WhatsApp Message Schedule: व्हॉट्सॲप आपल्या युजर्सचा अनुभव अधिक सुलभ करण्यासाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असते. आता व्हॉट्सॲप अशा एका फीचरवर काम करत आहे, ज्याची युजर्स गेल्या अनेक वर्षांपासून वाट पाहत होते. हे नवीन फीचर म्हणजे ‘मेसेज शेड्यूल’. या सुविधेमुळे आता युजर्सना कोणताही मेसेज ठराविक तारीख आणि वेळेसाठी आधीच सेट करून ठेवता येणार आहे.
नेमके कसे असेल हे नवीन फीचर?
व्हॉट्सॲपच्या हालचालींवर लक्ष ठेवणारी वेबसाईट ‘Wabetainfo’ ने दिलेल्या माहितीनुसार, सध्या ‘मेसेज शेड्यूल’ या फीचरची चाचणी सुरू आहे. या सुविधेच्या मदतीने तुम्ही एखादा मेसेज टाईप करून त्याला भविष्यातील कोणतीही तारीख आणि वेळ सेट करू शकता. एकदा वेळ सेट केली की, तो मेसेज तुमच्या फोनला हात न लावता ठरलेल्या वेळेवर आपोआप समोरच्या व्यक्तीला पाठवला जाईल. विशेषतः कोणाला वाढदिवस किंवा लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हे फीचर अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
ग्रुप आणि पर्सनल चॅटमध्ये मिळणार सुविधा
हे आगामी फीचर केवळ वैयक्तिक संवादापुरते मर्यादित नसेल. युजर्सना त्यांच्या पर्सनल चॅट्ससोबतच ग्रुप चॅट्समध्येही मेसेज शेड्यूल करता येणार आहेत. युजर्सनी किती मेसेज शेड्यूल करून ठेवले आहेत आणि त्यापैकी किती अद्याप पाठवले गेले नाहीत, याची संख्या देखील त्यांना एका वेगळ्या विभागात पाहता येईल. सध्या हे फीचर डेव्हलपमेंट स्टेजमध्ये असून आयओएस (iOS) च्या बीटा व्हर्जन 26.7.10.72 वर याची झलक पाहायला मिळाली आहे.
कधी होणार लाँच?
सध्या हे फीचर सर्वच युजर्ससाठी उपलब्ध नाही. बीटा टेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर आणि त्यातील त्रुटी दूर केल्यानंतर, हे अपडेट सर्व अँड्रॉइड आणि आयफोन युजर्ससाठी रोलआऊट केले जाईल. सध्या ‘TestFlight’ बीटा प्रोग्राम अंतर्गत यावर काम सुरू असून आगामी काळात हे फिचर व्हॉट्सॲपच्या सेटिंगमध्ये किंवा चॅट विंडोमध्ये पाहायला मिळू शकते.












