Tax Free Countries | भारतातील उत्पन्न करावर (Income Tax in India) अनेकदा टीका होताना पाहायला मिळते. महिन्याच्या पगारातून होणारी इन्कम टॅक्स कपात अनेकांसाठी डोकेदुखी असते. मात्र जगात असे काही देश (Tax Free Countries) आहेत जिथे तुम्ही कमावलेला प्रत्येक रुपया तुमचाच राहतो. तुमच्या उत्पन्नावर ना कोणतीही कपात, ना टॅक्सचा बोजा लादला जातो.
भारतासारख्या देशात टॅक्स स्लॅब प्रगतीशील आहेत. भारतात उत्पन्नाच्या वाढीसह कर देखील वाढत जातो. याशिवाय, अधिक उत्पन्न असणाऱ्यांसाठी अधिभार आणि उपकरही जोडले जातात. अशा पार्श्वभूमीवर करमुक्त देशांची आर्थिक रचना नक्कीच लक्षवेधी ठरते. जगातील असे कोणते देशात आहे, जेथे उत्पन्नावर कर भरावा लागत नाही, त्याविषयी जाणून घेऊयात.
आखातातील देशांचा करमुक्त फॉर्म्युला
संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कतार, कुवैत, ओमान आणि बहरिन या देशांमध्ये नागरिकांकडून पगारावर कुठलाही थेट कर घेतला जात नाही. सरकारांचा महसूल मुख्यतः तेल आणि वायू साठ्यांमधून, तसेच पर्यटन व अप्रत्यक्ष करांमधून येतो. त्यामुळे नागरिकांना खर्चासाठी अधिक पैसा उपलब्ध होतो आणि अधिक कमाई, कमी ताण हे समीकरण इथे प्रत्यक्षात उतरलेलं दिसतं.
UAE: जागतिक व्यावसायिकांसाठी स्वर्ग
UAE हे या सर्व देशांमध्ये विशेष आकर्षण ठरतं. इथल्या तेलसंपत्तीबरोबरच प्रबळ पर्यटन क्षेत्रामुळे तिथे जबरदस्त आर्थिक ताकद आहे. कोणताही इनकम टॅक्स नसल्यामुळे जगभरातून व्यावसायिक येथे स्थायिक होण्यासाठी येतात. यामुळे UAE हे एक आंतरराष्ट्रीय करमुक्त केंद्र बनलं आहे.
आशिया आणि युरोपमधील टॅक्स-फ्री देश
करमुक्त देश फक्त आखातापुरते मर्यादित नाहीत. ब्रुनेई, मोनाको, नौरू आणि बहामाससारख्या देशांमध्ये देखील पगारावर थेट कर घेतला जात नाही. काही ठिकाणी हे तेल संपत्तीमुळे शक्य झालंय, तर काही ठिकाणी पर्यटन आणि वित्तीय सेवा यावर अर्थव्यवस्था उभी आहे. त्यामुळे नागरिकांना टॅक्सपासून मुक्तता मिळते.
कर न घेता अर्थव्यवस्था कशी चालते?
या देशांची अर्थव्यवस्था नैसर्गिक संसाधनांवर, पर्यटनावर किंवा अप्रत्यक्ष करांवर चालते. इनकम टॅक्स न घेताही ते सार्वजनिक सेवांचा खर्च भागवतात. त्यामुळे आर्थिक व्यवस्थापनाचा एक वेगळा आणि यशस्वी मॉडेल इथे दिसतो. पारंपरिक कराच्या तुलनेत, हा पर्याय अनेकांसाठी दिलासा देणारा वाटतो.