Holi 2026 : हिंदू धर्मात प्रत्येक पौर्णिमेला विशेष महत्त्व असते, मात्र फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा ही सर्वात महत्त्वाची मानली जाते. याच दिवशी अधर्मावर धर्माच्या विजयाचे प्रतीक असलेली होळी पेटवली जाते. यंदाची फाल्गुन पौर्णिमा केवळ होळीमुळेच नाही, तर या दिवशी लागणाऱ्या चंद्रग्रहणामुळेही चर्चेत आहे. ग्रहणाचे सावट असल्यामुळे सण साजरा करण्याच्या पद्धतीत आणि वेळेत काही बदल होण्याची शक्यता आहे.
फाल्गुन पौर्णिमा: तारीख आणि मुहूर्त
पंचांगानुसार, यंदा फाल्गुन पौर्णिमा तिथी 2 दिवसांवर विभागली गेली आहे. या तिथीचा प्रारंभ 2 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5 वाजून 55 मिनिटांनी होईल, तर तिथीची समाप्ती 3 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजून 7 मिनिटांनी होईल.
उदयतिथीनुसार, 3 मार्च रोजी फाल्गुन पौर्णिमा साजरी केली जाईल. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नानासाठी सकाळी 5 वाजून 19 मिनिटे ते 6 वाजून 8 मिनिटांपर्यंतचा ब्रह्म मुहूर्त अतिशय शुभ आहे.
चंद्रग्रहणामुळे होळी दहनाचा संभ्रम
3 मार्च रोजी वर्षातील पहिले चंद्रग्रहण लागत आहे. चंद्रोदयाची वेळ सायंकाळी 6 वाजून 44 मिनिटांची असून याच सुमारास ग्रहण काळात बदल दिसून येतील. यामुळे होलिका दहनासाठी दोन पर्याय समोर येत आहेत:
- काही भाविक 2 मार्चच्या रात्रीच होळी दहन करून 4 मार्चला धुलीवंदन साजरे करतील.
- जे भाविक 3 मार्चला होळी पेटवणार आहेत, त्यांनी सायंकाळी 7 वाजल्यानंतर, म्हणजेच चंद्रग्रहण संपल्यानंतरच दहन करावे, असा सल्ला दिला जात आहे.
होळीमागील पौराणिक महत्त्व
होळी हा सण केवळ रंगांचा उत्सव नसून त्यामागे अनेक पौराणिक कथा आहेत. भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांच्यातील अलौकिक प्रेमाचे प्रतीक म्हणून हा सण ओळखला जातो. रंगांनी होळी खेळण्याची परंपरा श्रीकृष्णानेच सुरू केल्याचे मानले जाते. दुसरीकडे, भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकश्यपूची बहीण होलिका त्याला घेऊन आगीत बसली होती. मात्र, ईश्वरी कृपेने प्रल्हाद वाचला आणि होलिका जळून खाक झाली. हाच संदेश देण्यासाठी दरवर्षी होळी पेटवून वाईट विचारांचा त्याग केला जातो.
रंगांचा हा सण थंडीच्या समाप्तीचे आणि वसंत ऋतूच्या आगमनाचे संकेत देतो, जो समाजात एकता आणि आनंद घेऊन येतो.











