राज ठाकरेंचा शरद पवारांवर घणाघात जरांगेंच्या आडून राजकारण! दंगल घडवतील

छत्रपती संभाजीनगर – मनसे अध्यक्ष राज ठाकरे धाराशिव दौर्‍यावर असताना त्यांच्या विरोधात मराठा आरक्षणावरून घोषणाबाजी करण्यात आली तर बीड दौर्‍यात त्यांच्या ताफ्यावर सुपार्‍या फेकण्यात आल्या. यामुळे संतापलेल्या राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत थेट शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे नाव घेऊन त्यांच्यावर घणाघात केला. ते म्हणाले की, जरांगे यांच्या मागून शरद पवार आणि उध्दव ठाकरे जातीचे राजकारण करीत आहेत. ते पत्रकारांना हाताशी धरून विष पसरवित आहेत. यातूनच विधानसभा जिंकू असे त्यांना वाटते. त्यासाठी येत्या 3 महिन्यांत ते दंगली घडवतील.
छत्रपती संभाजीनगर येथे राज ठाकरे यांनी दौर्‍याच्या शेवटच्या दिवशी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, आज लहान मुले जातीबद्दल बोलत आहेत. हे जातीपातीचे विष राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून शरद पवार यांनी पेरले आहे. शरद पवार हे अनुभवी राजकारणी आहेत. त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मैत्री आहे. मग शरद पवारांनी मराठा आरक्षणाबाबत शब्द का नाही टाकला? मनोज जरांगेंच्या आडून यांचे विधानसभेचे राजकारण सुरू आहे हे उघड झाले पाहिजे. शरद पवारांसारखा वयस्कर माणूस महाराष्ट्रात मणिपूर होईल, असे वक्तव्य करत आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना मराठवाड्यात दंगली घडवायच्या आहेत. तुमचे राजकारण तुमच्यासाठी लखलाभ, पण माझ्या वाटेला जाऊ नका. माझे मोहोळ उठले तर मग तुम्हाला राज्यात एकही सभा घेता येणार नाही.
ते पुढे म्हणाले की, लोकांच्या मनात मोदी आणि अमित शहा यांच्याबद्दल राग होता. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या विरोधात मतदान झाले. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर प्रेम आहे म्हणून त्यांच्या पक्षांना मतदान झाले नाही. हे त्यांनी समजून घेतले पाहिजे. येत्या विधानसभा निवडणुकीत आपल्या बाजूने मतदान व्हावे यासाठी जातीवरून तरुणांची माथी भडकवली जात आहेत. पुढच्या तीन महिन्यांत दंगली घडवण्याचा यांचा प्रयत्न सुरू आहे. शरद पवारांचे राजकारण पाहिले तर तुम्हाला समजेल. दुसर्‍याच्या जातीबद्दल द्वेष निर्माण करण्याचे काम शरद पवारांनी केले. अजित पवार यांनी असे राजकारण कधी केले नाही, असे राज ठाकरे म्हणाले.
आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले की, 2006 सालापासून आजपर्यंत माझी एकच भूमिका आहे की, आर्थिक निकषांवर आरक्षण द्यायला हवे. महाराष्ट्रात बाहेरून आलेल्या लोकांना सर्व गोष्टी मिळतात. मात्र त्या गोष्टी येथील स्थानिकांना मिळत नाहीत. राज्यात जर पहिला विचार स्थानिकांचा झाला तर आरक्षणाची गरज पडणार नाही. आर्थिकदृष्ट्या जो मागास आहे त्याला आरक्षण द्यायला हवे. महाराष्ट्रात सर्व उपलब्ध असल्याने इथे आरक्षणाची गरज नाही, असे राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरेंचे पत्रकारांवर
जाहीर गंभीर आरोप

राज ठाकरे यांनी स्वतः म्हटले होते की, महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही. त्यांच्या या वक्तव्याच्या बातम्या आल्यावर त्यांना दौर्‍यात विरोध झाला. त्यामुळे ते संतापले आणि त्यांनी पत्रकारांवरच गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, माझ्या विरोधात बातमी द्यायचे कंत्राट काही पत्रकारांना दिले आहे. धाराशीव आणि नांदेड येथे मला त्याचा अनुभव आला. माझ्या विरोधात घोषणा देणार्‍यांना मी चर्चेला बोलावले तर काही पत्रकारांनीच त्यांना येऊ दिले नाही. विरोधात बोलणारे दोघे उध्दव ठाकरे गटातील तर दोघे शरद पवारांच्या बरोबर दिसणारे होते. ज्या पत्रकारांना हाताशी धरून हे सर्व सुरू आहे त्यातील काहींना पेव्हर ब्लॉकची कंत्राटे, एमआयडीसीची कंत्राटे दिली आहेत. काहींना गाड्या मिळाल्या आहेत. माझ्याकडे सर्व माहिती आहे. राज ठाकरे यांनी हे सर्व आरोप केले आणि या पत्रकारांची नावे इतर पत्रकारांनी उघड करावी, असे आवाहन केले. मात्र स्वतः राज ठाकरे यांना सर्व माहिती असूनही त्यांनीच नावे उघड का केली नाहीत? असा सवाल विचारला जात आहे .