Navaratri’s 9 Political Coulur’s – Communists sincerely fighting for their cause
तुळशीदास भोईटे – Communists : लाल सलाम. लाल बावटा. कडवटपणे पण प्रामाणिकपणे आपल्या ध्येयासाठी लढणारे म्हणून कम्युनिस्ट ओळखले जातात. आजही जिथे आहेत तिथे ते आपले काम आणि आपल्या प्रामाणिकपणामुळे महत्त्व मिळवून आहेत. डावे-उजवे करू नये, असे म्हणतात. पण राजकारणाचा विषय आला की, भारतच काय जगभरात डावे आणि उजवे असतेच असते. अर्थात ते राजकीय विचारसरणीमुळे असते. डावे म्हणजे कम्युनिस्ट विचारसरणी मानणारे. कम्युनिस्ट विचारसरणी आणि वादाचा विषय होत नाही, असे सहसा होत नाही.

भारतीय कम्युनिस्ट (Bhartiya Communist)
भारतात तर कम्युनिस्ट पक्षाची स्थापना 1920 मध्ये झाली की, 1925 मध्ये झाली हाही वादाचा मुद्दा आहे. मार्क्स आणि एंजल यांच्या कम्युनिस्ट जाहीरनाम्यातून कम्युनिस्ट विचारसरणी जन्माला आली. रशियात क्रांती घडवत झारशाही उलटवली ती 1917 च्या दरम्यान. त्यानंतर भारतातही कम्युनिस्ट विचारसरणी पोहोचली. भारतीय कम्युनिस्ट पक्ष स्थापना 26 डिसेंबर 1925ची मानतो, तर त्या पक्षातून 1964 मध्ये फुटून स्थापन झालेला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष 1920ची स्थापना असाच दावा करतो.
स्वातंत्र्यपूर्व काळात कम्युनिस्ट पक्षाची भूमिका ही रशियातून येणाऱ्या निर्देशांनुसार होती असा आरोपही झाला. तिथून आदेश आला की, काँग्रेसच्या स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी व्हायचे आणि रशिया-ब्रिटन एकत्र आल्यानंतर आदेश बदलला तर आंदोलनाविरोधात उभे ठाकायचे. स्वातंत्र्यानंतर पुढे कम्युनिस्ट चीनच्या भारतावरील आक्रमणाच्यावेळी असाच आरोप झाला. चीन हा कम्युनिस्ट देश असल्याने चीन आक्रमण करू शकत नाही, असा युक्तिवाद केला जाऊ लागला. त्यातून वाद पेटला आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष वेगळा स्थापन झाला. तोच पुढे जास्त बलवानही ठरला.

मार्क्सवादी कम्युनिस्ट (Marxist Communists)
1962 मधील चीन आक्रमणामुळे कम्युनिस्ट पक्ष वादाच्या भोवऱ्यात सापडला. तेव्हा श्रीपाद डांगे हे महाराष्ट्रातील मुख्य नेते होते. केंद्र सरकारने 7 नोव्हेंबर 1962 ते 30 एप्रिल 1966 अशी साडेतीन वर्षे पक्षाच्या महाराष्ट्रातील कित्येक नेत्यांना तुरुंंगात डांबले होते. तरीही भाकपने आपले स्वतंत्र अस्तित्व वाढवले. महाराष्ट्रात त्यातही मुंबईतील कामगारांवरील कम्युनिस्टांचा प्रभाव संपवण्याचे प्रयत्न सुरू झाले. काँग्रेसने त्यासाठी शिवसेनेचा वापर केल्याचा आरोप झाला. 1970मध्ये भाकपचे आमदार कॉ. कृष्णा देसाई यांचा खून केला. त्या खुनाप्रकरणी शिवसैनिकांना अटक झाली. त्यातून शिवसेनेचा प्रभाव वाढत गेला.
देशात 1975मध्ये आणीबाणी लादली गेली. आणीबाणीविरुद्धच्या लढाईत 1975 ते 1977 या 19 महिन्यांमध्ये कम्युनिस्ट पक्ष आक्रमक राहिला. अनेक नेत्यांना गजाआड पाठवण्यात आले. 1977च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. त्याच निवडणुकीत माकपाचे तीन उमेदवार अहिल्या रांगणेकर (मुंबई), लहानू कोम (ठाणे जिल्हा) आणि गंगाधर अप्पा बुरांडे (बीड जिल्हा) लोकसभेवर निवडून गेले. त्या पाठोपाठ 1978मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत 9 आमदार निवडून आले. आजवर महाराष्ट्रात माकपची हीच सर्वात जास्त आमदार संख्या आहे.

