Indian Student in US: अमेरिकेतील अर्कांसास येथे शिक्षण घेत असलेल्या एका भारतीय विद्यार्थ्याला (Indian Student in US) सध्या खूप कठीण स्थितीचा सामना करावा लागत आहे. एका रेडिट पोस्टमध्ये या विद्यार्थ्यांना त्याची सर्व कागदपत्रे हरवली असल्याचे व सध्या निवारागृहात राहत असल्याचे म्हटले आहे.
रेडिटवर ‘A’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या विद्यार्थ्याने सांगितले की, त्याच्या कुटुंबाने त्याला साथ दिली नाही आणि त्याच्या भावाने त्याच्यावर शारीरिक व मानसिक छळ केला. त्यामुळे तो आता बेघर झाला असून, एका निवारागृहात आश्रय घेत आहे.
पासपोर्ट हरवला, दूतावासाकडून मदतीची प्रतीक्षा
अर्कांसासमधून पलायन केल्यानंतर या विद्यार्थ्याचा पासपोर्ट हरवला आहे. त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली असून, ह्यूस्टनमधील भारतीय वाणिज्य दूतावासाशी संपर्क साधण्याचे अनेक प्रयत्न केले आहेत. मात्र, कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.
“माझ्याकडे ना पैसे आहेत, ना ओळखपत्र, आणि दूतावासाने मदत केली नाही तर कायदेशीर मार्गाने भारतात परत जाणे अशक्य आहे,” असे त्याने म्हटले आहे. दिल्लीतील परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून, मदत पोर्टलवर तक्रार नोंदवूनही कोणतीही कारवाई झाली नसल्याची खंतही त्याने व्यक्त केली.
मायदेशी परतीसाठी समाज माध्यमांतून मदतीची मागणी
हा विद्यार्थी सुरक्षितपणे आणि सन्मानाने मायदेशी परतण्यासाठी विविध माध्यमातून मदतीची अपेक्षा करत आहे. त्याने भारतीय दूतावासातील अधिकारी, मानवाधिकार कार्यकर्ते, पत्रकार, स्वयंसेवी संस्था, किंवा आप्रवासन वकिलांशी संपर्क करून मदत मिळावी, अशी नम्र विनंती केली आहे.
सोशल मीडियावर अनेकांनी दिले मार्गदर्शन
या विद्यार्थ्याच्या भावनिक आणि आर्थिक अडचणी पाहून अनेक रेडिट युझर्स मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. काहींनी स्थानिक धार्मिक संस्थांशी संपर्क साधण्याचे मार्ग सुचवले.
एका युझरने लिहिले की, “तुमच्याकडे असलेली सर्व कागदपत्रे सांभाळा आणि तातडीने आपत्कालीन प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न करा.” तर दुसऱ्याने म्हटले, “मी ह्यूस्टनमध्येच आहे. मी सोमवारी दूतावासात जाऊन तुमच्यासाठी विचारू शकतो.” त्याची ही रेडिट पोस्ट व्हायरल झाली असून, यावर अनेकजण प्रतिक्रिया देत आहे.