आजपासून ‘Skype’ इतिहासजमा, तुमच्या चॅट्स आणि कॉन्टॅक्ट्सचं काय होणार?

Skype Shut Down

Skype Shut Down | लोकप्रिय व्हिडिओ कॉलिंग प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या स्काईपची (Skype) सेवा आजपासून (5 मे) बंद होत आहे. जवळपास दोन दशकं यूजर्सकडून या प्लॅटफॉर्म्सचा वापर केला जात आहे.

मायक्रोसॉफ्टने (Microsoft) आता आपल्या यूजर्सला मायक्रोसॉफ्ट टीम्स (Microsoft Teams ) कडे स्थलांतरित होण्यास प्रोत्साहित करत आहे. स्काईपवरील सर्व चॅट्स आणि संपर्क त्याच लॉगिनचा वापर करून टीम्सवर उपलब्ध राहतील.

स्काईप बंद करून सर्व यूजर्सला मायक्रोसॉफ्ट टीम्सवर एकत्रित करणे हा मायक्रोसॉफ्टचा उद्देश आहे. कंपनीने एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले की, आमच्या विनामूल्य ग्राहक संवाद ऑफर सुव्यवस्थित करण्यासाठी, जेणेकरून आम्ही ग्राहकांच्या गरजांना अधिक सहजपणे जुळवून घेऊ शकू, आम्ही मे 2025 मध्ये स्काईप बंद करत आहोत. मायक्रोसॉफ्ट टीम्स (मोफत) वर लक्ष केंद्रित करणार आहोत.”

स्काईप का बंद होत आहे?

2003 मध्ये लाँच झालेले स्काईप व्हिडिओ कॉलिंगमध्ये एक महत्त्वाचे नाव बनले होते, परंतु नवीन प्लॅटफॉर्म्स आणि एंटरप्राइज-फर्स्ट टूल्सच्या वाढीमुळे त्याची लोकप्रियता हळूहळू कमी झाली. मायक्रोसॉफ्टने टीम्स नावाने दुसरा प्लॅटफॉर्म देखील यूजर्ससाठी उपलब्ध केला. त्यामुळे आता कंपनी यूजर्सला टीम्सचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे.

मायक्रोसॉफ्टचा हा निर्णय टीम्सकडे केलेल्या बदलाचा कळस आहे. टीम्स हे मायक्रोसॉफ्ट इकोसिस्टममध्ये अधिक चांगल्या प्रकारे समाकलित केलेले उत्पादन आहे आणि डिजिटल सहकार्याच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी अधिक सक्षम आहे.

मायक्रोसॉफ्ट टीम्सचा वापर

स्काईप 5 मे 2025 पर्यंत कार्यरत राहील. मायक्रोसॉफ्टने वापरकर्त्यांना या काळात टीम्सकडे स्थलांतरित करण्याचे आवाहन केले आहे. यूजर्सचे सर्व चॅट्स व कॉन्टॅक्ट्स टीम्समध्येही कायम राहतील. तसेच, जे यूजर्स स्काईपची पेड सर्व्हिस वापरतात, ते ठराविक कालावधीपर्यंत या सेवेचा लाभ घेऊ शकतील. सेवा बंद झाल्यानंतरही, स्काईप नंबर्स स्काईप वेब पोर्टल किंवा टीम्सद्वारे कॉल प्राप्त करू शकतील.

यूजर्स आपल्या स्काईप लॉगइन यूजर्स व पासवर्डचा वापर करून मायक्रोसॉफ्ट टीम्समध्ये लॉग इन करू शकतात. टीम्समध्ये स्काईपवरील मेसेज आणि नंबर दिसतील.