Home / महाराष्ट्र / आंदोलन तीव्र! जरांगे आजपासून पाणीही सोडणार! भाजपा मंत्री चंद्रकांत पाटलांचा मराठ्यांना विरोध

आंदोलन तीव्र! जरांगे आजपासून पाणीही सोडणार! भाजपा मंत्री चंद्रकांत पाटलांचा मराठ्यांना विरोध

मुंबई- मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील हे उद्यापासून पाणीही पिणार नसल्याने आंदोलनाला अधिक धार येणार आहे. मराठवाडा व सातार्‍यातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची घोषणा केल्याशिवाय मुंबई सोडणार नसल्याचा निर्धार जरांगे यांनी आज पुन्हा बोलून दाखवला. आज सरकार पातळीवर फडणवीस, गिरीष महाजन, न्या. शिंदे यांची चर्चा झाली. आपल्या दरे गावी गेलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईला परतले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द करून मुंबई गाठली. मराठा आरक्षण समितीच्या सर्व सदस्यांची भेट झाली. सरकार पातळीवर या हालचाली होत असताना मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य व भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, मराठा समाज हा मागास नाही. मराठ्यांनी कुणबी प्रमाणपत्र घेतले तरी ते टिकणार नाही. त्यांच्या या वक्तव्याने मराठा समाजात खळबळ माजली. चंद्रकांत पाटील हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत, ते संघाचे कार्यकर्ते आहेत, सरकारमध्ये मंत्री आहेत. त्यांनी ही भूमिका जाहीर केली म्हणजे सरकारचेही हेच विचार आहेत, अशी चर्चा मराठा करू लागले.

चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना जरांगे म्हणाले की, अक्कल नसल्यामुळेच त्यांची उपसमिती प्रमुखपदावरून हकालपट्टी करण्यात आली. दरम्यान आज खासदार सुप्रिया सुळे जरांगे यांना भेटायला आझाद मैदानात आल्या. जरांगे यांची विचारपूस करून आझाद मैदानावरून निघताना काही आंदोलकांनी त्यांच्या वाहनावर पाण्याच्या बाटल्या फेकल्या. दरम्यान मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत सातारा आणि हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासंदर्भात चर्चा झाली. सरकारने अंमलबजावणीसाठी वेळ मागितला आहे. यावेळी महाधिवक्‍ता बिरेंद्र सराफ हजर होते.

जरांगे यांनी दुपारी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, तुम्हाला काय करायचे आहे याच्याशी आम्हाला काही देणेघेणे नाही. आम्हाला ओबीसीमधून आरक्षण पाहिजे. त्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही. शनिवारी, रविवारी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज घरी राहत नसतो हे लक्षात ठेवा. आपण जे बोलतो ते करतो. तुम्ही फक्त पुढील शनिवारी, रविवारी पाहा. उद्यापासून कडक उपोषण सुरू करणार आहे. पाणी पिणेही बंद करणार आहे.

ते पुढे म्हणाले, मराठा समाजाच्या एकाही पोराने दगडफेक करायची नाही. समाजाला खाली मान घालावी लागेल, असे एकही पाऊल कुणी उचलायचे नाही. आपल्यावर कितीही अन्याय झाला तरी शांतता राखायची. मंत्रिमंडळ उपसमिती नुसत्या बैठका घेत आहे. आतापर्यंत तोडगा का काढला नाही? असा सवाल त्यांनी केला.

आंदोलकांना मदत करण्यासाठी पैसे घेणार्‍यांना जरांगे पाटील यांनी इशारा दिला. ते म्हणाले, आंदोलनाच्या ठिकाणी अन्नछत्र सुरु केले आहेत ते महाराष्ट्रातील लोकांनी आणि काही मुंबईतील लोकांनी केले आहेत. पण त्याच्या नावाखाली कोणीही पैसे कमवू नका. अन्यथा मी मीडियात त्या व्यक्तीचे नाव घेईन. परत म्हणू नका हे काय झाले. अन्नछत्र एकाने सुरू केले आणि पैसे दुसरा गोळा करतो. अशा पद्धतीने गरीबांचे रक्त पिण्याचे काम बंद करा. मी स्पष्ट सांगतो त्या व्यक्तीचे नाव घेईन, तो माझ्या कितीही जवळचा असला तरीही मी त्याचं नाव घेईन.

