मुंबई- मुंबईतील मेट्रो रेल्वे मार्गांवरील स्थानकांना नाव देताना जाणूनबुजून पंडित नेहरू व महात्मा गांधी यांची नावे वगळण्यात आली. या प्रमाणात त्यांचा द्वेष होत आहे असा आरोप आज उबाठा नेते संजय राऊत यांनी केला.
ते म्हणाले की, राज्यातील महायुतीच्या सरकारने वरळीतील सुप्रसिध्द नेहरू सायन्स सेंटरलगत जे मेट्रो रेल्वेचे स्थानक आहे त्याला नेहरूंचे नाव वगळून नुसते सायन्स सेंटर असे नाव दिले आहे. तर बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाबाबतही असेच केले आहे. तेथे संजय गांधी हे नाव वगळून मेट्रो स्थानकाला केवळ राष्ट्रीय उद्यान मेट्रो स्थानक असे नाव देण्यात आले आहे. यातून राज्यकर्त्यांचा नेहरू व गांधी द्वेष किती टोकाचा आहे हेच दिसून येते. असे द्वेषाचे राजकारण करणारे राज्यकर्ते लाभले हे महाराष्ट्राचे आणि देशाचे दुर्दैव आहे, अशी खंत राऊत यांनी व्यक्त केली.
सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी घडू शकतात, असे संकेत देत ते म्हणाले की, या घडामोडी नेमक्या कोणत्या याबद्दल आता सांगत नाही.
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांच्या वक्तव्याबद्दल छेडले असता ते म्हणाले की, दुबे हा दलाल आहे. असे किती दुबे आले आणि गेले. 106 हुतात्म्यांचे बलिदान देऊन मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळविला आहे. त्यात एकही दुबे, चौबे किंवा मिश्रा नव्हता. मराठी माणूस, गिरणी कामगार छातीचा कोट करून लढला. तुमच्या राज्यात नोकऱ्या – रोजगार नाहीत म्हणून तुम्ही मुंबईत येता. तुम्ही मुंबईला भव्य दिव्य बनवण्यासाठी नव्हे तर स्वतःचे पोट भरण्यासाठी येता. येथे पैसे कमावता आणि उत्तर प्रदेश-बिहारमध्ये नेता. त्यामुळे महाराष्ट्र आणि मराठी माणसाबद्दल वावगे बोलायचा तुम्हाला अधिकार नाही, असे राऊत म्हणाले.
