजबूत कनेक्टिव्हिटी अनुभवामुळे आम्ही भारतातील नागरिकांसाठी मोबाईल सेवांची लवचिकता, सुरक्षा आणि कार्यक्षमता वाढवत आहोत. हे पाऊल डिजिटल आत्मनिर्भरता वाढवण्याच्या आमच्या वचनबद्धतेशी जुळणारे आहे.”
ऑगस्टमध्ये तमिळनाडू सर्कलमध्ये BSNL ने eSIM सेवा सुरू करण्यास सुरुवात केली होती. याशिवाय BSNL आपली सेवा मजबूत करण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून अनेक महत्त्वपूर्ण पाऊले उचलत आहे. BSNL ने नुकतेच दिल्लीत आपली 4G सेवा सुरू केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच BSNL च्या पूर्णपणे स्वदेशी 4G नेटवर्कचे उद्घाटन केले. देशात विकसित केलेले 97,500 हून अधिक BSNL मोबाईल टॉवर्स कार्यान्वित करण्यात आले आहेत. यासाठी अंदाजे 37,000 कोटी रुपये खर्च आला आहे.
हे देखील वाचा –बरेलीमध्ये 48 तास इंटरनेट बंद, 4 जिल्ह्यांत हाय अलर्ट; कारण काय?