Home / महाराष्ट्र / चौफुल्यात ठोय ठोय करू नका! अजित पवार यांचे बेफाम वक्तव्य

चौफुल्यात ठोय ठोय करू नका! अजित पवार यांचे बेफाम वक्तव्य

पुणे- राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज आपल्या पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांची कानउघाडणी केली. जपून बोला...

By: E-Paper Navakal
Deputy Chief Minister Ajit Pawar


पुणे- राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज आपल्या पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांची कानउघाडणी केली. जपून बोला असा संदेश कार्यकर्त्यांना देताना तेच बेफाम बोलले.
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्यक्रमात भाषण करताना अजित पवार म्हणाले की, तुम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहात. तुमच्याकडून कोणतीही चूक होऊ देऊ नका. चौफुल्याला तडफडू नका. कुठे जाऊन ठोय ठोय गोळीबार करू नका. ढगात गोळ्या झाडू नका. त्यामुळे पक्षाची बदनामी होते. विशेष म्हणजे ज्यांच्या भावावर चौफुल्यात गोळीबाराचा आरोप आहे ते आमदार शंकर मांडेकर यांच्या समोरच अजित पवारांनी ही तंबी दिल्याने याची जोरदार चर्चा होत आहे.
भोरचे आमदार शंकर मांडेकर यांच्या भावाला काही दिवसांपूर्वी चौफुला येथील कला केंद्रात गोळीबार केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. या प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली होती. मांडेकर यांच्या भावावर गुन्हाही दाखल झाला होता. आज पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत मांडेकर यांच्या मतदारसंघातील काही कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात अजित पवारांनी वैष्णवी हगवणे प्रकरणावरदेखील भाष्य केले. ते म्हणाले की, काही जण चुकीच्या पद्धतीने आरोप करत आहेत. कोणाच्या घरात काय घडले, कोणाला त्रास दिला गेला, हा सगळा तपासाचा विषय आहे. पण आमच्यावर गरज नसताना बोट दाखवणे चुकीचे आहे. आम्ही लग्नाला उपस्थित राहिलो, तर त्यात आमचा काय दोष? आम्ही त्यांना सुनेला त्रास द्यायला सांगितला का? उद्या सरपंचाच्या घरी लग्न असेल. त्याने बोलावले तर आम्ही जाणार. आम्हाला काय माहिती, तो पुढे काय दिवा लागणार आहे. आम्हाला माहिती असेल तर आम्ही नाही जाणार. उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना मी नीट वागले आणि बोलले पाहिजे. माझ्या प्रत्येक शब्दाचे शूटिंग चालू आहे. पूर्वी म्हणता यायचे की, मी असे बोललो नाही. कारण काही पुरावा नसायचा. तो 35 वर्षांपूर्वीचा काळ गेला. आता लगेच दाखवतात, बघा काय बोलला? आणि ते एकदा नाही तर तेच तेच तेच… लोक म्हणतात, हा कितीदा बोलला आणि काय सांगतो, बोलला नाही. असे टेक्निक चालू आहे. त्यामुळे तारतम्य ठेवून बोला. लोकांचा माझ्यावर विश्वास आहे. लोक म्हणतात की, हा बोलला म्हणजे नक्की आता आपले काम होणार. आता जबाबदारी वाढल्यापासून मी चांगले बोलायचा प्रयत्न करतो. आता बघा, मी सगळ्यांना फोटो काढू दिले. शेवटी मला तुमची आणि तुम्हाला माझी गरज आहे. आपण एक परिवार झालो आहोत. एकमेकांचा दुस्वास करायला एकत्र आलेलो नाही.

Web Title:
For more updates: stay tuned with Navakal
संबंधित बातम्या