Women Heart Health: सध्याच्या धावपळीच्या जीवनात महिलांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, महिलांमध्ये कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या तुलनेत हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या अधिक आहे.
महिलांमध्ये या आजाराची लक्षणे पुरुषांच्या तुलनेत वेगळी असतात, त्यामुळे अनेकदा त्याचे निदान होण्यास उशीर होतो. वेळीच सावध झाल्यास आणि योग्य काळजी घेतल्यास हा धोका टाळता येऊ शकतो.
हृदयविकाराचा धोका वाढवणारे घटक:
कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि धूम्रपान यांसारख्या सामान्य कारणांव्यतिरिक्त महिलांमध्ये काही विशिष्ट जोखीम घटक असतात:
- गरोदरपणातील समस्या: गरोदरपणात उच्च रक्तदाब किंवा मधुमेह असल्यास भविष्यात हृदयविकाराचा धोका वाढतो.
- PCOS आणि ऑटोइम्यून आजार: पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम, ल्युपस आणि संधिवात यांसारखे आजार असलेल्या महिलांमध्ये हृदयाच्या समस्या अधिक उद्भवू शकतात.
- अर्ली मेनोपॉज: ज्या महिलांची रजोनिवृत्ती 45 वर्षांच्या आधी होते, त्यांच्यात इस्ट्रोजेन हार्मोनची पातळी कमी झाल्यामुळे हृदयाचे आजार वाढण्याची शक्यता असते.
महिलांमधील हृदयविकाराची ७ प्रमुख लक्षणे:
महिलांना हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी खालील लक्षणे जाणवू शकतात, ज्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते:
- छातीत दुखणे किंवा जडपणा येणे.
- अचानक चक्कर येणे.
- उलट्या होणे किंवा मळमळणे.
- श्वास घेण्यास अडथळा निर्माण होणे.
- पाठीमध्ये तीव्र वेदना होणे.
- अंगाला अचानक गार घाम येणे.
- कोणत्याही कारणाशिवाय प्रचंड थकवा जाणवणे.
निदान आणि उपचार
पुरुषांमध्ये अनेकदा मुख्य रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा (ब्लॉकेज) असतो, परंतु महिलांमध्ये लहान रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. यामुळे सामान्य चाचण्यांमध्ये अनेकदा आजाराचे निदान होत नाही. अशा वेळी डॉक्टर पीईटी स्कॅन किंवा एमआरआय यांसारख्या प्रगत चाचण्यांचा सल्ला देतात.
हृदय निरोगी ठेवण्यासाठी ५ सोपे उपाय:
- लक्षणे दिसल्यास घरगुती उपाय करण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- संतुलित आहार घ्या आणि दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम करा.
- रक्तदाब, साखर आणि कोलेस्ट्रॉलची नियमित तपासणी करा.
- शरीरातील कोणत्याही बदलाकडे किंवा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.
- तणावापासून दूर राहण्यासाठी योगासने किंवा छंदांना वेळ द्या.











