Home / महाराष्ट्र / छत्रपतींच्या गड-किल्ल्यांच्या पर्यटनासाठी भारत गौरव ट्रेन सुरु

छत्रपतींच्या गड-किल्ल्यांच्या पर्यटनासाठी भारत गौरव ट्रेन सुरु

मुंबई — राज्यभरात आज छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५२ वा राज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. या निमित्ताने मुंबईतील छत्रपती शिवाजी...

By: Team Navakal

मुंबई — राज्यभरात आज छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५२ वा राज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. या निमित्ताने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन ट्रेनचा शुभारंभ करण्यात आला.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी उपस्थित जनतेला शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की, आज महाराजांच्या राज्याभिषेकास ३५१ वर्षे पूर्ण होत असून, या ऐतिहासिक दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात व केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या पुढाकाराने ही विशेष पर्यटन ट्रेन सुरु करण्यात आली आहे. ही ट्रेन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक स्थळांना भेट देणार असून, त्यांच्या पराक्रमाचा इतिहास नव्याने जनमानसात जागविण्याचे कार्य करणार आहे.
गौरव ट्रेनमध्ये एकूण ७१० प्रवासी सहभागी झाले आहेत. त्यात ४८० प्रवासी स्लीपर श्रेणीत, १९० प्रवासी ३एसी आणि ४० प्रवासी २एसी श्रेणीत प्रवास करत आहेत. या पर्यटनाचा उद्देश शिवरायांच्या जीवनातील महत्त्वाचे टप्पे, त्यांच्या कार्याचा वारसा, आणि महाराष्ट्रातील ऐतिहासिक स्थळांचा साक्षात्कार करून देणे आहे. यात्रेचा पहिला टप्पा रायगड किल्ल्यापासून सुरू होतो, जिथे शिवरायांनी राज्याभिषेक केला होता. दुसऱ्या दिवशी पुण्यातील लाल महाल व कसबा गणपती मंदिराची भेट घेतली जाईल. तिसऱ्या दिवशी शिवनेरी किल्ला – शिवरायांचे जन्मस्थळ, चौथ्या दिवशी प्रतापगड व त्यानंतर कोल्हापूरमधील श्री महालक्ष्मी मंदिर आणि पन्हाळा किल्ल्याला भेट दिली जाईल. पाचव्या दिवशी ट्रेन मुंबईकडे प्रस्थान करेल आणि सहाव्या दिवशी सकाळी मुंबईत परत येईल. ही ट्रेन प्रवाशांना केवळ ऐतिहासिक स्थळे दाखविणार नाही, तर त्यांना शिवरायांच्या जीवनशैलीचा, पराक्रमाचा आणि मूल्यांचा अनुभव देणार आहे. यात्रेच्या संपूर्ण प्रवासात शाकाहारी जेवण, आरामदायी हॉटेल मुक्काम, पर्यटनस्थळ दर्शन, टूर एस्कॉर्ट सेवा व प्रवास विमा यांचा समावेश आहे. ही पाच दिवसांची विशेष पर्यटन यात्रा भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी), रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे.

Web Title:
For more updates: , , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या