मुंबई – मुंबईतील कबुतरखाने बंद करण्यावरून मोठा वादंग माजला असताना आज काही तथाकथित पक्षी प्रेमींनी आपल्या मुजोरीचे चीड आणणारे वर्तन केले. स्वतःला कबुतरांचे तारणहार समजणाऱ्या या लोकांनी न्यायालय व मुंबई महानगरपालिकेच्या आदेशाची खिल्ली उडवत स्वतःच्या गाड्यांच्या टपांवर पत्र्याचे ट्रे ठेवून त्यावर कबुतरांना दाणे देण्यास सुरुवात केली. अशा दहा पंधरा गाड्या दादरच्या कबुतरखाना परिसरात फिरत होत्या. त्याचा व्हिडीओ काढून काय करायचे ते करा असे उद्दामपणे म्हटले . दादर परिसरातीलच काही इमारतींच्या गच्चीवर काही लोकांनी कबुतरांना दाणे टाकून पालिका प्रशासनाला खिजवण्याचा प्रयत्न केला. एकाने तर गिरगाव चौपाटीवर दहा पोती धान्य कबुतरांसाठी ओतून त्याचा व्हिडिओ शेअर केला . पोलीस आपल्या संथ गतीने सायंकाळ पर्यंत या प्रकारांची चौकशीच करत राहिले .
दादरच्या भवानी शंकर रोडवर गोल देऊळ जवळ स्वतःच्या चारचाकीच्या टपावर पत्र्याच्या ट्रेमधून कबुतरांना दाणे देत फिरत असलेल्या एका अमराठी माणसाला एका मराठी माणसाने हटकले. तुम्ही राहता कुठे ,असे त्याला मराठी माणसाने विचारले असता त्याने आपण लालबाग , चिवडा गल्लीतील मॅग्नम टॉवर या इमारतीत राहतो,असे रुबाबात सांगितले. त्याला त्याचे नाव विचारले असता आपले नाव संकलेचा आहे, असेही त्याने तोऱ्यात सांगितले. तुम्ही कबुतरांना दाणे देण्यासाठी इथे का आलात , तुमच्या इमारतीजवळच कबुतरांना दाणे का देत नाही,असा सवाल विचारला असता त्याचे उत्तर न देता आमच्या आणखी दहा बारा गाड्या लवकरच इथे येणार आहेत, सर्वत्र कबूतरांसाठी फिरणार आहेत असे तो मराठी माणसाला खिजवण्याचा सूरात म्हणाला. त्याने भगव्या रंगाचा कुर्ता घातला होता . कालही त्याने याच परिसरात हाच प्रकार केला आणि सर्वांना आव्हान देणारा व्हिडिओ टाकला होता. दादर शिवाजी पार्क पोलीस स्टेशन या सर्व प्रकाराची चौकशी करीत आहे. मात्र सायंकाळ पर्यंत त्यांनी कोणताही गुन्हा दाखल केला नव्हता.
कबुतरांची विष्ठा आणि त्यांच्या पिसांमुळे माणसांमध्ये श्वसनाचे आजार जडतात,असे वैद्यकीय चाचण्यांमध्ये स्पष्ट झाल्याने मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील सर्वच्या सर्व ५१ कबुतरखाने बंद करण्याचे आदेश दिले. त्यावरून मोठा गदारोळ सुरू झाला. या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरांच्या विष्ठेमुळे मानवी आरोग्याला धोका उत्पन्न होतो या मुद्याची दखल घेत पालिकेच्या बंदी आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला. त्यानंतर पालिकेने दादरचा कबुतरखाना बांबू आणि ताडपत्रीच्या साह्याने आच्छादन टाकून बंद केला. त्यामुळे स्वतःला अहिंसावादी म्हणवणारा मुंबईतील विशिष्ट समाज हिंसक बनला. शेकडोंच्या संख्येने अचानक जमलेल्या या लोकांनी हातात चाकू-सुरे घेऊन दांडगाई करत पालिकेने उभारलेले ताडपत्रीचे आच्छादन फाडून टाकले. हे आंदोलन सुरू होते तेव्हा पोलिसांचा फौजफाटा तिथे होता. परंतु पोलीस अत्यंत संयम दाखवत आंदोलकांना हाताने दूर करत असताना दिसले. यानंतर मुंबईचे पालकमंत्री लोढा तिथे पोहोचले. त्यांनी कबुतर प्रेमींच्या बेकायदा वागणुकीला समर्थन दिले . त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी कबुतरखाने उघड करून पालिकेने तेथे मर्यादित खाद्य घालावे असे सांगितले . त्यानंतर आता कबुतर प्रेमींची उघड मुजोरी सुरू झाली आहे.
पुण्यातील कबुतरखान्यांचा
वादही हायकोर्टात पोहोचला
मुंबईत कबुतरखान्यांवरून वाद सुरू होताच पुण्यातही त्याचे पडसाद उमटले.पुणे महापालिकेने शहरातील २० सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य देण्यास १० मार्च २०२३ मध्ये बंदी केली आहे. या बंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांकडून पालिका ५०० रूपये दंड वसूल करते. आता या बंदीला आव्हान देणारी याचिका शाश्वत फाउंडेशन या संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.