HSRP Number Plate : वाहनांची चोरी रोखण्यासाठी आणि सुरक्षेसाठी सरकारने हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट अनिवार्य केली आहे. मात्र, आता याच यंत्रणेचा गैरफायदा घेऊन बनावट नंबर प्लेट लावणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत.
अनेक ठिकाणी अधिकृत प्लेटसारख्या दिसणाऱ्या बनावट प्लेट्स तयार करून वाहन चालकांची फसवणूक केली जात आहे. यामुळे तुमचे वाहन केवळ पोलीस रेकॉर्डमध्ये संशयास्पद ठरू शकते असे नाही, तर तुम्हाला कायदेशीर कारवाईलाही सामोरे जावे लागू शकते.
जुन्या वाहनांवर HSRP कशी लावाल?
1 एप्रिल 2019 पूर्वी खरेदी केलेल्या वाहनांसाठी मालकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन ही प्लेट बसवून घेणे गरजेचे आहे. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असून ती अत्यंत पारदर्शक आहे:
- अधिकृत पोर्टल: वाहन मालकांनी ‘SIAM’ अधिकृत पोर्टलला भेट देऊन आपल्या सोयीनुसार जवळच्या अधिकृत डीलरची निवड करावी.
- ऑनलाइन पेमेंट: नंबर प्लेटसाठी लागणारे शुल्क केवळ ऑनलाइन पद्धतीनेच भरायचे असते. रोख रक्कम (कॅश) स्वीकारण्याची कोणतीही तरतूद यामध्ये नाही.
- अपॉइंटमेंट: पेमेंट पूर्ण झाल्यावर तुम्हाला हवी ती तारीख आणि वेळ निवडून तुम्ही डीलरकडे जाऊन प्लेट बसवून घेऊ शकता.
बनावट नंबर प्लेट ओळखण्यासाठी ‘हे’ 6 नियम पाळा:
परिवहन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्यासाठी खालील मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत:
- अधिकृत वेबसाईटचा वापर: नंबर प्लेटचे बुकिंग करण्यासाठी केवळ transport.maharashtra.gov.in किंवा अधिकृत सरकारी पोर्टलचाच वापर करा.
- रोख व्यवहार टाळा: जर कोणी नंबर प्लेटसाठी रोख पैसे मागत असेल, तर सावध व्हा. अधिकृत प्रक्रिया फक्त ऑनलाइन पेमेंटवर चालते.
- कागदपत्रांची पडताळणी: नंबर प्लेट बसवण्यापूर्वी अधिकृत डीलर तुमच्या वाहनाचा चेसिस नंबर आणि मूळ कागदपत्रे तपासेल, याची खात्री करा.
- लेझर कोड जुळवून पाहा: प्लेट बसवल्यानंतर vahan.parivahan.gov.in वरून तुमची आरसी (RC) डाऊनलोड करा. तुमच्या नंबर प्लेटवर असलेला लेझर कोड आणि आरसीवरील कोड एकच असल्याची खात्री करा.
- आरसीवरील नोंद तपासा: जर आरसीवर लेझर कोड नसेल किंवा तो वेगळा असेल, तर ती प्लेट बनावट असण्याची शक्यता असते.
- तात्काळ तक्रार करा: कोणत्याही प्रकारची शंका आल्यास किंवा डीलरने सहकार्य न केल्यास तात्काळ परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर तक्रार नोंदवा.
अनेकदा वेळ वाचवण्यासाठी वाहन मालक स्थानिक मेकॅनिककडून बनावट प्लेट बनवून घेतात. मात्र, अधिकृत डीलरकडून बसवलेली आणि आरसीवर नोंद असलेली प्लेटच कायदेशीर मानली जाते. स्वस्त आणि सोप्या पर्यायांच्या नादात स्वतःची सुरक्षा धोक्यात घालू नका.
हे देखील वाचा – WhatsApp वर गुपितं राहतील सुरक्षित! कोणालाही दिसणार नाहीत तुमचे खास चॅट्स; फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स









