BSNL Swadeshi 4G: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत संचार निगम लिमिटेडच्या (BSNL) पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित 4G नेटवर्क स्टॅकचे उद्घाटन केले आहे. या कामगिरीमुळे भारत आता डेन्मार्क, स्वीडन, दक्षिण कोरिया आणि चीनसारख्या मोजक्या देशांच्या पंक्तीत सामील झाला आहे, जे स्वतःचे दूरसंचार उपकरणे तयार करतात.
पंतप्रधानांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘डिजिटल इंडिया’ या संकल्पनेला बळ देणारा हा प्रकल्प ग्रामीण भागातील ‘डिजिटल दरी’ भरून काढण्यास मदत करेल.
“हे उद्घाटन भारताच्या परावलंबनाकडून आत्मविश्वासाकडे सुरू असलेल्या प्रवासाचे प्रतीक आहे. यामुळे रोजगार, निर्यात, वित्तीय पुनरुज्जीवन आणि आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नाला गती मिळेल,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
हा प्रकल्प 20 लाखांहून अधिक नवीन ग्राहकांना सेवा देईल आणि भारताला जगातील प्रमुख दूरसंचार उपकरण उत्पादक म्हणून प्रस्थापित करेल.
BSNL Swadeshi 4G: स्वदेशी 4G नेटवर्कची वैशिष्ट्ये आणि व्याप्ती
- तंत्रज्ञान: हा स्वदेशी 4G नेटवर्क स्टॅक पूर्णपणे सॉफ्टवेअर आधारित, क्लाउड-आधारित असून भविष्यात 5G मध्ये सहज अपग्रेड होण्यासाठी तयार करण्यात आला आहे.
- ग्रामीण भागात विस्तार: ओडिशा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, आसाम, गुजरात आणि बिहार यांसारख्या अनेक राज्यांमध्ये या प्रकल्पांतर्गत BSNL चे टॉवर्स बसवण्यात आले आहेत.
- सर्वाधिक फायदा: आदिवासी, दुर्गम गावे आणि डोंगराळ भागांना या स्वदेशी 4G सेवेचा सर्वाधिक लाभ मिळणार आहे.
- डिजिटल कनेक्टिव्हिटी: डिजिटल भारत निधी अंतर्गत 29,000 गावे आधीच जोडली गेली आहेत. या उद्घाटनानंतर, दुर्गम, सीमावर्ती आणि नक्षलग्रस्त भागांमधील 26,700 हून अधिक ‘कनेक्टिव्हिटी नसलेल्या’ गावांना 4G कनेक्टिव्हिटी मिळेल.
- नवीन टॉवर्स आणि गुंतवणूक: पंतप्रधानांनी सुमारे 37,000 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या 97,500 हून अधिक मोबाईल टॉवर्सचे (लोकार्पण केले, ज्यात 92,600 4G सक्षम साइट्सचा समावेश आहे.
- ग्रीन टेलिकॉम: हे BSNL टॉवर्स सौर ऊर्जेवर चालणारे असून, यामुळे ते भारतातील सर्वात मोठे ग्रीन टेलिकॉम क्लस्टर बनले आहेत.
सामान्य नागरिकांना होणारे फायदे
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंदिया यांनी सांगितले की, हे 4G इन्फ्रास्ट्रक्चर प्रत्येक नागरिकाला डिजिटल सुविधा मिळवून देण्यासाठी तयार केले आहे.
“यामुळे बिहारमधील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे ऑनलाइन शिक्षण मिळेल, पंजाबमधील शेतकऱ्यांना ‘मंडी’ किमतींचे अपडेट्स मिळतील, तर काश्मीरमधील जवानांना त्यांच्या कुटुंबीयांशी जोडता येईल. ई-गव्हर्नन्स, डिजिटल पेमेंट्स, ऑनलाइन शिक्षण आणि टेलीमेडिसिन यांसारख्या सेवांनाही यामुळे बळ मिळेल,” असे ते म्हणाले.
हे देखील वाचा – Asia Cup 2025: 41 वर्षांनंतर पहिल्यांदाच आशिया कपच्या अंतिम फेरीत India vs Pakistan भिडणार; मोफत कुठे पाहू शकता सामना?