अHealthy Chicken Biryani: अनेकदा वजन कमी करण्याच्या प्रवासात आपल्याला आवडते पदार्थ खाण्यावर मर्यादा येतात. त्यातच जर ‘बिर्याणी’ खाण्याची इच्छा झाली, तर आपण अनेकदा ती टाळतो. पण आता चिंता सोडा! एका फिटनेस कोचने अशी रेसिपी सुचवली आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही डाएट न मोडता बिर्याणीचा आस्वाद घेऊ शकता. ही रेसिपी केवळ चविष्टच नाही, तर वेट लॉससाठीही पूरक आहे.
ही बिर्याणी का आहे आरोग्यदायी?
- प्रोटीनचा उत्तम स्रोत: चिकनमुळे स्नायूंच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले भरपूर प्रोटीन मिळते.
- नियंत्रित घटक: यात बाहेर मिळणाऱ्या बिर्याणीप्रमाणे अतिरिक्त तुपाचा वापर टाळला जातो, त्यामुळे फॅट आणि कर्बोदकांचे प्रमाण नियंत्रणात राहते.
- कॅलरी: ही रेसिपी दोन लोकांसाठी असून यात एकूण ७२० ते ७८० कॅलरी आहेत. यात ५५ ते ६० ग्रॅम प्रोटीन आणि २२ ते २५ ग्रॅम फॅट असते.
साहित्य (दोन लोकांसाठी)
- २ चिकन लेग पीस
- १/२ कप तांदूळ (किंवा ब्राऊन राईस)
- २ ते ३ चमचे दही
- १ चमचा लिंबाचा रस
- आलं-लसूण पेस्ट, मीठ आणि बिर्याणी मसाला
- तमालपत्र आणि खडा मसाला
- १ चमचा ऑलिव्ह ऑईल
- १ कांदा (उभा चिरलेला), हिरवी मिरची, कोथिंबीर आणि पुदिना
बनवण्याची पद्धत
- मॅरिनेशन: एका भांड्यात दही, लिंबाचा रस, मीठ, बिर्याणी मसाला आणि आलं-लसूण पेस्ट एकत्र करून चिकनला लावा आणि काही वेळ बाजूला ठेवा.
- तांदूळ शिजवणे: पाणी गरम करून त्यात तमालपत्र आणि खडा मसाला घालून तांदूळ अर्धवट शिजवून घ्या.
- कुकिंग: एका जाड तळाच्या भांड्यात १ चमचा ऑलिव्ह ऑईल गरम करून त्यात कांदा आणि मिरची परतून घ्या. आता मॅरिनेट केलेले चिकन घालून ते शिजवून घ्या.
- लेअरिंग: शिजवलेल्या चिकनवर अर्धवट शिजवलेला तांदूळ पसरावा. त्यावर तळलेला कांदा, कोथिंबीर, पुदिना आणि चिमूटभर बिर्याणी मसाला व मीठ टाका.
- वाफ देणे: भांड्यावर झाकण ठेवून मंद आचेवर काही मिनिटे वाफ द्या.
तुमची गरमागरम आणि हाय-प्रोटीन चिकन बिर्याणी तयार आहे. ही रेसिपी तुमच्या वेट लॉस प्रवासाला न थांबवता, जिभेचे चोचले पुरवण्यासाठी उत्तम पर्याय आहे.











