Home / महाराष्ट्र / जैन आंदोलकांवर कारवाई करा! राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले

जैन आंदोलकांवर कारवाई करा! राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले

मुंबई- मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेने दादरचा कबुतरखाना बंद केल्यावर जैन समाजाने आक्रमक होत आंदोलन केले. पण पोलिसांनी जैन आंदोलकांवर गुन्हे दाखल केले नाहीत. मात्र काल कबुतरखाना बंदीच्या समर्थनार्थ आंदोलन करणाऱ्या मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे मराठी कबुतरखाना विरोधकांमध्ये प्रचंड संताप आहे. आज पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच या वादाबाबत भूमिका मांडली. ते म्हणाले की, आंदोलनात सुरे वगैरे आणणाऱ्या जैन कार्यकर्त्यांवर कारवाई झाली पाहिजे.

काल निलेश्वशचंद्र विजय या जैन मुनींनी कबुतरखान्याच्या वादात राज ठाकरे यांनी मध्यस्थी करून तो सोडवावा , असे वक्तव्य केले होते. तो अमान्य करत राज ठाकरे म्हणाले की, कबुतरखान्यासंदर्भात उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. त्याप्रमाणे सर्वांना वागावे लागेल. जैन मुनींनी या गोष्टीचा विचार करणे गरजेचे आहे. उच्च न्यायालयाने कबुतरखान्यांवर बंदी घातली आहे, तर तो निर्णय त्या प्रकारे स्वीकारायला पाहिजे. कबुतरांमुळे कोणते रोग होतात. याबद्दल अनेक डॉक्टरांनी माहिती दिली आहे. कबुतरांना खायला देऊ नये, असे उच्च न्यायालयाने सांगूनही जर कुणी कबुतरांना खायला टाकत असेल तर त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे आहे. धर्माच्या नावावर खायला टाकत असाल तर ते चुकीचे आहे. एकाने खायला टाकल्यानंतर बाकीचेही तसेच करणार. मग उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय हवे कशाला? दादरच्या कबुतरखान्याबद्दल जैनधर्मीयांनी आंदोलन केले, त्यानंतर ही बंदी कायम राहावी यासाठी काल मराठी संघटनेनेही आंदोलन केले. जैन समाजाचे आंदोलन झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करायला हवी होती. पण ती झाली नाही. मंत्री मंगलप्रभात लोढा या प्रकरणात मधे येत आहेत. लोढा हे राज्याचे मंत्री आहेत. ते कुणा एका समाजाचे मंत्री नाहीत. त्यांनी महाराष्ट्राचा आणि न्यायालयाचा मान राखला पाहिजे. आधीच्या आंदोलनात ज्या लोकांनी सुरे वगैरे आणले होते, त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. मराठी माणसांनी केलेल्या आंदोलनावेळी पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. सरकारला हवे तरी काय? निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकार सर्व समाजांमध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहात का? आधी हिंदीचा मुद्दा काढून पाहिला. आता त्यानंतर त्यांनी कबुतरे आणली आहेत. इथून पुढे कोणते प्राणी आणतील ते माहीत नाही.

सध्या विरोधकांकडून होत असलेल्या मतचोरीच्या आरोपांबाबत ते म्हणाले की, मतदारयाद्यांमध्ये घोळ असल्याचे मी २०१६-१७ सालापासून बोलत आहे. बाकीचे आत्ता बोलायला लागले आहेत. मुंबई महानगरपालिकेतील मतदार याद्यांची पुनर्तपासणी झाली पाहिजे. आमची लोक ही मतदार याद्यांची तपासणी करत आहेत.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आज मुंबईतील नेते व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी प्रत्येक मतदारयादी काळजीपूर्वक तपासण्याचे, त्यावर बारीक लक्ष ठेवण्याचे आणि संभाव्य घोटाळे टाळण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, मुंबईत तळागाळात केवळ उबाठा आणि मनसे हेच दोन पक्ष मजबूत असल्याचेही त्यांनी म्हटले.

१५ ऑगस्टला मांसविक्री
दुकाने चालू ठेवणार

स्वातंत्र्यदिनी राज्यातील काही महापालिकांनी मांसविक्रीवर बंदी घातली आहे. याविषयी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मी आमच्या लोकांना चिकन-मटणाची दुकाने चालू ठेवा असे सांगितले आहे. मांसविक्री बंद करण्याचा अधिकार महापालिकेला नाही. कोणी काय खावे आणि काय खाऊ नये, हे ठरवणे सरकार किंवा पालिकेचे काम नाही. स्वातंत्र्यदिनीच लोकांना खाण्याचे स्वातंत्र्य न देणे हा विरोधाभास आहे. स्वातंत्र्य म्हटल्यानंतर तुम्ही बंदी कशी आणू शकता? याबाबतचा कायदा १९८८ साली आणल्याचे बोलत आहेत. कायदा कधीही आणला असला, तरी स्वातंत्र्यदिनी आपण लोकांचे स्वातंत्र्य हिरावून घेत आहोत. कोणत्याही सरकारने या गोष्टीचा विचार केला पाहिजे.