Upcoming Bike Launches : भारतीय दुचाकी क्षेत्रात 2026 सालाची सुरुवात अत्यंत धमाकेदार होणार आहे. जानेवारी महिन्यात क्लासिक क्रूझर, स्पोर्ट्स आणि एडवेंचर अशा विविध श्रेणीतील प्रीमियम बाईक्स रस्त्यावर धावण्यासाठी सज्ज होत आहेत. जर तुम्हाला गती आणि परफॉर्मन्सची ओढ असेल, तर या नवीन लाँचकडे तुमचे लक्ष असायलाच हवे.
1. KTM RC 160
तरुण रायडर्स आणि कॉलेज तरुणांना आकर्षित करण्यासाठी ही स्पोर्ट्स बाईक सज्ज आहे. यामध्ये 164cc इंजिन देण्यात आले असून ते 19 hp ची शक्ती निर्माण करते. ही बाईक प्रामुख्याने यामहा R15 ला तगडी टक्कर देणार आहे. यामध्ये टीएफटी डिस्प्ले आणि क्विकशिफ्टरसारखे आधुनिक फीचर्स मिळण्याची शक्यता असून, तिची किंमत 1.8 ते 2 लाख रुपयांच्या आसपास असेल.
2. BMW F 450 GS
बीएमडब्ल्यूची ही बहुप्रतिक्षित एडवेंचर बाईक असून ती टीव्हीएस सोबतच्या तांत्रिक सहकार्यातून तयार झाली आहे. यात 450cc पॅरेलल-ट्विन इंजिन वापरले आहे, जे 48 hp पॉवर देते. रायडिंग मोड्स आणि प्रो एबीएस सह येणारी ही बाईक प्रामुख्याने हिमालयन 450 ला स्पर्धक ठरेल. याची अंदाजित किंमत 4.5 ते 5.5 लाख रुपये असू शकते.
3. Royal Enfield Bullet 650 Twin
रॉयल एनफील्डने आपल्या सर्वात आयकॉनिक ‘बुलेट’ ब्रँडला आता 650cc ट्विन इंजिनची ताकद दिली आहे. 648cc समांतर-ट्विन इंजिन असलेली ही बाईक 47 hp पॉवर आणि 52 Nm टॉर्क जनरेट करते. जुन्या बुलेटचा रुबाब कायम राखत यात एलईडी लायटिंगसारखे नवीन बदल केले आहेत. याची एक्स-शोरूम किंमत 3.4 ते 3.6 लाख रुपयांच्या दरम्यान अपेक्षित आहे.
4. Brixton Crossfire 500
ऑस्ट्रियाचा प्रसिद्ध ब्रँड ब्रिक्सटन आता भारतीय बाजारपेठेत आपली पहिली एडवेंचर बाईक लाँच करत आहे. यामध्ये 486cc ट्विन इंजिन असून ते 48 hp शक्ती प्रदान करते. ट्रॅक्शन कंट्रोल आणि पिरेली टायर्समुळे ही बाईक चालवण्यासाठी अधिक सुरक्षित आणि स्थिर असेल. ही बाईक होंडा NX500 ला आव्हान देईल आणि तिची किंमत साधारण 5.5 लाख रुपये राहू शकते.
5. KTM 390 Adventure R
खऱ्या अर्थाने ऑफ-रोडिंगचा आनंद देणाऱ्या या बाईकमध्ये 399cc सिंगल-सिलिंडर इंजिन आहे. यामध्ये 230mm सस्पेंशन ट्रॅव्हल आणि उंच ग्राउंड क्लिअरन्स देण्यात आला आहे, जो खराब रस्त्यांवर प्रवासासाठी उत्तम आहे. साहसी पर्यटनाची आवड असलेल्यांसाठी ही बाईक एक वरदान ठरेल. याची किंमत साधारण 4 लाख रुपयांच्या घरात असेल.
हे देखील वाचा – ‘ठाकरे बंधूंप्रमाणे आम्हीही एकत्र येऊ’; निवडणुकीपूर्वी आनंदराज आंबेडकरांचे मोठे विधान; राजकीय समीकरणे बदलणार?









