Facebook Passkeys Feature | फेसबुकची मालकी कंपनी मेटाने यूजर्ससाठी खास फीचर आणले आहे. कंपनीने फेसबुक यूजर्ससाठी पासकी (Facebook Passkeys Feature) नावाची नवीन लॉगिन सुविधा सादर केली आहे. यामुळे फेसबुक अकाउंट अधिक सुरक्षित होणार आहे.
या नव्या फीचरद्वारे यूजर्स आता फिंगरप्रिंट किंवा चेहऱ्याच्या वापर करून फेसबुक आणि लवकरच मेसेंजरवर लॉगिन करू शकतील. पारंपरिक पासवर्डच्या तुलनेत ही पद्धत अधिक सुरक्षित आणि सोपी आहे, ज्यामुळे हॅकिंगचा धोका कमी होईल.
पासकी म्हणजे काय?
पासकी ही एक डिजिटल क्रेडेंशियल आहे, जी फिंगरप्रिंट, चेहरा किंवा पिन वापरून यूजर्सची ओळख पडताळते. यामुळे पासवर्ड लक्षात ठेवण्याची गरज नाही. मेटाने FIDO अलायन्सच्या सहकार्याने हे तंत्रज्ञान विकसित केले आहे, ज्याचा उद्देश पासवर्डवरील अवलंबित्व कमी करणे आहे.
पासकी लवकरच iOS आणि Android डिव्हाइसेसवर फेसबुकसाठी उपलब्ध होईल आणि येत्या काही महिन्यांत मेसेंजरवरही लागू होईल. एकदा सेट केलेला पासकी दोन्ही प्लॅटफॉर्मवर कार्य करेल.
सुरक्षेची हमी
पासकी पारंपरिक पासवर्ड आणि वन टाइम एसएमएस कोड्सपेक्षा अधिक सुरक्षित आहे. यामुळे अकाउंट हॅक होण्याचा धोका कमी होतो. पासकी आणि त्यासाठी वापरले जाणारे फिंगरप्रिंट, फेस स्कॅन किंवा पिन केवळ यूजर्सच्या डिव्हाइसवरच साठवले जाते.
पासकी केवळ फेसबुक लॉगिनपुरते मर्यादित नाही. मेटा पेद्वारे खरेदी करताना पेमेंट माहिती सुरक्षितपणे ऑटोफिल करण्यासाठी आणि भविष्यात मेसेंजरच्या एन्क्रिप्टेड मेसेज बॅकअपच्या संरक्षणासाठीही याचा उपयोग होईल. यूजर्स फेसबुकच्या सेटिंग्जमधील अकाऊंट्स सेंटरमधून पासकी सेट आणि व्यवस्थापित करू शकतात. लॉगिनदरम्यानही पासकी सेट करण्याचा पर्याय मिळेल.