Navaratri’s 9 Political Coulur’s – Will Raj Thackeray’s MNS Succeed?
तुळशीदास भोईटे – Will Raj Thackeray’s MNS Succeed? – जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र (Maharashtra)घडवूया, कोणत्याही मराठी माणसाला अभिमान वाटेल, आकर्षित करेल असं ध्येय असणारी मनसे म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना! (MNS)व्यक्तिमत्व, वक्तृत्वाच्या बळावर गेली चार-साडेचार दशकं महाराष्ट्राच्या राजकारणात सतत लोकप्रिय ठरलेले पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे. (Raj Thackeray)मराठी युवावर्गाच्या मनाला मोहणारं असं सारं… त्यात मराठी मनाला भावणारी सडेतोड आक्रमक शैली.
त्यातून भाषण ऐकण्यासाठी एका हाकेवर जमणारा लाखोंचा मराठी जनसमुदाय. सारं काही कोणत्याही राजकीय नेत्यासाठी यशदायी ठरणारं. मात्र तरीही आजवर एकही खासदार नाही, सध्या एकही आमदार नाही…तरीही मनसेचा दरारा मात्र तोच आहे. राज ठाकरेंचा आवेश आणि आब तोच आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील इतर काही पुतण्यांप्रमाणे हा पुतण्याही आपल्या राजकीय गुरू काकांपासून वेगळा झाला असला, तरी त्याने त्यांचा फक्त वैचारिक वारसा घेतला! पण स्थापन केला तो स्वत:चा, स्वत:च्या संकल्पनेतील नवा पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना!

राज ठाकरे हे त्यांच्या सृजनशीलतेसाठी ओळखले जातात. त्यांच्या सौंदर्यदृष्टीचा छाप त्यांच्या पक्षाच्या नावातही दिसते. शॉर्टफॉर्ममध्येही ते सामान्यांना भावणारं ठरलं. मनसे. त्यांनी निशाणी निवडतानाही मूळ शिवसेनेच्या जुन्या काळातील इंजिन या निशाणीची निवड केली. स्थापनेनंतर झेंडा निवडला तो मात्र भगवा नव्हता. तिथं बदलत्या काळातील वेगळंपण राखलं होतं.
भगवा, निळा, पांढरा, हिरवा असा त्यांचा झेंडा चर्चेत आला होता. त्यांची प्रतिमाही सर्वसमावेशक नेता आणि मनसेची प्रतिमा सर्वसमावेशक पक्षाची झाली होती. 9 मार्च 2006रोजी स्थापना झाली तेव्हा आधुनिक पिढीला भावणारा विकासाची दूरदृष्टी असणारा अजेंडा होता. पण म्हणावा तसा प्रतिसाद नव्हता.
त्यातूनच मग आलं वर्ष 2007, ठिकाण विक्रोळीतील मराठी खाद्योत्सव. सामान्य मराठी माणसांना भावेल अशा राजकारणाची टेस्ट आजही काकांनी शिवसेना स्थापन केली त्या काळातीलच असल्याचं राज ठाकरेंच्या लक्षात आलं. त्यांनी आक्रमक मराठीत्व मांडत उत्तर भारतीयांच्या वर्चस्ववादाविरोधात आवाज बुलंद केला.
तिथं सुरू झालं मनसेचं खळखट्याक स्टायलीचं राजकारण. पूर्वीच्या शिवसेना स्टाईलची आठवण करून देणारं. मनसे राष्ट्रीय ब्रेकिंगमधून मराठी चॅनल्सचे पडदे ताब्यात घेत गेली. दबलेल्या मराठी माणसांना मनसे नवा आधार वाटली. त्यातूनच जिथं जिथं मराठी तिथं तिथं मनसे प्रभावी ठरत गेली.

