नाशिक- मला जंगली रमी खेळता येत नाही, असा दावा करीत राज्याचे कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी आज मंत्रिपदाचा राजीनामा दिलाच नाही. नाशिक येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कृषी समृद्धी योजनेची त्यांनी घोषणा केली. खरेतर त्यांनी आज पत्रकार परिषद बोलावली तेव्हा ते राजीनामा देणार अशीच चर्चा होती. पत्रकार परिषदेवेळी कडेकोट बंदोबस्त होता. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) स्वतः हजर होते. त्यामुळे वातावरणात तणाव होता. मात्र कोकाटे यांनी राजीनामा तर दिला नाहीच, पण नवी कृषी योजना जाहीर केली. अजित पवार यांनी राजीनामा देण्यास सांगितल्यानंतर कोकाटे यांनी नाशिकताठर भूमिका घेतली याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.
रमीच्या ॲप्लिकेशनला जोडलेला नाही. याबद्दल तुम्ही चौकशी करू शकता. ज्या दिवसापासून ऑनलाईन रमी सुरु झाले तेव्हापासून मी एक रुपयाची रमी खेळलेलो नाही. किंबहुना मला रमी खेळताच येत नाही. त्यामुळे माझ्यावरील आरोप बिनबुडाचा आहे. माझी महाराष्ट्रात बदनामी झाली आहे. कारण नसताना ऑनलाईन रमीचा जो आरोप झाला. ज्या राजकीय नेत्यांनी आरोप केला, ज्यांनी माझी बदनामी केली त्यांना न्यायालयात खेचल्याशिवाय राहणार नाही.
मी त्यादिवशी सभागृहात होतो, माझी लक्षवेधी होती. मला माझ्या ओएसडीकडून माहिती हवी असेल तर मला एसएमएस किंवा फोन करावा लागतो. त्यासाठी मी मोबाईल मागवला होता. मोबाईल उघडल्यावर त्याच्यावर तो गेम आला, त्या गेमचा पॉप-अप येतो. तो मला स्कीप करता आला नाही. तो मोबाईल माझ्यासाठी नवीन होता म्हणून मला गेम स्कीप करायला वेळ लागला. पण मी गेम स्कीप केल्यानंतरचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलाच नाही. तो तुम्ही दाखवलाच नाही. मोबाईलवर एकच गेम येत नाही, वेगवेगळे गेम येतात. गेम स्कीप करायला 30 सेकंद लागतात. माझा व्हिडिओ व्हायरल केला तो गेम स्कीप होण्याच्या पूर्वीचा 11 सेकंदांचा आहे. त्यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरूझाले. पूर्ण व्हिडिओ दाखवला असता तर माझ्यावरील आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले असते.
विरोधकांच्या राजीनामा मागणीवर ते म्हणाले की,मी राजीनामा देण्यासारखे काय केले ? मी कोणाचा विनयभंग केला की चोरी केली, शेतकरी विरोधी निर्णय घेतला? एक व्हिडिओ काढून विरोधकांनी राजकारण केले. मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा करणार आहे. याशिवाय आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सभापती आणि विधानसभा अध्यक्षांना लेखी पत्र देणार आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची गरज आहे. त्यामुळे माझ्या पत्राच्या आधारे तुम्ही चौकशी करावी. याप्रकरणात मी दोषी सापडलो तर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपैकी कोणीही निवेदन करावे. त्या क्षणाला न थांबता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याला न भेटता मी राज्यपालांकडे जाऊन माझा राजीनामा देईन. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नाराजीबद्दल ते म्हणाले की, त्यांनी माध्यमांतील चर्चेवरून प्रतिक्रिया दिली असावी. त्यांनी याबाबत माझ्याकडे कोणतीही चौकशी केलेली नाही.
या पत्रकार परिषदेनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक्सवर लिहिले की,विधिमंडळाची अप्रतिष्ठा होऊ नये यासाठी आवाज असलेले हे व्हिडिओ शेअर करणे मी टाळत होतो. पण मंत्री महोदयांनी न्यायालयात जाण्याची भाषा केल्याने नाईलाजाने मला सत्य जनतेच्या न्यायालयात आणावे लागले. सभागृहाचे कामकाज संपले होते हे कृषिमंत्री महोदयांचे विधान धडधडीत खोटे आहे. उलट विकासाच्या मूळ प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी बांधवांना दुधाळ जनावरे देण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सभागृहात चर्चा सुरु होती. पण ओसाड गावच्या पाटलांना या चर्चेत रस नसावा आणि पत्त्याची कोणती जाहिरात स्किप करण्यासाठी 42 सेकंद लागतात? विझताना दिव्याची ज्योत मोठी होते, तसेच काहीसे कोकाटे यांचे झाले आहे. आज राजीनामा देऊन शेतकऱ्यांवर ते उपकार करतील असे वाटत होते, पण गिरे तो भी टांग उपर अशी त्यांनी भूमिका घेत न्यायालयात जाण्याची भाषा केली. हे दुर्दैव आहे. मंत्री महोदय स्वतःला वाचवण्यासाठी आज जेवढा खटाटोप करत आहेत त्यापेक्षा दिलेल्या पदाला न्याय देण्यासाठी केला असता तर ही वेळ आली नसती. आता चौकशी करायचीच तर कृषीमंत्री पत्ते खेळत होते की नाही याचीही चौकशी करावी. ही चौकशी निष्पक्ष पद्धतीने होण्यासाठी नैतिकता दाखवून कोकाटे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. यासंदर्भातील सत्य झाकणार नसल्याने राजीनामा देण्यासाठी पुढील अधिवेशनाची कशाला वाट पाहता आणि शेतकऱ्यांना सहन करायला लावता?
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की,कृषिमंत्र्यांनी रमी खेळत होतो हे कबूल केले पाहिजे. रमी खेळताना ते डोके खाजवत होते. पॉपअपसाठी डोके खाजवावे लागते का? तुम्ही राज्याचे कृषिमंत्री आहात. या प्रकरणी मुख्यमंत्री हतबल झाले. अजित पवार यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कोकाटे यांचा राजीनामा घेऊन तो महाराष्ट्राला बहाल करावा. सरकारनेही रमी या खेळाला राजमान्यता देऊन तसा अध्यादेश काढावा. त्यानंतर त्यांनी बिनधास्त रमी खेळावी. त्यांनी बिनधास्तपणे न्यायालयात जावे.
राजीनाम्यासाठी मविआ नेते
केंद्रीय कृषीमंत्र्यांना भेटले
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनामा मागणीसाठी मविआ नेते आज केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांना दिल्लीत भेटले. यामुळे कोकाटे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या भेटीबाबत शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्सवर लिहिले की, महाराष्ट्राच्या विधानसभेत रमी खेळणारा आणि सातत्याने शेतकरी विरोधी भूमिका मांडणारा कृषीमंत्री राज्याला नको. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे वादग्रस्त विधाने आणि वर्तणुकीमुळे चर्चेत असतात. शेतकऱ्यांना अरेरावी करण्याचा प्रसंग असो की, कर्जमाफीच्या संदर्भात केलेले विधान असो. त्यांनी आपल्या विधानांमुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासण्याचे काम केले आहे. त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे.