कॉम्रेड डांगे (Comrade Dange)
भाकपा 1996 ते 1998 पर्यंत जनता दल व इतर पक्षांच्या आघाडीच्या सरकारमध्ये सहभागी होता. देवेगौडा आणि गुजराल पंतप्रधान असताना भाकपाचे दोन मंत्री होते. त्याहीआधी जगभरात लोकशाही मार्गाने सत्तेत आलेले पहिले कम्युनिस्ट सरकारही भारतात दक्षिणेतील केरळमध्ये अस्तित्वात आले. 1952 मध्ये भाकपा पहिल्या लोकसभेत पहिला प्रमुख विरोधी पक्ष बनला होता. केरळमध्ये भाकपा सत्तेत आलेला, त्या राज्यात आताही डाव्या लोकशाही आघाडीचे सरकार आहे. बंगालमध्ये दीर्घकाळ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीचे सरकार होते.
पुढे तृणमूल काँग्रेसने सत्तापरिवर्तन घडवले. डाव्यांकडील एक महत्त्वाचं राज्य गेलं. कम्युनिस्टांच्या डाव्या आघाडीने पश्चिम बंगालमध्ये 1977 ते 2011 अशी तब्बल 34 वर्षे आणि त्रिपुरात 1993 ते 2018 अशी तब्बल 25 वर्षे राज्य केले. आता फक्त केरळात डावी आघाडी सत्तेत आहे. द्रमुकसोबतच्या युतीमुळे तामिळनाडूत सत्ता सहभाग आहे. केरळ, तामिळनाडू ही राज्ये वगळता कम्युनिस्टांचे खास अस्तित्व नाही. राजकारणात 2022पर्यंत भारतीय कम्युनिस्ट पक्ष एकमेव पक्ष होता ज्याने एकाच निवडणूक चिन्हावर 1952पासूनच्या सर्व निवडणुका लढवल्या होत्या. पुढे निवडणुकीतील कामगिरी खालावत गेल्याने 2023मध्ये निवडणूक आयोगाने भाकपाचा राष्ट्रीय दर्जा काढून घेतला.
कामगार चळवळीत पूर्वीसारखा दबदबा नसला तरी कम्युनिस्ट पक्षांच्या कामगार संघटनांचं प्रभावी अस्तित्व आहे. महाराष्ट्रात कम्युनिस्टांचा एकेकाळी मोठा दबदबा होता. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात कम्युनिस्टांचा मोठा वाटा होता. मुंबईतील हुतात्मा चौकातील कामगार-शेतकरी यांचे शिल्प म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील शेतकरी कामकरी यांच्या सहभागाचा गौरव आहे. महाराष्ट्रातील डाव्या चळवळीचा उल्लेख झाला की, गोदाताई परुळेकरांचे नाव आठवते. तेव्हाच्या ठाणे आणि आताच्या पालघर जिल्ह्यात आदिवासींना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार परुळेकरांच्या आंदोलनामुळेच मिळाला. वेठबिगारी एक प्रकारची मतगुलामगिरीच. त्याविरोधात गोदाताईंनी आदिवासींना संघटित केले. त्यासाठी त्या पाडे-पाडे फिरल्या. त्यांच्याविषयी केवळ डाव्या नाही, तर काँग्रेससारखे पक्ष आणि उजव्या विचारसरणीतही आदराचे स्थान होते. तेव्हाच्या ठाणे जिल्ह्यातील आणि नंतर पालघर जिल्ह्यातील डहाणू मतदारसंघ हा कम्युनिस्टांचा मतदारसंघ होता. पण पुढे तिथेही आधी काँग्रेस आणि नंतर उजवे प्रभावी ठरू लागले.

