भुयारी मेट्रोजवळ रस्ता खचला! पाच फुटांचा खड्डा! बस अडकली


मुंबई- गिरगाव येथे काम चालू असलेल्या भुयारी मेट्रो स्टेशनजवळील रस्ता आज सकाळी पावसामुळे खचून पाच फूट खोल खड्डा पडला. या खड्ड्यामध्ये बेस्ट बस अडकली. सुदैवाने बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
काही दिवसांपूर्वी पहिल्या पावसातच वरळी भुयारी मेट्रो स्थानकात पाणी साचले होते. त्यामुळे काही दिवस हे स्थानक बंद करावे लागले होते. आता गिरगाव स्थानकाजवळचा रस्ता खचल्याने मेट्रोच्या कामाच्या दर्जावर शंका उपस्थित केली जात आहे.
गिरगावातील ठाकूरद्वार सिग्नलजवळ कुलाबा ते अंधेरी सिफ्झ भुयारी मेट्रो मार्गाचे स्थानक उभे राहत आहे. मोठमोठ्या यंत्रांच्या मदतीने एमएमआरडीएचे या परिसराला धडधडवणारे काम सुरू आहे. हे स्थानक वर्दळीच्या बाबासाहेब जयकर मार्गावर आहे. हा रस्ता आज सकाळी साडेनऊ वाजता खचला आणि तब्बल पाच फूट खोल खड्डा पडला. या खड्ड्यात 121 क्रमांकाची बॅकबे आगारातून जे. मेहता मार्ग कडे जाणाऱ्या बसचे मागील चाक अडकले. त्यामुळे एकच गोंधळ उडून मोठी वाहतूक कोंडी झाली. या परिसरात मेट्रोच्या कामामुळे आधीच रहिवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यातच आजच्या प्रकारामुळे रहिवासी संतप्त झाले. मेट्रोच्या कामामुळे जमीन कमकुवत होऊन खचली, असा आरोप त्यांनी केला. सव्वा तासाने ही बस खड्ड्यातून बाहेर काढण्यात आली.
बेस्ट प्रशासनाने याबाबत माहिती दिली की, बॅकबे डेपोची 121 क्रमांकाची बस जे. मेहता मार्गाकडे जात असताना ठाकूरद्वार सिग्नलजवळ अचानक रस्ता खचला. त्या खड्ड्यात या बसचे मागचे डावे चाक अडकले. सुदैवाने बसमधील प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही. ही बस खासगी कंत्राटदार टाटा समूहाची असल्याने या कंपनीचे अधिकारी तानाजी आडारकर यांना कळवण्यात आले. बस तातडीने खड्ड्यातून बाहेर काढण्याच्या कार्यवाहीच्या सूचनाही दिल्या. त्यानुसार क्रेनने बस उचलून बाजूला काढण्यात आली. ती डेपोमध्ये परत पाठवण्यात आली. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. बसचेदेखील जास्त प्रमाणात नुकसान झाले नाही. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने खुलासा केला की, गिरगाव पुनर्वसन इमारतींच्या बेसमेंट पिटमध्ये पाण्याचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे मेट्रोशी संबंधित नसलेल्या जवळच्या परिसरातील वाहिन्यांना गळती लागली आहे. यामुळे जमिनीत पोकळी निर्माण झाली आहे. मात्र ती पृष्ठभागावर दिसली नाही. एमएमआरसीएल महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या समन्वयाने पाण्याच्या वाहिन्या, गटार, नाले यातील गळती शोधून ती तातडीने दुरुस्त करण्याचे काम करत आहे.