2009च्या निवडणुकांना सामोरे जाताना काँग्रेसच्या मुरब्बी नेत्यांना मनसेच्या आक्रमक मराठीत्वाचं महत्त्व लक्षात आलं. त्यातून काही खेळी सरकारकडूनही झाल्या. राज ठाकरे आक्रमक होतेच. मनसे अधिकच चेव चढत लढू लागली. वाढू लागली. 2009ची विधानसभा निवडणूक मनसेच्या स्थापनेनंतरची पहिली विधानसभा निवडणूक.
पहिल्याच निवडणुकीत मनसेचे 13 आमदार निवडून आले. पण शिवसेना आणि भाजपाचे बारा वाजले. शिवसेना 1990 नंतर पहिल्यांदाच 50 खाली 44वर घसरली. भाजपाही 1995 नंतर पहिल्यांदाच 50 खाली 46 जागांवर घसरली. मनसेनं शिवसेना भाजपा महायुतीची मराठी मतं स्वत:कडे वळवल्याचा तो फटका मानला जातो.
त्याच काळात मनसेचे मुंबई, पुणे, नाशिक महापालिकांमध्ये लक्षणीय संख्येनं नगरसेवक निवडून आले. नाशकात पालिकेत तर मनसेची सत्ता आली. हे सारं पुढची दोन-तीन वर्षेच चांगलं चाललं. मनसेचं इंजिन विकासाच्या मार्गावर वेगात धावलं. पुढे मात्र देशाच्या राजकारणात एक नवं राजकीय पर्व सुरू झालं. 2009च्या निवडणुकीत भाजपाच्या पराभवानंतर मोदीपर्व सुरू झालं.
राज ठाकरेंसारखा विकासाची ब्ल्यू प्रिंट मांडणारा देशातील पहिला नेता मोदींच्या विकास मॉडेलच्या पाहणीसाठी गुजरातलाही जाऊन आला. मुळात राज ठाकरेंची त्यावेळची उसळलेली लोकप्रियता लक्षात घेत भाजपा थिंकटँकनं जाणीवपूर्वक त्यांना गुजरातमध्ये सरकारी अतिथी म्हणून आमंत्रित केल्याचीही शक्यता असावी.
राज ठाकरे गुजरातला जाऊन आले. त्यांनी मोदींना जाहीर पाठिंबा दिला. मोदींसाठी कोणत्याही भाजपाचा कोणताही नेता करू शकला नसता ते ब्रँडिंगचं काम एका राज ठाकरेंच्या गुजरात दौर्यानं झालं. महाराष्ट्रात विकासाच्या विजनचं राजकारण करणार्या नेत्यामुळे मोदींचं गुजरात विकासाचं गुजरात मॉडेल मराठी घरोघरी पोहोचलं.

त्याचाच खरंतर मनसेच्या इंजिनाच्या विकास वेगावर परिणाम होऊ लागला.2014च्या लोकसभा निवडणुकीत मनसेचा पाठिंबा तर घेतला. पण मनसेला युतीत घेत महायुती मात्र साकारली नाही. अगदी राज ठाकरेंनी मनसेचे खासदार निवडून आले तरी ते मोदींना पाठिंबा देतील म्हटलं. मात्र, मतदारांनी मोदींना पंतप्रधान बनवण्याचं लक्ष्य साध्य करण्यासाठी थेट भाजपाला आणि युतीमित्र शिवसेनेलाच मत दिलं.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत मनसेने 9 उमेदवार रिंगणात उतरवले होते. पण त्या निवडणुकीत मनसेचा पराभव झाला. पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. 2014मधील विधानसभेला भाजपाने ऐनवेळी शिवसेनेला धक्का दिला. युती तोडली. पण तरीही मनसेला मात्र सोबत घेतले नाही. मनसेचे अनेक आमदार पक्ष सोडून भाजपासोबत गेले.
