पुणे- ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता स्वप्नील कुसाळेचे आज पुण्यात ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळेने ५० मीटर रायफल थ्री पोझिशन या प्रकारात कांस्य पदक पटकावले आहे .या स्पर्धेत स्वप्नीलने एकुण ४५१.४ गुण मिळविले. आज सकाळी स्वप्निलचे पुणे विमानतळावर आगमन झाले त्यावेळी शेकडो चाहत्यांनी त्याचे जल्लोषात स्वागत केले. यांनतर स्वप्नीलने श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेतले. पुण्याच्या बालेवाडी स्टेडियम मध्ये स्वप्निलचे नेमबाजीचा सराव केला होता. म्हणूनच स्टेडियमला भेट देण्यासाठी तो आज दुपारी बालेवाडीला आला. याठिकाणी ढोल ताशांच्या गजरात आणि भारत माता कि जय या जयघोषात त्याची ऑर्किड हॉटेल ते शुटींग रेज जंगी मिरवणूक काढण्यात आली. तसेच त्याच्या उत्तुंग कामगिरीला सलाम करण्यासाठी एका विशेष समारंभात त्याचा सत्कार करण्यात आला.

								
								
								
								
								
				
															
								
								
								
								
								
								







