Unlimited 5G Data: भारतातील कोट्यवधी मोबाईल युजर्स जे सध्या मोफत अनलिमिटेड ५G डेटाचा आनंद घेत आहेत, त्यांच्यासाठी आगामी काळात मोठे बदल होऊ शकतात. एका ताज्या मार्केट रिसर्च रिपोर्टमध्ये टेलिकॉम कंपन्यांना एक महत्त्वपूर्ण सल्ला देण्यात आला आहे. रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या कंपन्यांनी ग्राहकांना दिला जाणारा मोफत अनलिमिटेड ५G डेटा आता बंद करावा, असे या अहवालात सुचवले आहे.
भारतात ५G सेवा सुरू झाल्यापासून कंपन्या ठराविक प्लॅन्सवर कोणतीही अतिरिक्त रक्कम न घेता अमर्याद डेटा देत आहेत. यामध्ये दररोज 2GB किंवा त्याहून अधिक डेटा मिळणाऱ्या प्रीपेड आणि पोस्टपेड युजर्सचा समावेश आहे. मात्र, आता नेटवर्कवरील भार आणि वाढता वापर पाहता कंपन्यांनी या वाढत्या मागणीतून नफा कमावण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे.
Unlimited 5G Data: डेटा वापरामध्ये तब्बल २९ टक्क्यांची प्रचंड वाढ
इंटरनेट वापरण्याच्या प्रमाणात भारतात मोठी क्रांती झाली असून, अहवालानुसार डेटा ट्रॅफिक वेगाने वाढत आहे:
- एकूण वाढ: आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये देशातील तीन प्रमुख खाजगी टेलिकॉम कंपन्यांच्या एकूण डेटा ट्रॅफिकमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल 29 टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे. याआधीच्या आर्थिक वर्षात ही वाढ 21.5 टक्के एवढी होती.
- जिओ आघाडीवर: डेटा वापर वाढवण्यात रिलायन्स जिओ 31 टक्के वाढीसह सर्वात पुढे आहे. त्यापाठोपाठ एअरटेलमध्ये 28 टक्के आणि व्होडाफोन आयडियामध्ये 23 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.
- प्रति ग्राहक वापर: प्रत्येक ग्राहकाचा सरासरी मासिक डेटा वापर आर्थिक वर्ष 2024-25 मधील 27.3GB वरून आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये थेट 34.1GB वर पोहोचण्याचा अंदाज आहे.
Unlimited 5G Data: फक्त रिचार्ज महाग करून भागणार नाही; तज्ज्ञांचे मत
बाजार विश्लेषकांच्या मते, टेलिकॉम कंपन्यांना आपले प्रति ग्राहक सरासरी उत्पन्न (ARPU) वाढवण्यासाठी केवळ रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवणे पुरेसे ठरणार नाही. कंपन्यांना त्यांच्या डेटाच्या किमतीची रचना बदलावी लागेल आणि ग्राहकांच्या वाढत्या वापराचा विचार करून नवीन दरपत्रक तयार करावे लागेल.
नफा वाढवण्याच्या आणि वाढत्या डेटा वापरातून कमाई करण्याच्या व्यापक धोरणाचा एक भाग म्हणून मोफत अनलिमिटेड ५G सेवांवर मर्यादा आणणे किंवा ती पूर्णपणे बंद करणे आवश्यक असल्याचे या अहवालात प्रामुख्याने नमूद करण्यात आले आहे.
Unlimited 5G Data: सध्या तरी ग्राहकांना दिलासा; कंपन्यांचा निर्णय बाकी
या शिफारसी जरी समोर आलेल्या असल्या, तरी रिलायन्स जिओ, भारती एअरटेल किंवा व्होडाफोन आयडिया या कंपन्यांनी अद्याप फ्री अनलिमिटेड ५G डेटा ऑफर मागे घेण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. हा केवळ बाजार तज्ज्ञांचा सल्ला असून, कंपन्यांनी त्यांच्या धोरणात कोणताही निश्चित बदल केलेला नाही.
त्यामुळे सध्या तरी पात्र ग्राहकांना त्यांच्या जुन्या प्लॅन्सवर मोफत ५G चा फायदा मिळत राहील. परंतु, भविष्यात जर कंपन्यांनी हा सल्ला मानला, तर ग्राहकांना ५G डेटासाठी अधिकचे पैसे मोजावे लागतील आणि त्यासाठी कंपन्यांकडून रीतसर घोषणा केली जाईल.
हे देखील वाचा – ODI World Cup 2027: क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा संपली! वन-डे विश्वचषक 2027 च्या तारखा जाहीर; 14 संघांमध्ये रंगणार महामुकाबला









