मुंबई- राज्यात पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषेची सक्ती करण्याच्या मुद्यावर उबाठाचे उद्धव आणि मनसेचे राज ठाकरे यांनी दोन स्वतंत्र मोर्चे काढण्याची घोषणा काल केली होती. मात्र आज या मुद्यावर दोन ठाकरे बंधुंनी अत्यंत समजूतदार भूमिका घेतली. दोन्ही पक्षांनी राजकारण बाजूला सारत मराठी भाषा, मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या हितासाठी 5 जुलै रोजी एकत्र मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली. गिरणी कामगारांच्या मोर्चात एकत्र आल्यानंतर दोन्ही ठाकरे बंधू प्रथमच या आंदोलनाच्या निमित्ताने एकत्र येत असल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून, दिवसभर या मोर्चाचीच चर्चा होती.
आज सकाळी सर्वप्रथम शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी उध्दव आणि राज ठाकरे यांचा एक फोटो ट्वीट करून त्याखाली ‘एकच आणि एकत्र मोर्चा,’ असा संदेश दिला. तेव्हापासून माध्यमांमध्ये राऊत यांच्या ट्वीटची चर्चा सुरू झाली. काही वेळाने संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन उबाठा आणि मनसे एकत्र मोर्चा काढणार, अशी अधिकृत घोषणा केली. पाठोपाठ मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनीही पत्रकार परिषद घेऊन मनसेची भूमिका स्पष्ट करताना 5 जुलै रोजी एकत्र मोर्चा काढण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
उबाठा-मनसे एकत्र मोर्चा काढण्याच्या निर्णयाची माहिती देताना राऊत म्हणाले की, मराठीच्या मुद्यावरून संयुक्त मराठी कृती समितीने 7 जुलै रोजी मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. या मोर्चाला उध्दव ठाकरे यांनी जाहीर पाठिंबा देत 7 जुलैच्या मोर्चामध्ये सामील होऊ असे जाहीर केले. याबद्दल माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद बोलावली गेली. ही पत्रकार परिषद सुरू असताना दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 6 जुलै रोजी मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. त्यामुळे उबाठा आणि मनसे यांचे दोन मुद्दे मराठीच्या मुद्यावर निघणार होते. पण रात्री राज ठाकरे यांनी स्वतः फोन करून माझ्याशी एकच मोर्चा काढण्याची इच्छा व्यक्त केली. मी तातडीने उद्धव ठाकरे यांना त्याबद्दल सांगितले. त्यांनी जराही आढेवेढे न घेता त्यांनी होकार दिला. 6 जुलै रोजी आषाढी एकादशी असल्याने मोर्चासाठी दुसरी तारीख ठरवा, अशी सूचना त्यांनी केली. कारण 6 जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त मराठी भाविक व्यग्र असतील. त्यामुळे मोर्चा यशस्वी होणार नाही, असे उध्दव ठाकरे यांनी सांगितले. त्यानुसार मी राज ठाकरे यांना मनसे आणि उबाठाने 5 जुलै रोजी एकच आणि एकत्र मोर्चा काढावा असे सुचवले. त्याला राज ठाकरे यांनी मान्यता दिली. राज ठाकरे यांनी 6 जुलै रोजी सकाळी 10 वाजताची मोर्चाची वेळ ठरवली होती. ती वेळ सोयीची ठरणार नाही. कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठी माणूस या मोर्चासाठी येणार आहे, असे मी राज ठाकरे यांना सांगितले. त्यांनाही ते पटले. आता मोर्चाची वेळ आणि मोर्चा कुठून कुठे काढायचा एवढे निश्चित करणे बाकी आहे. दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते चर्चा करून त्यावर निर्णय घेतील.
संदीप देशपांडे पत्रकार परिषदेत म्हणाले की, राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्या मोर्चा संदर्भात चर्चा झाली. 6 जुलै रोजी आषाढी एकादशी असल्यामुळे ती तारीख रद्द करण्यात आली. दुसऱ्या दिवशी सोमवार असल्याने शिक्षक, विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाला मोर्चाला हजर राहता येणार नाही. त्यामुळे सर्वानुमते 5 जुलै रोजी एकत्र मोर्चा काढण्याचे ठरले आहे. राज्यातील तमाम मराठी प्रेमी लोक, कलावंत, क्रीडापटू आणि सर्वपक्षीय नेत्यांनी या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन आम्ही करत आहोत. जास्तीत जास्त मराठी माणसाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न आम्ही पुढील काही दिवस करणार आहोत.
