मुंबई- छोट्या पडद्यावरील प्रसिध्द अभिनेता ऋतुराज सिंह यांचे निधन झाले. त्यांनी वयाच्या ५९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कार्डियाक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाल्याचे सांगितले जात आहे. ऋतुराज गेलया काही दिवसांपासून स्वादुपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांना आणि टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. ऋतुराज यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘काही दिवसांपूर्वी ऋतुराज यांना स्वादुपिंडाच्या आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार घेऊन ते घरी आले. पण अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले आणि कार्डियाक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाले.’ ऋतुराज यांच्या चाहत्यांनी आणि अनेक अभिनेत्यांनी त्यांना सोशल मिडीयावर श्रध्दांजली अर्पण केली. ऋतुराज यांनी अनेक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यांनी छोट्या पडद्यावरील ‘ज्योती’, ‘हिटलर दीदी’, ‘शपथ’, ‘वॉरियर हाय’, ‘आहट और अदालत’, ‘दीया और बाती हम’ यासारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम केले होते. काही दिवसांपूर्वी ते अनुपमा या कार्यक्रमातदेखील दिसले होते. त्यांनी दिल्लीत बॅरी जॉन्स थिएटर ॲक्शन ग्रुपसोबत १२ वर्षे थिएटरवर काम केले आणि झी टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या तोल मोल के बोल या टीव्ही गेम शोमध्ये काम केले. त्यांंनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे, ज्यात एक खेल राजनीती, बद्रीनाथ की दुल्हनिया इत्यादी चित्रपटांचा समावेश आहे.