Smartphone Battery Saving Tips : स्मार्टफोन आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे, मात्र अनेकदा फोनची बॅटरी वेगाने संपल्यामुळे आपली महत्त्वाची कामे अडकतात. नवीन फोन असूनही बॅटरी का टिकत नाही, असा प्रश्न अनेकांना पडतो.
याचे मुख्य कारण बॅटरीमधील बिघाड नसून फोनमध्ये बॅकग्राउंडला सुरू असणाऱ्या काही यंत्रणा असतात. या सेटिंग्ज छुप्या पद्धतीने सतत ऊर्जा खर्च करत असतात. जर तुम्हाला तुमच्या मोबाईलचा बॅटरी बॅकअप सुधारायचा असेल, तर खालील 3 महत्त्वाच्या बदलांकडे तातडीने लक्ष द्या.
1. 5G नेटवर्क आणि कनेक्टिव्हिटी सेटिंग्ज
आजच्या वेगवान युगात आपण 5G इंटरनेटचा वापर करतो, मात्र 4G च्या तुलनेत 5G नेटवर्क बॅटरीचा सर्वाधिक वापर करते. विशेषतः जर तुमच्या परिसरात सिग्नल कमकुवत असतील, तर फोन सतत स्ट्रॉन्ग नेटवर्क शोधण्याचा प्रयत्न करतो, ज्यामुळे बॅटरी खूप वेगाने उतरते. याचप्रमाणे, गरज नसताना ब्लूटूथ आणि वाय-फाय सुरू ठेवल्यास फोन आसपासचे डिव्हाइस स्कॅन करत राहतो. त्यामुळे उत्तम बॅकअपसाठी जेथे वेगवान इंटरनेटची गरज नाही तिथे 4G मोडवर स्विच करणे आणि काम संपल्यावर इतर कनेक्टिव्हिटी बंद ठेवणे फायदेशीर ठरते.
2. अॅप्सचा बॅकग्राउंड वापर आणि लोकेशन ट्रॅकिंग
अनेक अॅप्स आपण बंद केल्यानंतरही फोनच्या बॅकग्राउंडमध्ये कार्यरत राहतात. सोशल मीडिया अॅप्स किंवा मॅप्स आणि फूड डिलिव्हरी अॅप्स सतत इंटरनेटचा वापर करून तुमचे लोकेशन ट्रॅक करत असतात. यामुळे फोनची प्रोसेसिंग पॉवर खर्च होते आणि बॅटरी शांतपणे संपत जाते.
बॅटरी दीर्घकाळ टिकवण्यासाठी सेटिंग्जमध्ये जाऊन ज्या अॅप्सची गरज नाही, त्यांचा ‘बॅकग्राउंड अॅप रिफ्रेश’ आणि ‘लोकेशन अॅक्सेस’ मर्यादित किंवा पूर्णपणे बंद ठेवावा.
3. डिस्प्ले ब्राइटनेस आणि स्क्रीन सेटिंग्ज
स्मार्टफोनची स्क्रीन ही ऊर्जेचा वापर करणारा सर्वात मोठा घटक आहे. अनेक वापरकर्ते ‘ऑटो-ब्राइटनेस’ फिचर सुरू ठेवतात. हे फिचर बाहेरील प्रकाशानुसार स्क्रीनचा उजेड कमी-जास्त करण्यासाठी सतत सेन्सर्सना कामाला लावते, परिणामी बॅटरी अधिक खर्च होते.
त्याऐवजी ब्राइटनेस मॅन्युअली गरजेनुसार कमी ठेवणे कधीही चांगले. तसेच, अॅमोलेड (AMOLED) डिस्प्ले असलेल्या फोनमध्ये ‘डार्क मोड’ वापरल्यास बॅटरीची मोठी बचत होऊ शकते.
या साध्या बदलांमुळे तुमच्या स्मार्टफोनचा बॅटरी बॅकअप लक्षणीयरीत्या वाढेल आणि तुम्हाला दिवसातून अनेकदा फोन चार्ज करण्याची गरज भासणार नाही.









