Home / महाराष्ट्र / ईदीला पशुधन बाजार बंदी जाहीर! मुस्लिमांचा विरोध होताच आदेश रद्द

ईदीला पशुधन बाजार बंदी जाहीर! मुस्लिमांचा विरोध होताच आदेश रद्द

मुंबई– सात जूनला येणाऱ्या बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर 3 ते 8 जून या काळात राज्यातील सर्व पशुधन बाजार बंद करण्याचा...

By: E-Paper Navakal


मुंबई– सात जूनला येणाऱ्या बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर 3 ते 8 जून या काळात राज्यातील सर्व पशुधन बाजार बंद करण्याचा आदेश राज्य गोसेवा आयोगाने दिला होता. मात्र मुस्लीम बांधवांनी या निर्णयाला कडाडून विरोध करताच राज्य सरकारने हा निर्णय तत्काळ मागे घेतला. त्यामुळे हिंदू संघटना नाराज झाल्या आहेत.
राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र गोसेवा आयोगाने गेल्या आठवड्यात सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांना पत्र पाठवून 3 जून ते 8 जून या कालावधीत पशुधन बाजार बंद ठेवण्याचे आदेश जारी केले होते. या आदेशात म्हटले होते की, बकरी ईद सणाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर प्राण्यांची कत्तल होते. पशूंची कत्तल होऊ नये यासाठी 3 ते 8 जून या काळात कुठल्याही गावात पशुधन बाजार भरवण्यात येऊ नयेत. याबाबतीत दक्षता बाळगावी. बकरी ईदच्या निमित्ताने हे बाजार भरवण्याला काही हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला होता. त्याची दखल घेऊन हा निर्णय घेण्यात आला. मात्र, या पत्रामुळे मुस्लीम सामाजात नाराजी पसरली. त्यांनी म्हटले की राज्यात कायद्यानुसार गोवंश हत्या बंदी आहे. मात्र आयोगाने सरसकट गुरांचे बाजार बंद करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे ईदच्या कुर्बानीसाठी बकरे मिळणे शक्य होणार नाही. राज्याने गोहत्या होऊ नये यासाठी पावले उचलण्याची गरज आहे, पण संपूर्ण पशू बाजार बंद करण्याचा काय हेतू आहे? बाजार भरले नाहीत तर शेळ्या, म्हशी आणि मेंढ्या यांसारख्या प्रतिबंधित नसलेल्या प्राण्यांचा व्यापारही थांबेल. परिणामी शेतकरी, कुली, दलाल, चालक, कुरेशी-खाटिक समुदाय आणि मजुरांचे दैनंदिन उत्पन्न बंद होईल.
मुंबईतील मुस्लीम आमदारांनीही काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या बैठकीत त्यांनी मुस्लीम समाजाचे म्हणणे फडणवीस यांच्या कानावर घातले. या बैठकीनंतर पशुधन बाजार बंदीचा आदेश राज्य सरकारने रद्द केला. मुस्लीम आमदारांनी या बैठकीत देवनार कत्तलखान्याचे आधुनिकीकरण करावे, मुंबईत मांस मार्केटचे पूर्व-पश्चिम आणि उपनगर असे विकेंद्रीत पद्धतीने वर्गीकरण करावे अशा मागण्या फडणवीस यांच्याकडे केल्या. गोवंशाच्या नावाखाली काही संघटना बिगर गोवंश जनावरांच्या वाहतुकीला अडथळे आणतात, हप्ते घेतात, वाहन चालकांना मारहाण करतात. त्यांचा बंदोबस्त करावा, अशी तक्रारही मुस्लीम आमदारांनी केली. त्यानंतर देवनार कत्तलखान्याचे आधुनिकीकरण करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली.
पशुधन बाजार बंदीचा आदेश मागे घेतल्याने आता हिंदू संघटना नाराज झाल्या आहेत. मत्स्योत्पादन मंत्री नितेश राणे म्हणाले की, जो नियम हिंदू सणांना लागू आहे, तोच बकरी ईदला का लागू नाही? बकरी ईदीला बकरे कापण्याची परवानगी कशाला हवी? हिंदूंना रंगाशिवाय होळी साजरी करायला सांगितली जाते. तेव्हा आम्ही तशी होळी साजरी करतो. रात्री दहा वाजल्यानंतर फटाके वाजवू नका, असा नियम लावला जातो, तेव्हा आम्ही तो पाळतो. संविधानाचे पालन फक्त हिंदूनीच का करायचे? मुस्लिमांनीही ते करायला हवे. एखाद्या सोसायटीत जर जबरदस्ती बकरा कापला, तर आमचे हिंदुत्ववादी सरकार कारवाई करील.
नितेश राणेंच्या या वक्तव्यावर समाजवादी पक्षाचे अबू आझमी आणि काँग्रेसचे अमीन पटेल यांनी तीव्र आक्षेप घेतला. अबू आझमी म्हणाले की, जे लोक बेताल वक्तव्य करत आहेत त्यांना भाजपाने समज द्यावी. तर अमीन पटेल म्हणाले की, एखाद्या सोसायटीने कुर्बानीची एनओसी दिली असेल तर तिथे परवानगी दिली पाहिजे. कुर्बानी देण्याची प्रथा काही फक्त मुसलमानांमध्ये नाही. ती हिंदूंमध्येही आहे. प्रत्येक नागरिक आपली प्रथा परंपरा जपू शकतो. त्याला संविधानाने तसा अधिकार दिला आहे.
बकऱ्याच्या आकाराचा केक कापा
उत्तर प्रदेशातील भाजपाचे आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी एक्सवरून मुस्लिमांना एक वेगळेच आवाहन केले. त्यांनी एक व्हिडिओ आणि पत्र शेअर केले आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिले की, त्यांचा लोनी परिसर हा हवाई उड्डाणाच्या क्षेत्रात येतो. यासाठी उड्डाणाच्या क्षेत्रातील 10 किमी अंतरावर एकही कत्तलखाना किंवा मांसाचे दुकान आणि मांसाहारी हॉटेल असता कामा नये. कत्तलखान्यात प्राण्यांचे रक्त वाहते. त्यामुळे पक्षी आकर्षित होतात. पक्षी आल्यामुळे याआधीही इकडे एक विमान कोसळल्याची घटना घडली होती. यामुळे या परिसरातील कत्तलखाने बंद करायला हवेत. बकऱ्याची कत्तल करण्याऐवजी ईदीला मुस्लिमांनी बकऱ्याच्या आकाराचा केक कापायला हवा.

Web Title:
For more updates: stay tuned with Navakal
संबंधित बातम्या