मनसेचं विधानसभेतील बळ 13हून 1वर आलं.पुढच्या 2019च्या लोकसभा निवडणुकीत मनसेनं उमेदवार उतरवले नाहीत. मात्र, आपली आधीची भूमिका बदलत त्यांनी मोदींना विरोध सुरू केला. पंतप्रधान मोदींची कथनी आणि करणीतील विरोधाभास दाखवण्यासाठी ‘लाव रे तो व्हिडिओ’ संकल्पनेवर सभा घेतल्या. त्यांची संकल्पना, सभा सर्वच गाजलं.
पण मराठी मतदारांचा कौल मनसेनं पाठिंबा दिलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीऐवजी भाजपा-शिवसेना महायुतीलाच मिळाला. विधानसभा निवडणुकीत पुन्हा मनसे एकटी लढली. एकच जागा जिंकली. तीही आधीची नाही, तर कल्याणमधील राजू पाटलांच्या मतदारसंघात इंजिनानं विजयाचं स्टेशन गाठलं.
2020मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं अधिवेशन मुंबईत पार पडलं. त्याच अधिवेशनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नवीन शिवमुद्राधारी भगव्या ध्वजाचं अनावरण करण्यात आलं. त्याच वर्षी बांगलादेशी-पाकिस्तानी नागरिकांना हुसकावून लावा आणि सीएएच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला.
मशिदींवरील भोंग्यांविरोधात हनुमान चालिसा आंदोलन मनसे स्टाईलीत गाजलं. चांगला प्रतिसाद मिळाला. भगवाधारी राज ठाकरे भाजपा समर्थकांचेही आवडते ठरले. सोशल मीडियावर गाजवले गेले. पण 2024ची निवडणूक आली तेव्हा भाजपानं मधल्या काळात फोडलेल्या शिवसेनेतील एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीतील अजित पवारांनाच आपलं म्हटलं, मनसेला दूरच ठेवलं. तरीही मनसेनं लोकसभेला महायुतीला पाठिंबा दिला.
पण मतदारांचा कौल महायुतीविरोधात महाआघाडीला मिळाला. त्या धक्कादायक पराभवानंतरही भाजपानं मनसेला घेऊन बेरीज केली नाही. उलट लाडकी बहीण, धार्मिक ध्रुवीकरण याआधारे रणनीती ठरवली. मनसे पुन्हा एकटी लढली. स्थापनेनंतर पहिल्यांदाच विधानसभेत मनसेचं खातंही उघडलं नाही.

आता पुन्हा एकदा बॅक टू रुट्स…आपलं सत्व ओळखत स्वत्वाकडे परत जाण्याचा प्रवास इंजिनानं सुरू केला आहे. ते सत्व आहे मराठीत्व आणि मनसेचं आक्रमकतेचं स्वत्व. राज ठाकरेंचे मित्र मराठी चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी त्यांची मुलाखत घेतली. त्यातून मराठी माणसांसाठी सर्व मतभेद बाजूला ठेवत एकत्र येण्याचा मुद्दा पुढे आला.
खरंतर त्याच मुलाखतीत भाजपाबद्दल जास्तच जोशात मांजरेकरांनी विचारलं होतं. राज ठाकरेंनीही दरवाजा बंद करणारं नकारात्मक उत्तर दिलं नव्हतं. पण गाजला तो मराठीसाठी ठाकरेंनी एकत्र येण्याचाच मुद्दा. त्याचं कारण कदाचित आजवर टाळीसाठी हात पुढे न करणार्या उद्धव ठाकरेंनी त्याच दिवशी भारतीय कामगार सेनेच्या मेळाव्यात दिलेला सकारात्मक प्रतिसाद. त्यानंतर चर्चा सुरू झाली. मराठी माणसं उत्साहानं चर्चा करू लागली. तेवढ्यात राज्य सरकारचे हिंदी सक्तीचे जीआर आले.
दीपक पवारांचे मराठी अभ्यास केंद्र, गोवर्धन देशमुखांची मराठी एकीकरण समितीसारख्या संस्था पुढे आल्या. त्यातून वातावरण पेटले. राजकारणात आधी राज ठाकरेंनी आक्रमकतेनं मुद्दा हाती घेतला. उद्धव ठाकरेही पुढे आले. ठाकरी एकजुटीसह मराठी मोर्चा निघणार त्याआधीच सरकारने माघार घेतली. तरीही ठाकरेंची विजयी एकता वरळीच्या डोममध्ये साकारली.
