मुंबई – मराठी भाषेसाठी उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले आणि ही युती पाहून भाजपाने छुपा आशीर्वाद देत उत्तर भारतीयांना आव्हाने, इशारे आणि चिथावणीखोर वक्तव्य करण्यास अभय दिले, अशी चर्चा आज दिवसभर सुरू होती.
काल उद्धव आणि राज ठाकरेंनी एकाच मंचावर येत पालिका निवडणुका एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट केले.त्यानंतर भाजपा आणि शिंदे गटाने प्रतिक्रिया देताना केवळ उद्धव ठाकरेंना टार्गेट केले होते. राज ठाकरे कालपर्यंत त्यांचे लाडकेच होते. परंतु रात्रीत भाजपाची रणनीती बदलली. आज सकाळी भाजपा नेते आशिष शेलारांनी राज ठाकरेंवर जोरदार टीका केली. हे घडत असतानाच जणू ठरविल्याप्रमाणे उत्तरभारतीय नेते, अभिनेते विविध पोस्ट करीत राज ठाकरेंना आव्हान देण्यास सुरुवात केली. सुनील शुक्ला, पप्पू यादव, स्वामी स्वरुप यांनी राज ठाकरेंना उघड इशाराच दिला की, मुंबईतील उत्तरभारतीयांना हात लावाल तर आमच्याशी गाठ आहे. इतकेच नव्हे तर 26/11 हल्ल्यावेळी अनेकांचे जीव वाचविणाऱ्या जवानानेही राज ठाकरेंना खडे बोल सुनावले.
महाराष्ट्रात राज ठाकरेंनी अनेकवेळा परप्रांतियांच्या विरोधात आंदोलने केली. त्यावेळी भाजपा आणि त्यांचे मित्रपक्ष शांतच राहायचे. राज ठाकरेंवर कधीही कठोर कारवाई झाली नाही. परप्रांतियांच्या विरोधात आंदोलन झाले, मग शांतता पसरली, पुन्हा आंदोलन झाले परप्रांतियांच्या विरोधात आंदोलन झाले, मग शांतता पसरली, पुन्हा आंदोलन झाले असे वेळोवेळी घडत राहिले. पण उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यापासून कुणीही त्याला फार महत्त्व दिले नाही. भाजपाने उद्धव ठाकरेंच्या विरोधातील नेत्याला जपायचे म्हणून राज ठाकरेंना याही स्थितीत जपले. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, आशिष शेलार हे राज ठाकरेंना भेटत राहिले. त्यांच्या घराच्या गॅलरीत उभे राहून प्रसिद्धीमाध्यमांना फोटो देत राहिले. आता मात्र अचानक चित्र बदलले आहे. राज ठाकरे निदान पालिका निवडणुकीत आपल्याबरोबर नाहीत हे स्पष्ट झाल्यानंतर आजपासून भाजपाने राज ठाकरेंच्या विरोधात बोलण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच उत्तरभारतीय नेत्यांनाही कंठ फुटला आहे. यापुढे आणखी काय होते याकडे सर्वांचे लक्ष आहे. उद्धव आणि राज ठाकरेंच्या युती विरोधात भाजपा आणखी कोणती रणनीती आंखते ते पाहणे महत्त्वाचे ठरेल.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांना मराठी भाषेवरून व्यावसायिक सुशील केडिया यांनी आव्हान दिले होते. त्यानंतर मनसैनिकांनी केडियाच्या कार्यालयाची तोडफोड केली . या पार्श्वभूमीवर भाजप मंत्री आशिष शेलार यांनी आज मनसे कार्यकर्त्यांची तुलना थेट पहलागाममधील दहशतवाद्यांशी केली. ते म्हणाले की, पहलगाममध्ये धर्म विचारून गोळ्या घातल्या, इथे सगळे भाषा विचारून मारत आहेत. यांच्यात नेमका काय फरक आहे? व्हिडिओ काढा अथवा नका काढू, पण हिंदूंना चोपण्यामध्ये तुम्हाला जो आनंद मिळतोय ना हा अख्खा महाराष्ट्र पाहत आहे. सत्तेत भाजपा मोठा भाऊ असल्यामुळे संयम पाळतो आहोत. पण हे प्रकार वाढता कामा नये. अमराठी माणसावरचा अन्याय भाजपा खपवून घेणार नाही.
