PM Kisan Yojana: वर्ष 2026 च्या सुरुवातीलाच देशातील कोट्यावधी शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेच्या 22 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, केंद्र सरकारने यावेळी नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. जर तुम्ही ठराविक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केल्या नाहीत, तर तुमच्या खात्यात जमा होणारे 2,000 रुपये अडकू शकतात.
आता ‘शेतकरी आयडी’ अनिवार्य
पीएम किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आता प्रत्येक शेतकऱ्याकडे स्वतःचा ‘युनिक शेतकरी आयडी’ असणे आवश्यक आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की, ज्या शेतकऱ्यांकडे हा डिजिटल आयडी नसेल, त्यांना पुढील हप्ता दिला जाणार नाही. हा आयडी आधार कार्डशी जोडलेला असून तो राज्याच्या जमीन महसूल रेकॉर्डशी लिंक असतो. यामुळे जमिनीच्या नोंदीत काही बदल झाल्यास त्याची माहिती आपोआप अपडेट होते, ज्यामुळे सरकारी योजनांचा लाभ मिळणे अधिक पारदर्शक होणार आहे.
ई-केवायसीची अट कायम
केवळ शेतकरी आयडी असून चालणार नाही, तर ‘ई-केवायसी’ (e-KYC) पूर्ण असणे अजूनही बंधनकारक आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवरून, मोबाईल अॅपद्वारे किंवा जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने ही प्रक्रिया पूर्ण करावी. ई-केवायसी न केल्यास लाभार्थी यादीतून नाव कमी होऊ शकते.
२२ वा हप्ता कधी जमा होणार?
मिळालेल्या माहितीनुसार, पीएम किसान योजनेचा 22 वा हप्ता फेब्रुवारी ते मार्च 2026 या कालावधीत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. यापूर्वीचा 21 वा हप्ता 19 नोव्हेंबर 2025 रोजी तामिळनाडूतील कोईमतूर येथून जारी करण्यात आला होता. दर चार महिन्यांनी मिळणारे हे 2,000 रुपये थेट बँक खात्यात (DBT) जमा केले जातात. पुढील हप्ता फेब्रुवारी अथवा मार्च महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.
असे तपासा तुमचे नाव आणि स्टेटस
तुमचा हप्ता येणार की नाही, हे तपासण्यासाठी खालीलप्रमाणे प्रक्रिया करा:
- योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर (pmkisan.gov.in) जा.
- तेथे ‘नो युअर स्टेटस’ (Know your status) या पर्यायावर क्लिक करा.
- तुमचा नोंदणी क्रमांक आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा.
- नोंदणीकृत मोबाईलवर आलेला ओटीपी टाका. त्यानंतर तुम्हाला हप्त्याची स्थिती स्क्रीनवर दिसेल. जर तुमचे नाव लाभार्थी यादीत नसेल, तर तातडीने स्थानिक कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कागदपत्रांची पूर्तता करा.