ठाकरेंची ती मराठीसाठी झालेली भाषिक युती होती. त्यानंतर पुढे उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला राज ठाकरे मातोश्रीवर गेले. दोन्ही ठाकरे बंधूंची एक भावनिक युती दिसली. गणेशोत्सवात उद्धव ठाकरे पहिल्यांदाच शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी गेले. तिथं पुन्हा दिसली ती भावनिक युतीच. अद्याप राजकीय युती दिसलेली नाही.
बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे एकत्र लढले. पण तिथं भाजपाचे सहकार क्षेत्रातील दिग्गज प्रवीण दरेकर – प्रसाद लाड आणि शशांक रावांनी धुव्वा उडवला. केवळ भावनेवर नाही तर पूर्ण तयारीनेच ठाकरेंनी युती केली तरी लढावं लागेल हा स्पष्ट संदेश दिसला.
आताही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र लढणार का, याविषयी चर्चा असली तरी स्पष्टता नाही, हेच खरं आहे.
जर हे दोन भाऊ एकत्र लढले, तर त्यांचा फायदा होऊ शकतो. ठाकरेंच्या शिवसेनेचे किमान 50 माजी नगरसेवक शिंदेंनी त्यांच्या शिवसेनेत नेले. मनसेचा उरलेला एकमेव नगरसेवकही शिंदेंकडे गेला. दोघांचे पक्ष अडचणीत आहेत. दोन्ही ठाकरे एकत्र लढले तर मराठीत्वाची लाट उसळवत वातावरणनिर्मिती करू शकतात.
हिंदीसक्ती, कबुतरखाना आणि आता अतिवृष्टीमुळे सरकारविरोधातील नाराजी याचा फायदा मिळू शकेल. अर्थात सारं एवढं सोपं नाही. त्यासाठी दोन्ही ठाकरेंना मजबूत तयारी करावी लागेल. ठाकरेंच्या शिवसेनेला विधानसभेत फक्त पावणेदहा टक्के, मनसेला फक्त 1.55 टक्के मतं मिळाली असली, तरी मुंबईत मात्र ते प्रमाण जास्त आहे. ते अनेक मतदारसंघांमध्ये विजयी समीकरण साकारू शकतं.
त्यात जर मनसे मविआचा भाग झाली, तर मग मनसेयुक्त मविआमुळे यशाची शक्यताही वाढते. तसं घडेल का ते स्पष्ट नाही. नेमकं काय घडेल, हे आताच सांगता येत नाही. पण मविआशिवायही ठाकरे व्यवस्थित तयारीनं लढले तरी आतापेक्षा फायद्यातच राहू शकतात. उद्धव ठाकरेंचं संघटन आणि नियोजन कौशल्य, राज ठाकरेंचं वक्तृत्व याचा डबलबार ठाकरी युतीसाठी यशदायी ठरू शकेल.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेप्रमाणेच राज ठाकरेंच्या मनसेलाही अशा यशाची निकड आहे. मुद्दा एवढाच की खरंच तसं होईल की पुन्हा एकदा मनसेचं इंजिन वेगळ्या मार्गावर जाईल…? कारण मनसेच्या इंजिनाच्या आजवरच्या प्रवासात सततच्या बदलत्या दिशा हाही आक्षेपाचा मुद्दा ठरला आहेच!
हे देखील वाचा –
शेकाप, प्रहार जनशक्ती, स्वाभिमानी अस्तित्वाची धडपड सुरू आहे
नवरात्रीचे राजकीय नवरंग ! राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संभ्रमाचे राजकारण
नवरात्रीचे राजकीय’ रंग ! शिवसेना: रंग भगवाच, पण कशा बदलणार छटा?