Tesla India: टेस्लाची भारतात एन्ट्री! मुंबईत पहिले शोरूम सुरू; ‘या’ इलेक्ट्रिक कारची करणार विक्री, किंमत किती?

Tesla Showroom Launch In India

Tesla Showroom Launch In India | अमेरिकन इलेक्ट्रिक कार निर्माता टेस्लाने आज (15 जुलै)मुंबईच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आपले पहिले शोरूम सुरू केले. यासोबतच, इलॉन मस्क यांच्या मालकीच्या कंपनीची अधिकृतरित्या भारतीय बाजारात एन्ट्री झाली आहे.

या निमित्ताने त्यांनी नवीन मॉडल वाय अधिकृत वेबसाइटवर लाँच केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शोरूमचे उद्घाटन झाले आहे. उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी टेस्लाला भारतात इलेक्ट्रिक कार उत्पादन सुरू करण्याचे आवाहन केले.

कंपनी भारतात टेस्ला मॉडेल वायची विक्री करणार आहे. या इलेक्ट्रिक कारची किंमत देखील समोर आली आहे.

मॉडल वायची किंमत आणि बुकिंग

मॉडल वायची सुरुवाती किंमत ₹59.89 लाख (एक्स-शोरूम, मुंबई) निश्चित करण्यात आली आहे. ही कार रियर व्हील ड्राइव्ह आणि लाँग रेंज व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. मुंबई, दिल्ली आणि गुरुग्रामसाठी बुकिंग सुरू झाले असून, रियर व्हील ड्राइव्हची ऑन-रोड किंमत ₹61.07 लाख आणि लाँग रेंजची ₹69.15 लाख आहे. फुल-सेल्फ ड्रायव्हिंग पर्यायासाठी ₹6 लाख अतिरिक्त मोजावे लागतील.

वैशिष्ट्ये आणि कामगिरी

मॉडल वाय रियर व्हील ड्राइव्ह 60 kWh आणि 75 kWh बॅटरीसह येते. 60 kWh बॅटरी 500 किमी आणि लाँग रेंज 622 किमी चालते. यात 15.4-इंच इन्फोटेनमेंट स्क्रीन, 8-इंच मागील स्क्रीन, पॉवर-ॲडजेस्टेबल सीट्स, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल आणि 19-इंच व्हील्ससारखी वैशिष्ट्ये आहेत. रियर व्हील ड्राइव्ह 0 ते 100 किमी/तास 5.9 सेकंदात आणि लाँग रेंज 5.6 सेकंदात गाठते. 15 मिनिटांत सुपरचार्जरने 238-267 किमी रेंज मिळते.

भारतात किंमत महाग

अमेरिकेत मॉडल वायची किंमत 38.63 लाख रुपये, चीनमध्ये 31.57 लाख रुपये आणि जर्मनीत 46.09 लाख रुपये आहे, तर भारतात ही 60 लाखांपासून सुरू आहे. इतर देशांपेक्षा भारतात किंमत जास्त आहे.