आज ठाकरे बंधूंचा विजय मेळावा! आधी राज! मग उद्धव बोलणार


मुंबई- राज्य सरकारने हिंदी भाषेसंदर्भात काढलेले अध्यादेश मागे घेतल्यावर ठाकरे बंधूंनी आयोजित केलेला एकत्रित विजय मेळावा उद्या वरळी डोम येथे होत असून, उबाठा आणि मनसे या दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून त्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या मेळाव्याची सर्व रुपरेषा तयार करण्यात आली आहे. त्यानुसार आधी राज आणि नंतर उद्धव यांचे भाषण होणार आहे. या मेळाव्याचा एक टिझरही आज प्रसिद्ध करण्यात आला. ठिकठिकाणी पोस्टर, बॅनर, होर्डिंग लावून मेळाव्याला जास्तीत जास्त मराठी माणसांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. हा मेळावा ऐतिहासिक करण्याचा निर्धार या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी केला आहे.
या मेळाव्यात उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे 19 वर्षांनी जाहीर सभेत एकत्र येत आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांचे नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून संयुक्तपणे या मेळाव्याची तयारी करण्यात आली आहे. त्यासाठी ठाकरे आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांची आज मनसे कार्यालयात बैठक झाली. त्यानंतर त्यांनी वरळी डोम या सभेच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. मेळाव्यापूर्वीची रंगीत तालीमही आज पार पडली. ठाकरे बंधूंच्या भाषणे, त्यांचा प्रवेश कुठून होणार, त्यांची आसनव्यवस्था, इतर पदाधिकारी आणि त्यांची आसनव्यवस्था याचा आढावा घेण्यात आला. प्रत्येक गेटला कोणता कलर कोड असणार याचेही नियोजन करण्यात आले आहे. कलर कोडच्या अनुषंगाने पासचे वाटप केले जाणार आहे. वरळी डोम येथे सुमारे 7 ते 8 हजार लोकांची बसण्याची
व्यवस्था करण्यात आली आहे. हॉल आणि हॉलबाहेर रस्त्यावर एलईडी स्क्रीन लावल्या जाणार आहेत. डोमच्या बेसमेंटमध्ये 800 गाड्यांचे पार्किंग, कोस्टल रोडच्या पुलाखाली दुचाकी पार्किंग आणि महालक्ष्मी रेसकोर्समध्ये बसेस आणि बाहेरील वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. मेळाव्यात कोणत्याही नेत्याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले जाणार नाही. आधी राज ठाकरेंचे आणि नंतर उद्धव ठाकरे यांचे भाषण होणार आहे. नाट्यनिर्माते अजित भुरे या मेळाव्याचे सूत्रसंचालन करणार आहेत.
या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई-ठाण्यात ठिकठिकाणी पोस्टर झळकले आहेत. या पोस्टरवर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना आशीर्वाद देताना दाखवले आहेत. ठाकरे बंधूंच्या नावाने तमाम मराठी माणसांना या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या विजयी मेळाव्यासाठी आज एक टीझर ठाकरे गटाकडून जारी करण्यात आला. यात आवाज महाराष्ट्राचा आवाज मराठीचा, आवाज ठाकरे बंधूंचा असा उल्लेख आहे. हिंदी सक्ती विरोधात ठाकरे बंधूच लढले असेही नमूद केले आहे. प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे फोटो आणि मनसे व उबाठाच्या कार्यकर्त्यांचे व्हिडिओ यांनी मिळून हा टीझर बनला आहे. त्याला ज्या ज्यावेळी ठाकरेंनी महाराष्ट्राला साद घातली त्या त्यावेळी मराठी माणूस एकवटला, लढला आणि भिडला. हिंदी सक्ती आडून मराठीच्या पाठीत वार करायचा पुन्हा प्रयत्न झाला. तेव्हाही महाराष्ट्रद्रोह्यांच्या विरोधात ठाकरेच उभे राहिले. आता ठाकरेंनी पुन्हा महाराष्ट्राला हाक दिली आहे. विजयोत्सवासोबत मराठीची एकजूट भक्कम करण्यासाठी, वाजत गाजत गुलाल उधळत या, असे आवाहन टीझरमधून करण्यात आले आहे.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या घातपाताचा कट रचला होता! – रामदास कदम
शिंदे यांच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी आज एक खळबळजनक वक्तव्य केले. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या घातपाताचा कट रचला होता. उद्धवला कंटाळून राज ठाकरे देश सोडून जाणार होते. पण मी आणि बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना थांबवले.
रामदास कदम एका टीव्ही चॅनेलला मुलाखत देताना म्हणाले, उद्धव ठाकरे कसला मराठीचा मुद्दा हातात घेता आहात. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा पंतप्रधान मोदींनी दिला. त्यांनी आमचा सन्मान राखला. पण ज्या उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा निर्णय स्वीकारला. ते उद्याच्या मोर्चाला कसे असू शकतात? राज ठाकरेंची भूमिका स्पष्ट असते. पण उद्धव ठाकरे हे राक्षसी महत्त्वाकांक्षी आहे. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या घातपाताचा कट रचला होता. शेवटी राज ठाकरे कंटाळून देश सोडून निघाले होते. पण मी आणि बाळासाहेबांनी त्यांना थांबवले. रामदास कदम यांनी केलेल्या दाव्याची ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी खिल्ली उडवली. ते म्हणाले की, उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्यामुळे तमाम मराठी माणूस सुखावला आहे. पण पाच-पन्नास मराठी टाळकी अशी आहेत की, ज्यांचे राजकीय भवितव्यच अंधःकारमय झाले आहे. आता आपले काय होणार या भीतीने त्यांच्या पोटात गोळा उठला आहे. याच वैफल्यापोटी ते वारेमाप वक्तव्ये करत आहेत. त्यांनी आमच्यामध्ये पडू नये. स्वतःची चिंता करावी. तुम्ही मोदी, शहा, फडणवीस, बावनकुळे यांची चिंता करा. तुमच्यासमोर फार मोठे कार्य आहे. एवढ्या लोकांचे बूट तुम्हाला चाटायचे आहेत. पुसायचे आहेत, याची चिंता करा.