आशिष शेलार पुढे म्हणाले की, दोन्ही भाऊ एकत्र आले तर आनंद वाटला हे कौटुंबिक प्रश्नाचे उत्तर झालं. दोन पक्ष एकत्र येतील की नाही आले का? तर तो दोन्ही पक्षांचा प्रश्न आहे. त्या दोन्ही पक्ष आपल्या भूमिका घ्यायला ते खुले आहेत, तो सर्वस्वी त्या दोन पक्षांचा निर्णय आहे. त्यावर आम्ही काही प्रतिक्रिया दिली पाहिजे अशी वेळ नाही. पण कालचा कार्यक्रम आणि मराठी भाषा यावर प्रतिक्रिया द्यायचे असेल तर कालचा कार्यक्रम आणि त्यातील झालेली भाषण आणि मांडलेला त्या ठिकाणचा संपूर्ण इव्हेंट याला बघून एवढेच म्हणेन एकाचे भाषण अपूर्ण आणि दुसऱ्याचे भाषण अप्रासंगिक होत. एकाने अर्धवट मुद्दे मांडले तेही विपर्यासाचे होते, या प्रत्येक मुद्द्याला मी खोडू शकतो. माहिती संपूर्ण नाही. त्रिभाषा सूत्र कधी आली. यांच्या गावातही ती माहिती नाही. कोणी आणली याची माहिती दिली, ती भाषणात चुकीची होती. साधे गुगल केले असते तरी त्यांना त्याचे उत्तर सापडले असते. असे धादांत खोटे बोललेत म्हणून एकाचे भाषण अपूर्ण मी त्यांच्या भाषणातली प्रत्येक गोष्ट मांडू शकतो, उद्धवजींच्या भाषणात तर सत्ता गेल्याचा ससेहोलपटपणा होता, तडफड होती.
शेलारांच्या टीकेला मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी खोचक टोला लगावला आहे. ते म्हणाले की, आजच्या तारखेला भारतात आशिष शेलार एक नंबरचे वक्ते आहेत. त्यांना त्यांचे मत मांडण्याचा अधिकार आहे. पण विजयी मेळावा महत्त्वाचा होता म्हणूनच त्यांनी यावर मत व्यक्त केले.
उत्तर भारतीयांना राज ठाकरे घाबरले!
महाराष्ट्रातील उत्तर भारतीय सेनेचे नेते सुनील शुक्ला यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरे उत्तर भारतीयांना घाबरले आहेत असा त्यांनी समाज माध्यमांवर व्हिडिओ पोस्ट केला.
यात सुनील शुक्ला म्हणाले की, मुंबईत उत्तर भारतीयांची सत्ता येऊ शकते. येथे एक उत्तर भारतीय महापौर बसू शकतो. त्यामुळे राज ठाकरे घाबरले आहेत. राज ठाकरेंचा वरळीमध्ये कार्यक्रम झाला. उद्धव ठाकरेंसोबत एकत्र येत त्यांनी हा निर्णय घेतला की आम्ही हिंदी भाषिकांना मारणार नाही आणि मारहाण केली तर व्हिडिओ बनवणार नाही. ते घाबरले आहेत. राज ठाकरे घाबरले आहेत कारण मी सुप्रीम कोर्टातही अशी मागणी केली आहे की जर हिंदी भाषिकांवर असे हल्ले झाले तर कारवाई व्हावी. 15 जुलैला या प्रकरणात न्यायालयात सुनावणी होणार आहे. ही भीती असली पाहिजे. राज ठाकरे यांच्या बोलण्यातून ती दिसते. मराठी भाषेच्या नावावर द्वेष पसरवण्याचे काम जे सुरू आहे, त्याला आम्ही उत्तर देऊ. हिंदी भाषिकांना घाबरवता येणार नाही. तुमच्या भीतीमुळे सर्व सनातनी हिंदी भाषिक जिंकले आहेत. मराठी भाषेच्या नावावर तुम्ही जो द्वेष पसरवत आहात, तो उत्तर भारतीय विकास सेनेचे लोक संपवतील.
मुंबईत येऊन राज ठाकरेंचा अहंकार ठेचून काढेन! पप्पू यादवांची उघड धमकी
पाटना – बिहारमधील पूर्णियाचे बिहार जनअधिकार पक्षाचे खासदार राजेश रंजन उर्फ पप्पू यादव यांनी महाराष्ट्रात हिंदी भाषिकांवर हल्ला केल्याबद्दल राज ठाकरेंवर निशाणा साधला. ते म्हणाले की, मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे लोक महाराष्ट्रात हिंदी भाषिकांवर हल्ला करत आहेत. मी राज ठाकरे यांना आव्हान देतो की, त्यांनी ही गुंडगिरी थांबवावी, अन्यथा मी मुंबईत येऊन त्यांचा सर्व अहंकार ठेचून काढेन. ते पुढे म्हणाले की, पत्रकार परिषदेत मी उद्धव ठाकरे यांचे नाव चुकून घेतले. मी त्यांचा मनापासून आदर करतो. भाजपाच्या इशाऱ्यावर राज ठाकरे जी गुंडगिरी करत आहेत, ती मी चालू देणार नाही. प्रत्येक राज्याच्या प्रादेशिकतेचा आदर करायला हवा. पण जर त्यांनी आमच्या बिहारमधील लोकांवर त्याच्या नावाने हल्ला केला तर आम्ही शांत बसणार नाही.