यावेळी जरांगेंनी मंत्री नितेश राणे यांच्यावरही टीका करताना त्यांचा उल्लेख चिंचुद्री असा केला. ते म्हणाले, चिंचुद्रीचे कधी पाय मोजता येत नाहीत. तिचा पायाचा मेळ लागत नाही. ती सर्व ऋतूत लाल असते आणि ती काय म्हणते हे कोणालाच समजत नाही. आंदोलन एकदा संपू द्या, मग नितेश राणेंना मी उत्तर देतोच.

आज काही आंदोलकांनी चर्चगेट स्थानक परिसरातील रामदेव पोदार चौकात ठिय्या मांडल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली. एक मराठा, लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्या. पोलिसांनी काही वेळातच आंदोलकांना बाजूला करत वाहतूक सुरळीत केली.
तिसर्‍या दिवशी पोलिसांनी आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावले आहेत. आतापर्यंत बघ्याच्या भूमिकेत असलेले पोलिस आज काहीसे सक्रीय झाले. सीएसएमटी स्थानकावर प्लॅटफॉर्मवर शिरून आंदोलकांना बाहेरचा रस्ता दाखवत होते. बाहेरही गर्दी होणार नाही, यासाठी प्रयत्न करत होते. रस्त्याच्या कडेला थांबून निरीक्षण करणारे शीघ्र कृती दलाचे जवानही चौकाच्या मधोमध थांबून बंदोबस्त करत होते. रस्ता रोखून धरणार्‍या किंवा वेगवेगळ्या कारणांसाठी अडून बसलेल्या आंदोलकांपर्यंत थेट जरांगे पाटलांचा संदेश पोचवण्यासाठी प्रशासनाने महापालिकेसमोर मोठमोठे एलईडी लावले आहेत. सीएसएमटी स्थानकासोबतच आझाद मैदान, महापालिका परिसरात ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावल्याचे दिसले. फलक नसल्याने आंदोलकांचा मोठा गोंधळ होत होता.
दोन दिवस अन्नपाण्यासाठी त्रस्त असलेल्या आंदोलकांची आज खाण्यापिण्याची सोय झाली. महाराष्ट्रभरातून टेम्पोच्या टेम्पो खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊन आंदोलन परिसरात दाखल झाले. रस्त्यावरून जाणार्‍या-येणार्‍यांनाही आग्रह करून गावाकडची शिदोरी खाण्याचा आग्रह धरत होते. सगळीकडेच आंदोलक काही ना काही खात असल्याचे दिसले. जे खात नव्हते, त्यांच्या हातात पाण्याच्या बाटल्या होत्या. त्यामुळे सर्वत्र कचरा झाला होता. सकाळीच पावसाचा एक सडाका आल्याने या अस्वच्छतेत आणखी भर घातली गेली. महापालिकेची यंत्रणा अपुरी पडली. प्रशासनाला अजूनही आंदोलनाचा, आंदोलकांचा नेमका अंदाज आला नसल्याचे संपूर्ण नियोजनावरून दिसले.


सीएसएमटी परिसरातील खाऊगल्ली आजही बंद आहे. मुंबईत ठिय्या मांडुन बसलेल्या मराठा बांधवांचे अन्नपाण्यावाचुन हाल होऊ नयेत यासाठी मराठवाड्यासोबतच मुंबईत स्थायिक असलेल्या नागरिकांनीही आंदोलकांचे चहापाणी आणि जेवणाची सोय केली. चाकण येथील अक्षय भोसले या तरुणाने गावकर्‍यांना गोळा करून पालिका परिसरात चहा तयार करून त्याचे वाटप केले. परभणीचे नरेश जवादे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी आंदोलकांसाठी खिचडीचे वाटप केले. जालना, बीड, नाशिक, धाराशिव, परभणी, लातूर, नांदेड, अहिल्यानगर येथील नागरिकांनी बिस्कीट, पाणी, केळी, सफरचंद, भाकरीचे वाटप केले.

