Bollywood Big Releases 2026 : भारतीय चित्रपटसृष्टीसाठी 2026 हे वर्ष ऐतिहासिक ठरणार असून या वर्षी आतापर्यंतचे सर्वात भव्य चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतील. बॉलीवूडचे हे मेगा प्रोजेक्ट्स जागतिक स्तरावर नवीन विक्रम प्रस्थापित करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
रामायण (Ramayana – Part 1)
दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा हा प्रोजेक्ट भारतीय सिनेमातील आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट आहे. याच्या दोन्ही भागांचे एकूण बजेट सुमारे 4000 कोटी रुपयांहून अधिक आहे. रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत, साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत, यश रावणाच्या भूमिकेत आणि सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट दिवाळी 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे.
किंग (King)
शाहरूख खान आणि त्याची मुलगी सुहाना खान पहिल्यांदाच या ॲक्शन-थ्रिलरमध्ये एकत्र दिसणार आहेत. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटाचे बजेट सुमारे 350 कोटी रुपये असून यात अभिषेक बच्चन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 2026 च्या उत्तरार्धात रिलीज होईल.
बॉर्डर 2 (Border 2)
1997 च्या ऐतिहासिक ‘बॉर्डर’चा हा अधिकृत सिक्वेल असून तो 1971 च्या लोंगेवाला युद्धावर आधारित आहे. सनी देओल पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत असून त्याच्या सोबतीला वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी दिसतील. हा चित्रपट 23 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.
बॅटल ऑफ गालवान (Battle of Galwan)
भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये 2020 मध्ये झालेल्या संघर्षावर आधारित हा चित्रपट असून यात सलमान खान कर्नल संतोष बाबू यांच्या भूमिकेत दिसणार आहे. सलमान खान आणि चित्रांगदा सिंग यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट 17 एप्रिल 2026 रोजी रिलीज होईल.
धुरंधर 2 (Dhurandhar 2)
आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाच्या पहिल्या भागाच्या अभूतपूर्व यशानंतर आता त्याचा दुसरा भाग प्रेक्षकांसाठी सज्ज आहे. रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट 19 मार्च 2026 रोजी प्रदर्शित होणार असून यात सस्पेन्स आणि ॲक्शनचा मोठा धमाका पाहायला मिळेल.
दृश्यम 3 (Drishyam 3)
विजय साळगावकर आणि त्याच्या कुटुंबाची रहस्यमयी कथा आता तिसऱ्या भागात पुढे जाणार आहे. अजय देवगण, तबू आणि श्रिया सरन यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट 2 ऑक्टोबर 2026 रोजी जागतिक स्तरावर प्रदर्शित केला जाणार आहे.
टॉक्सिक (Toxic: A Fairy Tale for Grown-ups)
‘केजीएफ’ स्टार यशचा हा महत्त्वाकांक्षी ॲक्शन थ्रिलर असून तो ड्रग कार्टेलवर आधारित आहे. यश, नयनतारा आणि कियारा अडवाणी यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट 19 मार्च 2026 रोजी कन्नड, हिंदी आणि इंग्रजीसह अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होईल.
लव्ह अँड वॉर (Love And War)
संजय लीला भन्साळी यांचा हा भव्य चित्रपट असून यात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल ही तगडी स्टारकास्ट पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. हा चित्रपट 14 ऑगस्ट 2026 रोजी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
मर्दानी 3 (Mardaani 3)
राणी मुखर्जी पुन्हा एकदा तडफदार पोलीस अधिकारी शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत परतणार आहे. वायआरएफ बॅनरखाली तयार होणारा हा चित्रपट 27 फेब्रुवारी 2026 रोजी प्रदर्शित होईल.
इक्कीस (Ikkis)
परमवीर चक्र विजेते अरुण खेतरपाल यांच्या शौर्यावर आधारित हा चित्रपट श्रीराम राघवन दिग्दर्शित करत आहेत. अगस्त्य नंदा आणि जयदीप अहलावत यांच्यासोबतच यात ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची शेवटची भूमिका पाहायला मिळणार असून हा चित्रपट 1 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित झाला आहे.
हे देखील वाचा – ‘ठाकरे बंधूंप्रमाणे आम्हीही एकत्र येऊ’; निवडणुकीपूर्वी आनंदराज आंबेडकरांचे मोठे विधान; राजकीय समीकरणे बदलणार?