गोदाताई परुळेकर (Godatai Parulekar)
डहाणू मतदारसंघातून कम्युनिस्ट आमदार निवडून येत असे. पुढे ती परंपरा तुटली. भाजपा तेथून विजय मिळवू लागली. गेल्या दोन निवडणुकांमध्ये पुन्हा डाव्यांचा लाल बावटा फडकला आहे. सोलापुरात नरसय्या आडाम यांच्या रुपाने कम्युनिस्ट पक्षाची समर्पित समाजकारणाची परंपरा टिकून होती. पुढे आडाम मास्तरांचा पराभव झाला. त्यांनी हजारो विडी कामगारांसाठी घरकुले उभारण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणूनही त्यांचा पराभव झाला. महाराष्ट्राच्या या विधानसभेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा एकच आमदार आहे. डहाणू मतदारसंघातून या पक्षाचे विनोद निकोले हे निवडून आले आहेत.
आज अशी परिस्थिती असली तरी एकेकाळी महाराष्ट्र हे कम्युनिस्ट चळवळीत महत्त्वाचे स्थान असलेले राज्य होते. इंग्रजी सत्तेतही मुंबईच्या गिरणी कामगारांनी डाव्यांच्या नेतृत्वाखाली गिरणी कामगार युनियनचा लाल झेंडा हातात घेऊन मोठे लढे दिले. त्यावेळी कॉ. बी. टी. रणदिवे, कॉ. श्रीपाद अमृत डांगे, कॉ. एस. एस. मिरजकर हे नेते आघाडीवर होते. मुंबईतल्या कामगारांचा संघर्ष पुढे ठाणे, सोलापूर, धुळे, जळगाव या जिल्ह्यांमध्येही पसरला.

कॉम्रेड रणदिवे (Comrade Ranadive)
सध्या महाराष्ट्रात पालघर जिल्हा, अहिल्यानगरमधील अकोला परिसर, सोलापूरचा शहर भाग या भागात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सक्रिय आहे. कामगार संघटनांच्या माध्यमातून आपला प्रभाव राखून आहे. लाल सलाम तेवढा बुलंद नसला तरी अस्तित्व राखून आहे.
आणखीही कम्युनिस्ट पक्ष
राज्याच्या राजकारणात भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांव्यतिरिक्त डाव्या विचारसरणीचे इतरही काही पक्ष आहेत. त्यातील सत्यशोधक कम्युनिस्ट पार्टी हा एक पक्ष आहे. कार्ल मार्क्स, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतीराव फुले यांच्या विचारसरणीवर आधारीत तत्त्वज्ञान असणाऱ्या या पक्षाची स्थापना 1978 मध्ये केली होती. कॉम्रेड शरद पाटील यांनी या पक्षाची स्थापना केली होती. ते 2007 पर्यंत पक्षाचे सरचिटणीस होते.
लाल निशाण पार्टी (लेनिनवादी) हा महाराष्ट्रातील आणखी एक कम्युनिस्ट पक्ष. 1988 मध्ये लाल निशाण पक्षाचा एक भाग म्हणून एलएनपी (एल) ची स्थापना झाली. एलएनपीने काँग्रेसला अनेक निवडणुकांमध्ये पाठिंबा दिला. अशोक मनोहर त्यांच्या 2003 मधील मृत्यूपर्यंत पक्षाचे नेतृत्व करत होते. आता भीमराव बनसोड पक्षाचे नेतृत्व करत आहेत. 31 मे 2025 रोजी एलएनपी(एल) हा पक्ष कम्युनिस्ट पार्टी (एमएल)मध्ये विलीन झाला.
हे देखील वाचा –
बविआ, जनसुराज्यसारख्या पक्षांचे जिल्हा राजकारणावरच लक्ष!
सर्वसमावेशकतेचे सर्व रंग काँग्रेसचं भविष्य उजळवणार?
नवरात्रीचे राजकीय नवरंग ! राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संभ्रमाचे राजकारण
नवरात्रीचे राजकीय’ रंग ! शिवसेना: रंग भगवाच, पण कशा बदलणार छटा?