Facebook Creator Fast Track program earnings : सोशल मीडिया दिग्गज ‘मेटा’ मालकीच्या फेसबुकने क्रिएटर्ससाठी एक अत्यंत फायदेशीर योजना जाहीर केली आहे. ‘क्रिएटर फास्ट ट्रॅक’ (Creator Fast Track) असे या नवीन उपक्रमाचे नाव असून, याद्वारे यूजर्सला फेसबुकवर आपली व्याप्ती वाढवण्यासाठी आणि मोठी कमाई करण्यासाठी थेट मदत केली जाणार आहे.
या अंतर्गत निवडक क्रिएटर्सना सलग तीन महिने ठराविक रकमेचे मानधन दिले जाईल, जेणेकरून त्यांना प्लॅटफॉर्मवर स्थिर होण्यास मदत होईल.
मिळणार इतके मानधन
हा प्रोग्राम प्रामुख्याने अशा लोकांसाठी आहे ज्यांचे इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठे फॉलोअर्स आहेत. मानधनाचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे:
- १ लाख फॉलोअर्स: ज्यांचे इंस्टाग्राम, टिक टॉक किंवा यूट्यूबवर किमान १ लाख फॉलोअर्स आहेत, त्यांना दरमहा १,००० डॉलर्स (सुमारे ८३,००० रुपये) दिले जातील.
- १० लाख फॉलोअर्स: ज्यांचे फॉलोअर्स १० लाखांपेक्षा जास्त आहेत, ते दरमहा ३,००० डॉलर्स (सुमारे २.५ लाख रुपये) मिळवण्यासाठी पात्र असतील.
हे मानधन सलग तीन महिने दिले जाईल. याशिवाय, या प्रोग्राममध्ये सहभागी होणाऱ्यांना फेसबुकच्या जाहिरातींमधून अतिरिक्त पैसे कमवण्याची संधीही त्वरित उपलब्ध करून दिली जाईल.
फेसबुकने वाटले तब्बल ३ अब्ज डॉलर्स
फेसबुकने दिलेल्या माहितीनुसार, २०२५ मध्ये कंपनीने क्रिएटर्सना तब्बल ३ अब्ज डॉलर्सचे मानधन दिले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यामध्ये ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, एकूण कमाईपैकी ६० टक्के वाटा हा केवळ ‘रील्स’ बनवणाऱ्यांना मिळाला आहे. दरवर्षी १०,००० डॉलर्सपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या क्रिएटर्सच्या संख्येतही ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
यशाचा मागोवा घेण्यासाठी नवे निकष
क्रिएटर्सना त्यांच्या कामाचा मोबदला अचूक मिळावा, यासाठी फेसबुकने काही नवीन मापदंड आणले आहेत:
- पात्र व्ह्यूज: ज्या व्ह्यूजवर प्रत्यक्षात पैसे मिळणार आहेत त्यांची माहिती.
- कमाईचा दर: प्रत्येक १,००० पात्र व्ह्यूजमागे होणारी अंदाजे कमाई.
- अपात्र व्ह्यूज: काही व्ह्यूजवर पैसे का मिळाले नाहीत, याचे सविस्तर कारण.
सहभागी कसे व्हायचे?
सध्या फेसबुकचा हा प्रोग्राम केवळ निमंत्रणाद्वारे (Invite-only) उपलब्ध आहे. मात्र, जर तुम्हाला यामध्ये रस असेल, तर तुम्ही तुमच्या फेसबुक मोबाईल ॲपमधील ‘प्रोफेशनल डॅशबोर्ड’वर जाऊन ‘मॉनेटायझेशन’ टॅबमध्ये आपला रस व्यक्त करणारा अर्ज भरू शकता. फेसबुक तर्फे तुमच्या प्रोफाईलची तपासणी करून तुम्हाला पुढील प्रक्रियेसाठी निवडले जाईल.










