Monalisa Bhosle Wedding: प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात रुद्राक्ष विकताना एका व्हायरल व्हिडिओमुळे संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनलेली मोनालिसा भोसले हिने आयुष्याची नवी सुरुवात केली आहे. ११ मार्च रोजी केरळमधील तिरुवनंतपुरम येथील एका मंदिरात मोनालिसाने तिचा प्रियकर फरमान खान याच्याशी विवाह केला. या आंतरधर्मीय विवाहाची सध्या समाजमाध्यमांवर मोठी चर्चा रंगली आहे.
फेसबुकवरून जुळले सूत
मूळची इंदूरची असलेली १८ वर्षांची मोनालिसा आणि महाराष्ट्रातील फरमान खान यांची ओळख ६ महिन्यांपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले, मात्र त्यांच्या धर्मातील भिंतीमुळे मोनालिसाच्या वडिलांचा या लग्नाला तीव्र विरोध होता. मोनालिसाने आरोप केला होता की, तिचे वडील तिचे लग्न एका दूरच्या नातेवाईकाशी लावून देण्यासाठी दबाव टाकत होते.
कौटुंबिक ड्रामा आणि पोलीस संरक्षण
मोनालिसा सध्या तिच्या पहिल्या मल्याळम चित्रपट ‘नागम्मा’चे चित्रीकरण केरळमध्ये करत आहे. यावेळी तिच्या वडिलांनी तिला जबरदस्तीने घरी नेण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर घाबरलेल्या जोडप्याने थंपानूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन संरक्षणाची मागणी केली. मोनालिसा आता सज्ञान असल्याने ती स्वतःचे निर्णय घेण्यास सक्षम आहे, असे सांगत पोलिसांनी तिची बाजू घेतली. त्यानंतर या दोघांनी पूवर येथील श्री नयनार देव मंदिरात लग्न केले.
‘द रिअल केरळ स्टोरी’
मोनालिसा आणि फरमानच्या लग्नाला केरळमधील अनेक बड्या नेत्यांनी उपस्थिती लावली. केरळचे शिक्षण मंत्री व्ही. शिवनकुट्टी यांनी या लग्नाला ‘द रिअल केरळ स्टोरी’ असे संबोधले. याशिवाय खासदार ए.ए. रहीम आणि इतर नेतेही नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते. लग्नात मोनालिसाने लाल रंगाची साडी आणि भांगात सिंदूर लावला होता, तर फरमानने पांढरा शर्ट आणि पारंपारिक मुंडू परिधान केला होता.
करिअरची नवी झेप
महाकुंभमेळ्यात आपल्या मोहक सौंदर्यामुळे ‘मोनालिसा’ हे नाव मिळवलेली ही तरुणी आता लवकरच रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. मल्याळममधील ‘नागम्मा’ सोबतच ती ‘द डायरी ऑफ मणिपूर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. आयुष्यातील वैयक्तिक संघर्षावर मात करत तिने सुरू केलेली ही नवीन इनिंग सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.