ही घोषणा झाल्यावर संदीप देशपांडे आणि उबाठाचे आमदार वरुण सरदेसाई यांची दादरच्या जिप्सी रेस्टॉरंटमध्ये भेट झाली. रेस्टॉरंटच्या बाहेरच्या भागात असलेल्या बाकड्यांवर बसून दोन्ही नेत्यांनी गप्पा मारल्या. त्यांनी सांगितले की, हा मोर्चा भव्यदिव्य असला पाहिजे यासाठी विद्यार्थी, पालक, कलाकार आणि सामान्य नागरिकांना कशाप्रकारे आवाहन करायचे, यावर चर्चा करण्यासाठी आमची आज भेट झाली. राजकारणापलीकडे जाऊन काहीतरी करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आहेत. 5 जुलैच्या मोर्चाविरोधात काही मराठीद्वेष्टे कोर्टात जाण्याची भाषा करत आहेत. त्यांना आम्ही मराठी जनतेची ताकद दाखवून देऊ. राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठी आम्ही आपापसातील मतभेद दूर ठेवण्यासाठी तयार आहोत. त्यानंतर आ. आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडे यांचीही भेट झाली. दादरमध्ये एका कार्यक्रमावेळी दोघे समोरासमोर आले. यावेळी दोघांनी हस्तांदोलन करत एकमेकांशी संवाद साधला. दोघे खळखळून हसतानाही दिसले.
दोन्ही पक्षांच्या वतीने एकत्र येण्याची अधिकृत घोषणा झाल्यानंतर माध्यमांवर उलटसुलट प्रतिक्रियांचा गदारोळ उडाला. बहुतांश प्रतिक्रिया ठाकरे बंधु एकत्र आल्याबद्दल आनंद व्यक्त करणाऱ्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे, खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ आदि नेत्यांनी या निर्णयाचे स्वागत केले. तर दुसरीकडे भाजपाचे नेते शेलारे म्हणाले की, शालेय शिक्षणात त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा निकाल राष्ट्रीय शिक्षण समितीने 2022 मध्ये दिला तेव्हा उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होती. त्यांनी त्रिभाषा सूत्र स्वीकारले होते. इयत्ता पाचवीपासून हिंदी भाषेची सक्ती काँग्रेसच्या सरकारने केली होती. आम्ही ती रद्द केली, याची कल्पना राज ठाकरे यांना नसावी. ते गैरसमजाचे बळी आहेत. राज्याच्या राजकारणात स्वतःची गमावलेली पत पुन्हा मिळवण्यासाठी मराठी भाषेच्या नावाने उबाठा आणि मनसे राजकारण करत आहेत. मराठीबाबत भाजपाचीही तीच भूमिका आहे. राज्यात मराठीचीच सक्ती आहे. हिंदीची नाही. या मोर्चात भाजपाविरोधातील इतर पक्षांनाही सहभागी करून घेण्याचा उबाठा-मनसेचा प्रयत्न आहे. मनसेचे बाळा नांदगावकर यांनी आज काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांना मोर्चात सहभागी होण्यासाठी फोन केला होता. तर दोन्ही ठाकरेंची भूमिका समजून घेऊन मोर्चात सहभागी व्हायचे की नाही, हा निर्णय घेणार आहोत, असे म्हणणाऱ्या शरद पवार यांनीही नंतर मोर्चाला पाठिंबा दिला. बच्चू कडू हेदेखील मोर्चात सहभागी होणार आहेत.
महायुतीत एकमत नाही
राज्यात पहिलीपासून त्रिभाषा सूत्र अंमलात आणून तिसरी भाषा हिंदी शिकवण्याचा राज्य सरकारच्या निर्णयाला महायुतीतच एकमत नसल्याचे चित्र आहे. या मुद्द्यावरून राज्यात वातावरण तापलेले असताना महायुतीत भाजपा आणि शिंदेगट एका बाजूला तर अजित पवार असे चित्र महायुतीत पाहायला मिळत आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता, ते म्हणाले की पहिली ते चौथी या वर्गात हिंदी असू नये. पाचवीपासून हिंदी शिकवावी. पहिलीपासून मुलांना मराठी शिकवावे. त्यांना मराठी लिहिता, वाचता आले पाहिजे. मुले पहिलीपासून मराठी लिहायला वाचायला शिकतात तेव्हा हिंदीही लिहिता वाचता येते. त्यामुळे पाचवीपासून हिंदी शिकवली तरी काही हरकत नाही. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या विषयावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, मंत्री दादा भुसे अनेकांना भेटत आहेत. हिंदी भाषेवर ज्यांनी आक्षेप घेतला आहे त्यांच्याशी चर्चा केली जाईल. त्यांच्याशी सल्लामसलत केली जाईल. आम्ही हिंदी अनिवार्य हा शब्द काढला आहे. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. जबरदस्तीने निर्णय घेणार नाही. सर्वांशी बोलल्यानंतरच आम्ही यावर निर्णय घेऊ.
