MH370 Airlines flight Mystery : विमान वाहतूक क्षेत्रातील सर्वात मोठे गूढ मानले जाणारे मलेशिया एअरलाईन्सचे MH370 विमान शोधण्यासाठी तब्बल 12 वर्षांनंतर पुन्हा एकदा मोहिमेला सुरुवात झाली आहे. हिंद महासागराच्या अथांग पाण्याखाली या विमानाचा ढिगारा शोधण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन शोधमोहीम आखण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं होतं?
8 मार्च 2014 रोजी मध्यरात्री मलेशिया एअरलाईन्सचे बोईंग 777 विमान कुआलालंपूरहून बीजिंगसाठी निघाले होते. या विमानात 239 प्रवासी आणि कर्मचारी होते. उड्डाणानंतर सुमारे 40 मिनिटांनी विमानाचा ट्रान्सपॉन्डर बंद झाला आणि नागरी एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या रडारवरून विमान गायब झाले. लष्करी रडारच्या माहितीनुसार, विमानाने अचानक पश्चिमेकडे वळण घेतले आणि हिंद महासागराच्या दिशेने प्रवास केला.
कसा होणार शोध?
ब्रिटीश-अमेरिकन कंपनी ‘ओशन इन्फिनिटी’ (Ocean Infinity) ही या मोहिमेचे नेतृत्व करत आहे.
- अत्याधुनिक ड्रोन्स: कंपनीने समुद्राच्या तळाशी शोध घेण्यासाठी स्वयंचलित अंडरवॉटर ड्रोन्सचा ताफा तैनात केला आहे.
- अल्ट्रासाऊंड इमेजिंग: हे ड्रोन्स समुद्राच्या तळाशी अनेक वर्षांपासून साचलेल्या गाळाखालीही पाहू शकतात, ज्यामुळे विमानाचा ढिगारा शोधणे सोपे होईल.
- नवा परिसर: जुन्या शोधमोहिमेत सुमारे 1,20,000 चौरस किलोमीटरचा परिसर शोधला गेला होता. आता करंट आणि वाऱ्याच्या गतीचा अभ्यास करून संशोधकांनी सुमारे 5,800 चौरस मैलांचा परिसर निश्चित केला आहे, जिथे यश मिळण्याची दाट शक्यता आहे.
‘अवशेष सापडले तरच फी’
मलेशिया सरकारने ओशन इन्फिनिटीसोबत ‘नो-फाइंड, नो-फी’ असा करार केला आहे. याचा अर्थ असा की, जर कंपनीला विमानाचा ढिगारा सापडला, तरच सरकार त्यांना 70 दशलक्ष डॉलर्स देईल. जर शोध लागला नाही, तर कंपनीला कोणतेही पैसे मिळणार नाहीत.
या विमानातील प्रवासी चीन, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, अमेरिका आणि युक्रेनसह 14 वेगवेगळ्या देशांचे होते. 12 वर्षांपासून त्यांच्या नातेवाईकांना एका उत्तराची प्रतीक्षा आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास 1937 मधील अमेलीया एअरहार्ट यांच्या बेपत्ता होण्यानंतरच्या जगातील सर्वात मोठ्या विमान रहस्याचा उलगडा होऊ शकतो.









