MPSC Recruitment 2026 Notification : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली आहे. आयोगाने महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित, गट-अ आणि गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
या भरतीच्या माध्यमातून सामान्य प्रशासन, महसूल, वित्त आणि वन विभागातील विविध संवर्गातील रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. राज्यातील 38 जिल्हा केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार असून, इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे लागतील.
महत्त्वाच्या तारखा आणि वेळापत्रक
- अर्ज करण्याची सुरुवात: 31 डिसेंबर 2025
- अर्ज करण्याची अंतिम मुदत: 20 जानेवारी 2026
- ऑनलाइन शुल्क भरण्याची अंतिम तारीख: 20 जानेवारी 2026
- ऑफलाइन (चलनाद्वारे) शुल्क भरण्याची तारीख: 23 जानेवारी 2026
- संयुक्त पूर्व परीक्षेचा दिनांक: 31 मे 2026
एकूण पदे आणि संवर्गनिहाय रिक्त जागा
या पदभरती प्रक्रियेतून सध्या एकूण 87 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये राज्य सेवेतील 79 आणि महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवेतील 8 जागांचा समावेश आहे. विशेष म्हणजे पूर्व परीक्षेचा निकाल लागेपर्यंत शासनाकडून नवीन मागणीपत्रे आल्यास या पदसंख्येत वाढ होण्याची शक्यताही आयोगाने स्पष्ट केली आहे.
प्रमुख रिक्त पदे:
- सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा (गट-अ): 32 पदे
- सहायक गट विकास अधिकारी (गट-ब): 30 पदे
- उप मुख्य कार्यकारी अधिकारी / गट विकास अधिकारी (गट-अ): 14 पदे
- पशुवैद्यकीय अधिकारी (गट-अ): 8 पदे
- उद्योग अधिकारी, तांत्रिक (गट-ब): 4 पदे
निवड प्रक्रिया आणि पात्रता
ही भरती प्रक्रिया एकूण 3 टप्प्यांत पार पडणार आहे. यामध्ये प्रथम पूर्व परीक्षा घेतली जाईल, त्यानंतर पूर्व परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी स्वतंत्र मुख्य परीक्षा होईल आणि अंतिम टप्प्यात मुलाखत घेतली जाईल. पूर्व परीक्षेचे गुण केवळ मुख्य परीक्षेच्या पात्रतेसाठी गृहीत धरले जातील, त्यांचा अंतिम निवडीत समावेश नसेल.
शैक्षणिक पात्रता: राज्य सेवा पदांसाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. मात्र, वित्त व लेखा सेवा पदांसाठी किमान 55% गुणांसह वाणिज्य पदवी, CA किंवा MBA (Finance) असणे आवश्यक आहे. उद्योग अधिकारी पदासाठी अभियांत्रिकी किंवा विज्ञान शाखेची पदवी, तर पशुवैद्यकीय अधिकारी पदासाठी संबंधित विषयातील पदवी आणि नोंदणी अनिवार्य आहे.
इच्छुक उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून विहित मुदतीत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन आयोगाकडून करण्यात आले आहे.









