Health Tips: महिलांच्या आयुष्यात 40 वर्षांचा टप्पा हा अनेक शारीरिक आणि हार्मोनल (Hormonal) बदलांचा असतो. अनेक महिला या काळात मेनोपॉजच्या (मासिक पाळी थांबण्याच्या) जवळ पोहोचतात. या हार्मोनल बदलांचा थेट परिणाम शरीरावर होतो, ज्यामुळे हाडे आणि स्नायू कमकुवत होऊ लागतात.
म्हणूनच, या वयात महिलांनी काही चांगल्या सवयी अंगीकारणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून मेनोपॉजच्या काळात आणि त्यानंतरही त्या निरोगी व तंदुरुस्त राहू शकतील. तज्ज्ञांनी 40 वर्षांवरील महिलांसाठी 5 अत्यंत महत्त्वाच्या सवयी सांगितल्या आहेत:
1. नियमित वजन उचलण्याचे व्यायाम करा
प्रत्येक महिलेने दररोज वजन उचलण्याचे व्यायाम करणे आवश्यक आहे. वयाच्या 35 नंतर शरीरातील हाडे आणि स्नायूंचे आरोग्य हळूहळू कमी होऊ लागते. मेनोपॉज नंतर ही प्रक्रिया अधिक वेगवान होते.
नियमित वेट लिफ्टिंगमुळे हाडे मजबूत राहतात आणि स्नायूंना बळकटी मिळते. यासाठी तुम्ही आठवड्यातून किमान 3 दिवस 30 मिनिटे जिममध्ये किंवा घरी डंबेलने व्यायाम करू शकता. यामुळे हार्मोन्स सक्रिय होतात आणि शरीर मजबूत बनते.
2. सतत सक्रिय राहा आणि मोबिलिटीवर लक्ष द्या
सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेक महिलांना तासनतास खुर्चीवर बसून काम करावे लागते. मात्र, जास्त वेळ एकाच स्थितीत बसल्याने सांध्यांमध्ये (Joints) कडकपणा येतो आणि आर्थरायटिससारख्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे शरीराला लवचिक (Flexible) ठेवणे महत्त्वाचे आहे. दररोज किमान 10 मिनिटे मोबिलिटी एक्सरसाइज (शरीराची लवचिकता टिकवणारे व्यायाम) करा. रोज शक्य नसल्यास, आठवड्यातून एकदा 60 मिनिटे वेळ द्या.
3. रोज चालण्याची सवय लावा
तंदुरुस्ती राखण्यासाठी चालणे हा सर्वात सोपा आणि परिणामकारक व्यायाम आहे. रोज किमान 7000 पाऊले चालण्याची सवय लावा. यामुळे हृदय (Heart) निरोगी राहते, अनेक आजारांचा धोका कमी होतो आणि तुमचे आयुष्य वाढते. मेनोपॉज नंतर वजन कमी (Weight Loss) करायचे असल्यास, रोज 10,000 ते 12,000 पाऊले चालण्याचा प्रयत्न करा.
4. पोषणयुक्त आहारावर भर द्या
40 नंतर शरीरात होणाऱ्या बदलांमुळे आहारात योग्य पोषक तत्वांचा समावेश करणे महत्त्वाचे आहे. आहारात प्रोटीन (Protein) आणि फायबर (Fiber) चे प्रमाण वाढवा. यामुळे स्नायूंना पोषण मिळते आणि पचनक्रिया चांगली राहते.
जर शरीरात कोणत्याही पोषक तत्त्वाची कमतरता जाणवत असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक सप्लिमेंट्स घ्या. तसेच, शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी दिवसभर पुरेसे पाणी प्या.
5. आराम आणि पुरेशी झोप
अनेक महिला वर्कआउट आणि डाएटवर लक्ष देतात, पण पुरेशी झोप आणि विश्रांतीकडे दुर्लक्ष करतात. मात्र, सततचा ताण (Stress) आणि अपुरी झोप शरीराला लवकर थकवते आणि वेळेपूर्वी वृद्धत्व (Aging) आणू शकते. त्यामुळे, निरोगी आणि उत्साही राहण्यासाठी तुमच्या दैनंदिन जीवनात पुरेशा झोपेचा आणि आरामाचा समावेश करा.
हे देखील वाचा – World’s Longest Car: चालता-फिरता राजवाडा! ‘ही’ आहे जगातील सर्वात मोठी कार; सुविधा पाहून थक्क व्हाल









