Vitamin D Deficiency: अनेकदा सकाळी कोवळ्या उन्हात बसून किंवा व्हिटॅमिन डी चे सप्लीमेंट घेऊनही शरीरातील याची पातळी वाढत नाही. ही समस्या अनेकांना सतावते. व्हिटॅमिन डी हे चरबीत विरघळणारे जीवनसत्व आहे, ज्याचा शरीरात योग्य वापर होण्यासाठी पचनसंस्थेचे आरोग्य उत्तम असणे गरजेचे आहे. तज्ज्ञांच्या मते, काही आंतरिक कारणांमुळे शरीर या जीवनसत्वाचे शोषण करू शकत नाही.
व्हिटॅमिन डी कमी असण्यामागची प्रमुख २ कारणे:
- पित्ताचा प्रवाह (बाइल फ्लो) मंदावणे: व्हिटॅमिन डी शरीरात शोषले जाण्यासाठी यकृताद्वारे तयार होणाऱ्या पित्ताची (बाइलची) आवश्यकता असते. पित्त हे चरबीचे पचन करण्याचे काम करते, ज्यामुळे शरीर व्हिटॅमिन डी सोबतच इतर पोषक तत्वे शोषू शकते. जर पित्ताचा प्रवाह नीट होत नसेल, तर तुम्ही कितीही सकस आहार किंवा औषधे घेतली तरी शरीराला त्याचा उपयोग होत नाही.
- उपाय: आहारात कारले, मेथी, मुळा यांसारख्या कडू चवीच्या भाज्यांचा समावेश करा. ऑलिव्ह ऑईल, सुका मेवा आणि बिया यांसारखे आरोग्यदायी फॅट्स खा. जेवणानंतर चालण्याची सवय ठेवा आणि यकृत निरोगी ठेवण्यासाठी होल ग्रेन पदार्थ खा.
- दीर्घकालीन मानसिक ताण (स्ट्रेस): मानवी शरीर कोलेस्ट्रॉलचा वापर करून हार्मोन बनवते. यात कार्टिसोल (स्ट्रेस हार्मोन) आणि व्हिटॅमिन डी यांचा समावेश असतो. जेव्हा व्यक्ती सतत तणावाखाली असते, तेव्हा शरीरात कार्टिसोलचे प्रमाण वाढते आणि व्हिटॅमिन डी निर्मितीकडे दुर्लक्ष होते. याशिवाय, तणावामुळे शरीरातील सूज वाढते, ज्यामुळे व्हिटॅमिन डी ची मागणी अधिक वाढते.
- उपाय: तणाव कमी करण्यासाठी दररोज पुरेशी झोप घ्या, ध्यान (मेडिटेशन) करा आणि श्वसनाचे व्यायाम करा. रक्तातील साखर नियंत्रित ठेवणारा आहार घ्या आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवा.
मेटाबॉलिझम आणि जीवनशैलीचा प्रभाव
केवळ आहार घेऊन चालत नाही, तर शरीराचा मेटाबॉलिझम किंवा चयापचय क्रियेचा वेगही चांगला असणे आवश्यक आहे. जर तुमचे शरीर पोषक तत्वांचा वापर प्रभावीपणे करत नसेल, तर कमतरता जाणवणे साहजिक आहे. त्यामुळे, केवळ औषधांवर अवलंबून न राहता आपल्या जीवनशैलीत सुधारणा करणे हाच यावरील सर्वोत्तम उपाय आहे.











