दोन भावांनी एकाच तरुणीशी लग्न केले, ‘या’ राज्यातील ‘बहुपती प्रथा’ काय आहे?

Himachal Pradesh Polyandry

Himachal Pradesh Polyandry: भारतात सर्वसाधारणपणे एकापेक्षा अधिक व्यक्तींशी लग्न करणे हे कायदेशीर व नैतिकदृष्ट्या योग्य मानले जात नाही. पण प्रदेशानुसार लग्नाच्या प्रथा देखील वेगळ्या असल्याचे पाहायला मिळते. अशीच लग्नाची एक वेगळी प्रथा सध्या चर्चेत आहे.

हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh Polyandry) शिलाई गावात दोन भावांनी एकाच तरूणीशी विवाह केल्याची घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

तीन दिवस चाललेला विवाहसोहळा, गावकऱ्यांमध्ये उत्साह

सिरमौर जिल्ह्यातील शिलाई परिसरातील कुन्हाट गावातील सुनीता चौहान हिने शिलाई गावातील दोन सख्खे भाऊ प्रदीप आणि कपिल नेगी यांच्याशी लग्न केले आहे. हा पारंपरिक विवाहसोहळा तीन दिवस चालला.

विशेष म्हणजे त्यांच्या या विवाहात गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पारंपरिक पोशाख, लोकनृत्ये, पारंपरिक संगीत यामुळे संपूर्ण वातावरण आनंदमय झाले होते.

प्रदीप हे हिमाचलमधील सरकारी विभागात कार्यरत आहेत, तर त्यांचा भाऊ कपिल परदेशात नोकरी करत आहे. या दोघांनीही संयुक्त कुटुंब पद्धती कायम ठेवण्यासाठी एकाच मुलीशी विवाह करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.

सुनीता चौहान हिने स्पष्ट केले की, हा निर्णय तिने पूर्णतः स्वेच्छेने घेतला असून, हट्टी जमातीची परंपरा तिला माहिती होती. तिला कोणताही दबाव नव्हता. त्यांचा हा विवाह सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

बहुपती परंपरेचा ऐतिहासिक संदर्भ

हट्टी जमात ही हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड सीमेवर वसलेली आदिवासी जमात आहे. तीन वर्षांपूर्वी केंद्र सरकारने या जमातीला अनुसूचित जमात म्हणून मान्यता दिली होती. पूर्वी या भागात बहुपती प्रथा सामान्य होती. विशेषतः दुर्गम भागांतील कुटुंबांमध्ये, जिथे जमीन विभागणी टाळण्यासाठी भावांनी एका स्त्रीशी विवाह करणे हे स्वीकारले जायचे.

हिमाचलचे पहिले मुख्यमंत्री डॉ. वाय.एस. परमार यांनी याच प्रथेवर लखनऊ विद्यापीठातून पीएचडी केली होती. त्यांच्या अभ्यासानुसार, बहुपती परंपरेचे सामाजिक आणि आर्थिक मुळं आहेत. जमिनीचे विखंडन टाळण्यासाठी व एकत्रित कुटुंब पद्धती जपण्यासाठी ही पद्धत वापरली जायची.

आजच्या काळात ही प्रथा फारशी आढळत नाही. शिक्षण, आर्थिक सुधारणा आणि सामाजिक बदलांमुळे बहुपती विवाह दुर्मीळ झाले आहेत. मात्र अशा विवाहामुळे परंपरेचा ठसा अजूनही काही भागांमध्ये दिसून येतो.