धाराशिवच्या कळंबमधील नागरिकांनी ‘एक घर दोन भाकरी’ या सोशल मीडियावरील आवाहनाला प्रतिसाद देत घरोघरी थापलेल्या भाकरी, कांदा-चटणी, बिस्किटे आणि औषधे गोळा केली. ही सर्व सामग्री घेऊन तीन मालवाहू वाहने मुंबईत आली. विरारमधील नागरिकांनी आंदोलक नातेवाईकांसाठी भाजी, भाकरी आणि ठेचा घरातून बनवून आणला. नांदेड येथून राज्य राणी एक्सप्रेसमधून 20 क्विंटल पोळी भाजी सीएसएमटी रेल्वे स्थानकात आल्यानंतर त्याचे वाटप करण्यात आले.

आझाद मैदान परिसरात मुक्काम केलेल्या आंदोलकांनी पिण्याच्या पाण्यासाठी आलेल्या टँकरच्या खाली बसून रस्त्यावरच आंघोळ केली. महापालिकेने आझाद मैदान परिसरात ठिकठिकाणी पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले आहे. तसेच फिरत्या शौचालयांचीही सोय केली आहे. आज रविवारचा दिवस असल्याने लोकल ट्रेनला फारशी गर्दी नव्हती. त्यामुळे हार्बर मार्गावर सगळीकडे मराठा आंदोलकांचेच साम्राज्य दिसत होते. गर्दी कमी असल्याने आंदोलकांनी सीएसएमटी स्थानकातच बैठक मारली.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरापासून काही अंतरापर्यंत महिला आणि पुरुषांनी हलगी वाजवत मोर्चा काढला. या मोर्चात पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपाचे, राज्यपाल सी. पी राधाकृष्ण भाजपाचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपाचे, पालकमंत्री भाजपाचे, आमदार, खासदार भाजपाचे, गावात सरपंच भाजपाचा मग आरक्षणाचे घोडे कुठे अडले आहे? असा सवाल बॅनरमधून केला. यावेळी आंदोलकांनी आरक्षण दिल्याशिवाय मुंबई सोडणार नाही अशी घोषणाबाजी केली. एका आंदोलकाने बीड येथून आणलेल्या पिण्याच्या पाण्याचे वाटप करत बीडचे पाणी घ्या, अशी टीका मुंबई पालिकेवर केली.

लातूर येथील आंदोलक स्वाती पाटील यांनी सांगितले, की आम्ही अंतरवाली सराटीपासून जरांगे पाटील यांच्यासोबत आहोत. शेवटपर्यंत त्यांच्याचसोबत राहू. गौरी-गणपतीच्या सणाला घरी राहिलो नाही, कारण आरक्षण हेच आमच्यासाठी मोठे आहे. दोन आंदोलकांचा मृत्यू झाला आहे, आणखी किती लोकांचा बळी घ्यायचा? कोणालाही त्रास होईल, असे काही करणार नाही पण आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही.

राज ठाकरे कुचक्या कानाचे- जरांगे

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मनोज जरांगे-पाटलांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली. राज यांनी जरांगेंच्या आंदोलनाबद्दल सर्व स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच देऊ शकतात, असे वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर जरांगे यांनी एकेरी शब्दांत राज ठाकरेंवर घणाघाती हल्ला चढवला. राज ठाकरे कुचक्या कानाचे आहेत, असे म्हटले. जरांगे म्हणाले की, राज्यातल्या समाजाचे म्हणणे आहे की, ते दोघे भाऊ (राज आणि उद्धव ठाकरे) चांगले आहेत, ब्रँड चांगला आहे. पण हा विनाकारण मराठ्यांच्या प्रश्नात पडतो. आम्ही कधी तुम्हाला विचारले का की, 11 ते 13 आमदार निवडून दिले आणि ते पळून गेले. त्यानंतर तुम्ही आमच्या मराठवाड्यात कधी आलात? पुण्यात किंवा नाशिकमध्ये तुम्ही किती वेळा जाता? फडणवीसांनी एकदा लोकसभेला तुमचा गेम केला, विधानसभेला तुमच्या मुलाला पाडले, तरी तुम्ही त्यांचीच री ओढता. राज ठाकरे म्हणजे मानाला भुकेला पोरगा आहे. त्यांच्या घरी फडणवीस चहा पिऊन गेले, सगळा पक्ष बरबाद झाला तरी त्यांना चालते. आमच्या खेड्यात याला कुचक्या कानाचे म्हणतात.