Health Tips: आजच्या ‘फास्ट’ युगात आपण विकास आणि आधुनिकतेची व्याख्या केवळ चकाचक इमारती आणि पाश्चात्य जीवनशैलीपुरती मर्यादित केली आहे. मात्र, या बदलत्या जीवनशैलीचा सर्वात मोठा फटका आपल्या आरोग्याला बसत आहे. सध्या भारत मधुमेह आणि लठ्ठपणाच्या विळख्यात अडकत चालला असून, याला कारणीभूत ठरत आहे ती म्हणजे आपली बदललेली खाद्यसंस्कृती.
दिखाव्याचे अन्न आणि ढासळते आरोग्य
अनेकांना पॅकेटबंद अन्न किंवा परदेशी पदार्थ खाणे हे मोठेपणाचे लक्षण वाटते. या दिखाव्याच्या नादात आपण गुळ, सत्तू आणि बाजरी यांसारख्या अत्यंत पौष्टिक आणि पारंपरिक भारतीय ‘सुपरफूड्स’ला मागासलेले समजून सोडून दिले आहे. खरी आधुनिकता आकर्षक पाकिटात नसून, ती शरीराला मिळणाऱ्या उर्जेत आणि मानसिक स्थिरतेत असते. पाश्चात्य देशांमध्ये ज्या ‘अल्ट्रा-प्रोसेस्ड’ आहारामुळे आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत, त्याच आहाराचे अनुकरण आपण करत आहोत, हे भविष्यासाठी चिंताजनक आहे.
स्वयंपाकघरातील ‘सिस्टम’ बदलणे गरजेचे
लहान मुलांमधील वाढता लठ्ठपणा ही आजच्या काळातील मोठी समस्या आहे. घरपोच मिळणारे जंक फूड आणि पौष्टिक आहाराबाबतच्या जागरूकतेचा अभाव यामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. केवळ मुलांवर शिस्त लावून हे थांबणार नाही, तर घरातील वातावरण बदलणे आवश्यक आहे. मुलांना खाण्याच्या वस्तूंचे ‘लेबल’ वाचायला शिकवणे, खरी भूक ओळखणे आणि संतुलित ताट तयार करणे या गोष्टींचे शिक्षण घरातूनच मिळायला हवे.
बदलत्या सवयी आणि आरोग्याचा मार्ग
आरोग्य सुधारण्यासाठी महागड्या उपचारांची गरज नाही, तर दिनचर्येत काही छोटे बदल पुरेसे ठरतात:
- खरे अन्न ओळखा: ज्या पदार्थांमधील घटक आपण सहज ओळखू शकतो, तेच ‘खरे अन्न’. जर एखाद्या पाकिटावर न समजणारी रासायनिक नावे असतील, तर ते खाणे टाळावे.
- जेवणाचा योग्य क्रम: रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी आधी प्रथिने आणि फायबर (सॅलड किंवा भाज्या) खावे, त्यानंतर कर्बोदके (भात किंवा पोळी) घ्यावीत.
- शारीरिक हालचाल: जेवणानंतर लगेच बसून न राहता 10 ते 15 मिनिटे चालण्याची सवय लावल्यास पचन सुधारते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण स्थिर राहते.
- नियोजन: वेळेवर काहीही खाण्यापेक्षा जेवणाचे आधीच नियोजन केल्यास जंक फूडचा मोह टाळता येतो.
खरे आरोग्य हे कोणत्याही पाकिटात बंद नसून ते तुमच्या स्वयंपाकघरातील पारंपरिक पदार्थांमध्ये आणि शिस्तबद्ध जीवनशैलीत दडलेले आहे. निसर्गाच्या जवळ जाणे आणि आपल्या मुळांशी घट्ट राहणे हाच निरोगी राहण्याचा एकमेव मार्ग आहे.









