Google Chrome Security Update : इंडियन कॉम्प्युटर इमरजेंसी रिस्पाॅन्स टीम (CERT-In) या भारत सरकारच्या सायबर सुरक्षा एजन्सीने गुगल क्रोम वापरणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि गंभीर इशारा जारी केला आहे.
जे लोक विंडोज, macOS आणि लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमवर क्रोम ब्राउजरचा वापर करत आहेत, त्यांची खासगी माहिती आणि गोपनीयता धोक्यात आली आहे. हॅकर्स दूर बसून तुमचा डिवाइस नियंत्रित करू शकतात आणि त्यातून गोपनीय डेटा चोरू शकतात. त्यामुळे, CERT-In ने सर्व वापरकर्त्यांना लवकरात लवकर क्रोम ब्राउजरला अपडेट करण्याचा तातडीचा सल्ला दिला आहे.
CERT-In चा ‘हाय रिस्क’ इशारा कशासाठी?
सरकारी सायबर सुरक्षा एजन्सीने आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे की, गुगल क्रोमच्या वेब ब्राउजरमध्ये अनेक गंभीर तांत्रिक त्रुटी आहेत. या त्रुटींमुळे हॅकर्स कोणत्याही डिवाइसमध्ये सहज प्रवेश करू शकतात. ही त्रुटी V8 JavaScript इंजिन, एक्सटेंशन, ऑटोफिल, मीडिया आणि ऑम्निबॉक्स सारख्या महत्त्वाच्या घटकांमध्ये आढळून आली आहे.
टाईप कन्फ्युजन आणि पॉलिसी बायपाससारख्या समस्यांमुळे हॅकर्संना विशिष्ट कोड चालवून सिस्टीमवर संपूर्ण नियंत्रण मिळवता येणे शक्य आहे. या धोक्याची तीव्रता लक्षात घेऊन, CERT-In ने याला ‘हाय रिस्क’ श्रेणीत वर्गीकृत केले आहे.
लिनक्ससाठी क्रोमचे 142.0.7444.59 वर्जन किंवा त्यापूर्वीचे, तर विंडोज आणि मॅकसाठी 142.0.7444.59/60 वर्जन किंवा त्यापूर्वीचे वर्जन वापरत असलेल्यांना याचा थेट धोका आहे.
गुगल क्रोम सुरक्षितपणे अपडेट करण्याची पद्धत:
या गंभीर सायबर धोक्यापासून बचाव करण्यासाठी, CERT-In ने गुगल क्रोमचे नवीनतम वर्जन 142.0.7444.60 किंवा त्यानंतरच्या वर्जनमध्ये अपडेट करण्याची शिफारस केली आहे.
अपडेट करण्यासाठी, क्रोम ब्राउजरच्या मेन्यूमध्ये जा. त्यानंतर ‘हेल्प’ पर्याय निवडून ‘अबाउट गुगल क्रोम’ वर क्लिक करा. एक नवीन विंडो उघडेल, जिथे क्रोमचे नवीनतम अपडेट आपोआप डाउनलोड होऊन इन्स्टॉल होण्यास सुरुवात होईल. इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यावर, सुरक्षा कार्यान्वित करण्यासाठी ब्राउजर रीस्टार्ट करणे आवश्यक आहे.
हे देखील वाचा – Ajit Pawar : ‘निवडून यायचं होतं म्हणून…’; शेतकरी कर्जमाफीबाबत अजित पवारांचे मोठे वक्तव्य









