Home / लेख / Washim Farmer News: संतापजनक! हक्काचे अनुदान मागितले म्हणून शेतकऱ्याला बुटाने मारहाण; वाशिममधील मुजोर कृषी अधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल

Washim Farmer News: संतापजनक! हक्काचे अनुदान मागितले म्हणून शेतकऱ्याला बुटाने मारहाण; वाशिममधील मुजोर कृषी अधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल

Washim Farmer News: वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील गोगरी परिसरातून प्रशासकीय अरेरावीचा एक अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे. मनरेगा योजनेअंतर्गत...

By: Team Navakal
Washim Farmer News
Social + WhatsApp CTA

Washim Farmer News: वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील गोगरी परिसरातून प्रशासकीय अरेरावीचा एक अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे. मनरेगा योजनेअंतर्गत फळबाग लागवडीचे रखडलेले अनुदान का मिळत नाही, असा जाब विचारणाऱ्या शेतकऱ्याला तालुका कृषी अधिकाऱ्याने चक्क बुटाने आणि मातीच्या ढेकळाने मारहाण केल्याचा आरोप झाला आहे.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

नेमकं प्रकरण काय?

गोगरी येथील शेतकरी ऋषिकेश पवार यांनी 2 वर्षांपूर्वी आपल्या 3 एकर शेतात मनरेगा योजनेतून संत्रा फळबाग लावली होती. या फळबागेसाठी मिळणारे हक्काचे सरकारी अनुदान गेल्या 4 महिन्यांपासून रखडले होते. मंगरुळपीरचे तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे हे गोगरी शिवारात पाहणीसाठी आले असता, पवार यांनी त्यांच्याकडे अनुदानाबाबत विचारणा केली.

यावेळी झालेल्या वादात मुजोर अधिकाऱ्याने शेतकऱ्याच्या अंगावर धावून जात त्याला बुटाने मारहाण केली आणि शेतातील मातीची ढेकळे फेकून मारली. इतकेच नाही तर “तुला गुन्ह्यात अडकवीन,” अशी धमकीही अधिकाऱ्याने दिल्याचे पीडित शेतकऱ्याचे म्हणणे आहे.

राजकीय पडसाद: नाना पटोलेंचा कडक प्रहार

या घटनेनंतर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सरकारवर जोरदार टीका केली.

“हे सरकार शेतकरीविरोधी असून मुजोर अधिकारी अन्नदात्याचा अपमान करत आहेत. शेतकऱ्याच्या स्वाभिमानावर झालेला हा हल्ला आम्ही सहन करणार नाही. संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करून शेतकऱ्याला तात्काळ न्याय मिळावा,” अशी मागणी पटोले यांनी केली आहे.

अधिकाऱ्याचा बचावात्मक पवित्रा

दुसरीकडे, आरोपी अधिकारी सचिन कांबळे यांनी मारहाणीचे आरोप फेटाळून लावले आहेत. “एक व्यक्ती महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर धावून आली होती, मी केवळ परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. मी अंगावर धावलो असलो तरी मारहाण केलेली नाही, माझ्यावरील आरोप खोटे आहेत,” असे स्पष्टीकरण कांबळे यांनी दिले आहे. मात्र, व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या दृश्यांमुळे अधिकाऱ्याचा दावा संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

शेतकरी संघटनांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी केली आहे. कृषीप्रधान देशात हक्काचे पैसे मागणाऱ्या शेतकऱ्याला मिळणारी ही वागणूक प्रशासकीय मुजोरीचा कळस मानली जात आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या