Republic Day 2026: भारत यावर्षी आपला ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करणार आहे. २६ जानेवारी २०२६ रोजी दिल्लीतील कर्तव्य पथावर होणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्याची तयारी सध्या अंतिम टप्प्यात आहे. या दिनानिमित्त होणाऱ्या संचलनात भारताची समृद्ध संस्कृती आणि वाढती लष्करी शक्ती यांचे दर्शन घडवले जाते. विशेष म्हणजे, यावर्षी युरोपीय महासंघाचे नेते मुख्य अतिथी म्हणून या सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
जर तुम्हालाही दिल्लीतील ही भव्य परेड प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा असेल, तर आता तिकिटांसाठी धावपळ करण्याची गरज नाही. भारत सरकारने ‘आमंत्रण’ (Aamantran) हे विशेष पोर्टल आणि मोबाइल ॲप उपलब्ध करून दिले आहे, ज्याद्वारे तुम्ही घरबसल्या तिकीट खरेदी करू शकता.
तिकिटांचे दर आणि कार्यक्रम
प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी तिकिटांचे दर अत्यंत माफक ठेवण्यात आले असून, सर्वसामान्यांना अवघ्या 20 रुपयांपासून तिकीट बुक करता येणार आहे. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, नागरिक खालील कार्यक्रमांसाठी तिकीट बुकिंग करू शकतात:
- २६ जानेवारी: प्रजासत्ताक दिन मुख्य परेड
- २८ जानेवारी: बीटिंग द रिट्रीट फुल ड्रेस रिहर्सल
- २९ जानेवारी: बीटिंग द रिट्रीट सोहळा
हे ॲप सरकारचे अधिकृत स्टोअर Gov.in वर उपलब्ध असून, aamantran.mod.gov.in या संकेतस्थळावरूनही तुम्ही तुमची जागा आरक्षित करू शकता.
ऑनलाइन तिकीट बुक करण्याची सोपी पद्धत
प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे तिकीट बुक करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:
- पोर्टलला भेट द्या: सर्वप्रथम ‘आमंत्रण’च्या (Aamantran) अधिकृत वेबसाइटवर जा.
- युजर नोंदणी: ‘बुक युअर टिकट्स’ वर क्लिक करा. नवीन युजर म्हणून आपले पूर्ण नाव, ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर टाकून नोंदणी करा.
- ओटीपी व्हेरिफिकेशन: तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी प्रविष्ट करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
- ओळखपत्र तपशील: लॉगिन केल्यानंतर आधार कार्ड किंवा पॅन कार्ड यांसारख्या ओळखपत्राचा प्रकार निवडा आणि त्याचा क्रमांक टाका.
- माहिती अपलोड करा: आपले नाव, जन्मतारीख, पत्ता भरा आणि ओळखपत्राची स्पष्ट स्कॅन कॉपी अपलोड करा. (पत्ता अपूर्ण असल्यास तिकीट रद्द होऊ शकते, हे लक्षात ठेवा).
- तिकीट बुकिंग: ज्या इव्हेंटला जायचे आहे तो निवडा, गेस्ट लिस्ट निवडा आणि त्यानंतर तिकीटाचा प्रकार निवडून 20 रुपयांचे ऑनलाइन पेमेंट पूर्ण करा.
यशस्वी बुकिंगनंतर तिकीट तुमच्या मोबाईलवर किंवा ईमेलवर पाठवले जाईल. परेड पाहण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहताना आपले मूळ ओळखपत्र सोबत नेणे अनिवार्य आहे.
हे देखील वाचा – Moringa Soup for Winter: हिवाळ्यात आजारांपासून राहायचे असेल दूर, तर प्या ‘शेवग्याच्या पाल्याचे सूप’; मिळतील हे 5 फायदे









