Royal Enfield Flying Flea C6 electric motorcycle price : दिग्गज दुचाकी उत्पादक कंपनी रॉयल एनफिल्डने अखेर इलेक्ट्रिक वाहनांच्या जगात पाऊल ठेवले आहे. कंपनीने आपल्या नवीन ‘फ्लाइंग फ्ली’ ब्रँड अंतर्गत पहिली इलेक्ट्रिक बाईक Flying Flea C6 अधिकृतपणे लाँच केली आहे. 1940 च्या दशकातील मूळ फ्लाइंग फ्ली बाईकपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेली ही दुचाकी दिसायला विंटेज असली तरी तंत्रज्ञानाच्या बाबतीत अत्यंत प्रगत आहे.
Royal Enfield Flying Flea C6 : किंमत आणि बुकिंगचा तपशील
- किंमत: या बाईकची एक्स-शोरूम किंमत 2.79 लाख रुपये आहे.
- BaaS पर्याय: ‘बॅटरी-ॲज-अ-सर्व्हिस’ (BaaS) हा पर्याय निवडल्यास ग्राहकांसाठी ही बाईक केवळ 1.99 लाख रुपयांत उपलब्ध होईल.
- बुकिंग आणि डिलिव्हरी: 10 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजल्यापासून बुकिंगला सुरुवात होत असून मे महिन्याच्या अखेरीस डिलिव्हरी सुरू केली जाईल. सुरुवातीला बेंगळुरूमध्ये ही बाईक उपलब्ध असेल आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर शहरांमध्ये येईल.
Royal Enfield Flying Flea C6 : दमदार परफॉर्मन्स आणि बॅटरी
Flying Flea C6 मध्ये 3.91kWh क्षमतेची लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे. ही बाईक ताशी 115 किमीच्या वेगाने धावू शकते. केवळ 3.7 सेकंदात ही बाईक 0 ते 60 किमी प्रति तास इतका वेग पकडते. एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ही बाईक 154 किमीची रेंज (IDC) देते, असा कंपनीचा दावा आहे.
चार्जिंगचे स्मार्ट तंत्रज्ञान
या बाईकमध्ये एअर-कूल्ड बॅटरी सिस्टम असून मॅग्नेशियम अलॉय केसिंगचा वापर करण्यात आला आहे. सामान्य 16A सॉकेटद्वारे ही बाईक चार्ज करता येते. केवळ 65 मिनिटांत ही बॅटरी 20 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होते. म्हणजेच, एका मिनिटाच्या चार्जिंगवर ही बाईक सुमारे 1 किमी धावू शकते.
Royal Enfield Flying Flea C6 : आधुनिक फीचर्स आणि सुरक्षितता
- डिस्प्ले: यात 3.5 इंचाचा टीएफटी टचस्क्रीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे.
- कनेक्टिव्हिटी: वाय-फाय, ब्लूटूथ, 4G आणि नेव्हिगेशनची सुविधा यात मिळते.
- रायडर एड्स: क्रूझ कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल आणि ड्युअल चॅनल एबीएस (ABS) सारखे सुरक्षा फीचर्स यात दिले आहेत.
- वजन: बाईकचे वजन केवळ 124 किलो आहे, ज्यामुळे ती शहरातील गर्दीत चालवण्यास अत्यंत हलकी आणि सोपी ठरते.
भारत आणि युकेमधील सुमारे 200 अभियंत्यांनी मिळून ही बाईक विकसित केली आहे. रॉयल एनफिल्डच्या या इलेक्ट्रिक प्रवासाची ही केवळ सुरुवात असून आगामी काळात या ब्रँड अंतर्गत आणखी नवीन मॉडेल्स पाहायला मिळतील.











