Free Movie App : सध्याच्या काळात मनोरंजनासाठी अनेकजण फोनवरच चित्रपट पाहण्याला प्राधान्य देतात. चित्रपटगृहात न जाता घरबसल्या नवनवीन चित्रपट पाहण्यासाठी अनेकदा अनधिकृत ॲप्सचा वापर केला जातो. विशेषतः सणासुदीच्या काळात जेव्हा मोठे चित्रपट प्रदर्शित होतात, तेव्हा ‘Pikashow’ सारख्या ॲप्सची मागणी वाढते.
मात्र, अशा प्लॅटफॉर्मवरून मोफत चित्रपट पाहण्याचा मोह तुमच्यासाठी अत्यंत महागडा ठरू शकतो. गृह मंत्रालयांतर्गत असलेल्या ‘सायबर दोस्त’ (I4C) या संस्थेने अशा ॲप्सच्या वापराबाबत गंभीर इशारा दिला आहे.
डेटा आणि बँक खाते धोक्यात
सायबर दोस्तने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती शेअर करताना स्पष्ट केले की, मोफत चित्रपट देणारे हे ॲप्स पूर्णपणे असुरक्षित आहेत. जेव्हा हे ॲप्स स्मार्टफोनमध्ये इंस्टॉल केले जातात, तेव्हा त्यासोबत मॅलवेअर आणि स्पायवेअरसारखे धोकादायक व्हायरस तुमच्या फोनमध्ये प्रवेश करतात.
हे व्हायरस तुमच्या फोनमधील खाजगी माहिती चोरण्यासोबतच तुमच्या बँकिंग लॉगिन आयडी आणि पासवर्डवर डल्ला मारू शकतात. यामुळे एका ‘क्लिक’वर तुमचे बँक खाते रिकामे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कायदेशीर कारवाईचे संकट
पायरेटेड कंटेंट पाहणे हा केवळ सुरक्षेचा प्रश्न नसून तो एक कायदेशीर गुन्हा देखील आहे. सायबर दोस्तच्या मते, अशा अनधिकृत ॲप्सद्वारे चित्रपट पाहिल्यास किंवा डाऊनलोड केल्यास तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. सायबर गुन्हेगारीच्या नियमांनुसार पायरेसीला प्रोत्साहन देणे दंडनीय मानले जाते.
कशी घ्याल काळजी?
- मनोरंजनासाठी नेहमी नेटफ्लिक्स, डिस्ने प्लस हॉटस्टार किंवा ॲमेझॉन प्राईम यांसारख्या अधिकृत आणि कायदेशीर माध्यमांचाच वापर करा.
- अनोळखी वेबसाइटवरून कोणत्याही एपीके फाईल्स डाऊनलोड करू नका, कारण त्या फोनची सुरक्षा यंत्रणा कमकुवत करतात.
- जर तुमच्या फोनमध्ये असे कोणतेही ॲप असेल, तर ते तातडीने काढून टाका आणि तुमचे आर्थिक व्यवहार सुरक्षित करण्यासाठी पासवर्ड बदलून घ्या.
तुमची थोडीशी सतर्कता तुम्हाला मोठ्या आर्थिक आणि कायदेशीर संकटातून वाचवू शकते.
हे देखील वाचा – Bhagavad Gita : ‘भगवद्गीता हा धार्मिक ग्रंथ नाही, तर…’; मद्रास उच्च न्यायालयाचे निरीक्षण