ठाकरे बंधूंनी औकात असेल तर मला हात लावून दाखवा!
काली सेनेच्या अध्यक्षांचे आव्हान
पाटना- उत्तर प्रदेशच्या काली सेनेचे अध्यक्ष स्वामी आनंद स्वरुप यांनी ठाकरे बंधूंना आव्हान दिले आहे. ठाकरे बंधू मी मुंबईत येतो, औकात असेल तर मला हात लावून दाखवा. तुमचा हात तोडला नाही तर पाहा, असा त्यांनी इशाराच दिला आहे.
स्वामी आनंद स्वरुप यांनी व्हिडिओ पोस्टद्वारे म्हटले आहे की, महाराष्ट्रात राका व साका अर्थात मनसे प्रमुख राज व उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे हे जे दोन भाऊ आहेत त्यांच्या छोट्या छोट्या गँग आहेत. ते आता सत्तेपासून खूप दूर आहेत. अजान ही अरबी भाषेत नव्हे तर मराठीत द्या, असे मुस्लिमांना सांगण्याची त्यांच्यात हिंमत आहे का? त्यांची औकात आहे का मुस्लिमांवर बोलण्याची? साधेभोळे मजूर 2 हजार किलोमीटरवरून मुंबई, महाराष्ट्रात येऊन आपली उपजिविका चालवत आहेत त्यांना एकटे गाठून मारले जात आहे. त्यांचा छळ केला जात आहे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे व संजय राऊत, माझे तुम्हाला खुले आव्हान आहे. मी लवकरच मुंबईत येईन. तिथे उभे राहून हिंदीत बोलेन. मला कोण थांबवतो ते पाहतो. तुमची औकात असेल तर मला हात लावून दाखवा. तुमचा हात शरीरापासून वेगळा केला नाही तर माझे नाव बदला. माझ्या लोकांवर हात उचलता. माझ्या लोकांना मारता. भाषेच्या आधारावर देशाची फाळणी करता. आमच्यासाठी तमिळ, कन्नड, मल्याळम, हिंदी, भोजपुरी, मराठी आदी भारतात बोलल्या जाणाऱ्या सर्वच भाषा महत्त्वाच्या आहेत. या सर्व भाषा मिळूनच भारत बनतो. तुम्ही कुणावरही काही लादू शकत नाही. अन्यथा उद्या तुमचे खासदार दिल्लीत आले तर त्यांना पकडून त्यांच्या तोंडाला काळे फासू.
तेव्हा कुठे गेला होता राज ठाकरे?
26/11 हल्ल्यातील कमांडोची पोस्ट
लखनौ – 26-11 च्या मुंबई हल्ल्याच्यावेळी मुंबईत तैनात असलेल्या एका कमांडोने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 26-11 रोजी जेव्हा मुंबईवर हल्ला झाला होता त्यावेळी आपण दीडशे मुंबईकरांना वाचवले. त्यावेळी राज ठाकरे व त्यांची मराठी माणसे कुठे होती, असा प्रश्न त्याने उपस्थित केला आहे.
प्रविणकुमार टेओटिया असे या माजी कमांडोचे नाव असून त्याने समाजमाध्यमावर आपला फोटो प्रकाशित केला आहे. त्याच्या गणवेशावर युपी असे लिहिलेले आहे. मी जेव्हा मुंबईला वाचवले तेव्हा राज ठाकरे व त्यांचे तथाकथिक कार्यकर्ते कुठे होते, असा प्रश्न त्याने उपस्थित केला. त्याने सर्व लोकांना एकतेचेही आवाहन केले आहे. अर्थात मराठा जवानांनी देशातील विविध संकटांच्या काळात लोकांना वाचवले आहे. त्यांच्यापैकी कोणीही अशी पोस्ट टाकली नाही. त्यामुळे त्याने मराठी लोकांवर टीका करण्याच्या नादात सैन्याची शिस्त मोडली, अशीही प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
