37-Digit Amount Credited in Bank Account Viral News: अचानक तुमच्या बँक खात्यात 37 आकडी रक्कम जमा झाली तर? शून्य न मोजता येणारी एवढी मोठी रक्कम बँक खात्यात आल्यास कोणालाही धक्का बसेल. अशीच घटना उत्तर प्रदेशमधील एका 20 वर्षीय तरूणासोबत घडली आहे. (37-Digit Amount Credited in Bank Account Viral News)
या तरुणाच्या कोटॅक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank) बचत खात्यात तब्बल 1.13 लाख कोटी रुपये (10,01,35,60,00,00,00,00,00,01,00,23,56,00,00,00,00,299 रुपये) जमा झाल्याचे पाहून त्याला मोठा धक्का बसला. ही रक्कम 37 आकड्यांमध्ये होती.
सचिन गुप्ता या ट्विटर यूजरने याबाबत ट्विट केल्यानंतर ही माहिती समोर आली. त्यानुसार, दीपक नावाच्या 20 वर्षीय तरुणाला ही रक्कम मिळाली आहे. दीपक म्हणाला की, त्याला 1 अब्ज 13 लाख 56 हजार कोटी रुपयांची रक्कम खात्यात जमा झाल्याचे समजले. यानंतर आयकर विभागाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे आणि त्याचे बँक खाते गोठवण्यात आले आहे.
नेमके काय घडले?
न्यूज24 च्या रिपोर्टनुसानुसार, दीपक आपल्या आईच्या मृत्यूनंतर तिचे बँक खाते वापरत होता. 3 ऑगस्टच्या रात्री दीपकला एक मेसेज आला, ज्यात त्याच्या खात्यात 1.13 लाख कोटी रुपये जमा झाल्याचे दाखवले होते. या मेसेजमुळे तो गोंधळला आणि त्याने त्याच्या मित्रांना शून्य मोजायला सांगितले.
दुसऱ्या दिवशी सकाळी तो बँकेत गेला, तेव्हा बँक अधिकाऱ्यांनी ही रक्कम खरी असल्याचे सांगितले, पण लगेचच हे खाते संशयास्पद असल्याने गोठवण्यात आल्याची माहिती दिली.
बँकेने तात्काळ ही बाब आयकर विभागाला कळवली आणि आता याची सखोल चौकशी सुरू झाली आहे. एवढी मोठी रक्कम जमा झाल्याने आता बँकेने त्याचे खाते गोठवले आहे.
दरम्यान, अधिकारी सध्या ही रक्कम तांत्रिक बिघाडामुळे जमा झाली की मनी लाँडरिंगचा प्रकार आहे, याचा तपास करत आहेत. सखोल चौकशीनंतरच या रकमेचा खरा स्रोत कळू शकेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.